Saturday, 16 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.11.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - १६ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****  

v पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करण्याची भाजपची मागणी तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आज राज्यपालांना भेटणार
vशेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं तसंच सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळण्याचं शिवसेना पक्ष प्रमुखांचं आश्वासन
vराज्यात लवकरच सरकार स्थापन होईल- काँग्रेस तर शिवसेना आणि भाजपचा आपलेच सरकार स्थापन होण्याचा दावा
आणि
vबांग्लादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडे ३४३ धावांची आघाडी

              राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी केली. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्यानं त्यांना त्वरित मदत निधी वितरित करुन दिलासा द्यावा, असं ते म्हणाले. यावर लगेच कार्यवाही करणार असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. गरीब रुग्णांसाठीच्या मुख्यमंत्री सहायता निधीचं संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावं आणि एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, आदी मागण्याही फडणवीस यांनी यावेळी केल्या.
****

       शेतकऱ्यांच्या प्रश्र्नांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही काल राज्यपालांची वेळ मागितली होती, राज्यपालांनी त्यांना आज दुपारी तीन वाजता या भेटीसाठी वेळ दिला असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली.
****
      
       केंद्र सरकारनं राज्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर अहवाल तयार करून आवश्यक मदत करण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांनी काल नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.  सरकारनं नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्यानुसार तातडीनं मदत द्यावी, असंही ते म्हणाले. येत्या सोमवारी संसदेचं सत्र सुरू होत असून, त्यावेळी कृषी आणि अर्थमंत्रालयाकडे या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.
****

       शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सांगली आणि सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. सांगली जिल्ह्यातल्या विटा आणि नेवरी इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या खटाव आणि माण तालुक्यात पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द पाळू, असं आश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिलं.
****
       
       राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं ते म्हणाले.  अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घ्यायला उशीर केला, अशी टीकाही त्यांनी केली. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसनं आधीच राज्यपालांची भेट घेतली होती, तसंच सध्या दोन्ही पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी शेताच्या बांधावर नुकसानीचा आढावा घेत आहेत, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****

       राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही. इथं भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षानं व्यक्त केला आहे. काल मुंबईत भाजपाच्या संघटनात्मक पातळीवरच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना, राज्यात कडबोळं सरकार टिकणार नाही असं म्हटलं. भाजपाच्या या बैठकांमधे विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण, शेतकऱ्याचे प्रश्न यासह इतर मुद्यांवर चर्चा झाली असून, भाजपाची संघटनात्मक रचना तयार होणार असल्याचं, पाटील यांनी सांगितलं. 
****

       राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात चर्चा सुरु असून, आज न उद्या त्यावर मार्ग निघेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नसून, हे सरकार बनेल, पाच वर्षे चालेल, यावर या पक्षांच्या नेत्यांचं लक्ष असेल, असंही त्यांनी नमुद केलं. काँग्रेसच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा झाली असून, आणखी काही मुद्दांवर चर्चा करायची असल्यानं दोन- तीन दिवसांत दिल्लीत पुन्हा बैठक घेण्यासंदर्भात आपण सुचवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात स्थीर सरकार असावं, विकास व्हावा, राज्यासमोरचे यक्ष प्रश्र्न सोडवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे अशी या सर्व पक्षांची इच्छा असल्याचं पवार यावेळी म्हणाले.

      दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडेच राहणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन शिवसेना युतीतून बाहेर पडली, शिवसेनेच्या भावनांचा आदर करण्याची आमची जबाबदारी असल्याचं मलिक यांनी नमूद केलं.  
****

        शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचं वगनाट्य रोज सकाळी आपण अनुभवत आहोत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी यावेळी उत्तर दिलं.  तीन पक्षांचं नाट्य राज्य पहात आहे, आणि ते राज्याला मान्य नाही, असं ते म्हणाले. पूर्वी सर्व राजकीय नेते शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जात असत, आता सत्ता लालसेपोटी मातोश्रीहून निघून नेते पंचतारांकित हॉटेलच्या फेऱ्या करत आहेत, अशी टीका शेलार यांनी केली.
****

       राज्यातलं आगामी सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली होईल आणि त्याकरता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राज्याच्या हिताचा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात येत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना आगामी पाच नव्हे तर पंचवीस वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवेल, असं राऊत यांनी नमूद केलं.  
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

        शिवसेना औऱंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचे बँक, विमा आणि सरकारी संस्थां संबंधित प्रश्र्न सोडवण्यात सहकार्यासाठी बासष्ट मदत केंद्र सुरू करणार आहे. शासकीय संस्था आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून ही केंद्रं काम करतील, अशी माहिती पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात सहभागी होण्यासाठी सरकारी संस्थाकडून परवानग्या घ्यायला आपण कार्यकर्त्यांना सांगितलं असल्याचंही दानवे यांनी सांगितलं.      
****

       नांदेड जिल्ह्यात कृषी विभागानं शेतकऱ्यांना अनुदानावर मुबलक प्रमाणात हरभरा बियाणं वाटप करावं, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे. त्यांनी काल  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन ही मागणी केली असून, येत्या काळात पाच हजार क्विंटल हरभरा बियाणं नांदेड जिल्ह्यात उपलब्ध करून देणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
****

        औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर अंबड तालुक्यातल्या दोदडगाव पाटीजवळ काल मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर चोवीस जण जखमी झाले. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातले असून गेवराईच्या सूत गिरणीवर कामासाठी ते जात होते.
****

        राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं एकोणसाठावी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीची स्पर्धा कालपासून औरंगाबाद इथं सुरू झाली. शहरातल्या तापडिया नाट्यगृहात ३० नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. काल संध्याकाळी येस आय ॲम गिल्टी या सत्यजित खारकर लिखित नाटकाचा प्रयोग झाला.

       नांदेड इथंही या स्पर्धेची प्राथमिक फेरी कालपासून सुरु झाली. प्रल्हाद जाधव लिखित‘शेवंता जिती हाय’ या नाटकानं स्पर्धेची सुरुवात झाली असून, एकूण १६ नाट्यप्रयोग होणार आहेत. 
****

       परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या जांभरूण या गावात असलेलं महावितरण कंपनीचं विद्युत रोहित्र गेल्या १८ दिवसांपासून बंद असल्यानं गावामधला वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि प्रभागाचे सदस्य या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 
****

       बांग्लादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात भारतानं काल मयंक अग्रवालच्या द्विशतकी खेळीच्या बळावर सहा बाद ४९३ धावा केल्या. रविंद्र जडेजा साठ आणि उमेश यादव २५ धावांवर खेळत आहे. सध्या भारताकडे ३४३ धावांची आघाडी आहे.
****

       विश्वशांती आणि प्रगतीसाठी काल नांदेड इथं सचखंड गुरूद्वारात प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह सर्व समाजातले धर्मगुरू, प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
*****

        नांदेडच्या नानक साई फाऊंडेशनच्या `संत नामदेव घुमान` यात्रेला हरियाणाचा `पानिपत शौर्य तीर्थ पुरस्कार` नुकताच प्रदान करण्यात आला. पानिपतच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर संघातर्फे हा पुरस्कार देण्यात आला.
****

       हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या कळमनुरी तालुक्यातल्या येहळेगावाला काल भेट दिली. यावेळी त्यांनी गावात सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...