Wednesday, 7 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 October 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      जनतेचा विश्वास आणि प्राप्त अनुभव हीच आपली संपत्ती-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      पंतप्रधानांच्या सार्वजनिक जीवनाच्या कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रम

·      नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याचा देशात प्रथम क्रमांक

·      रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ

आणि

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप

****

गेल्या २५ वर्षांत कमावलेला जनतेचा विश्वास आणि मिळालेला अनुभव हीच आपली संपत्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपल्या सार्वजनिक जीवनाच्या कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्ली इथं झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला ते संबोधित करत होते. ७ ऑक्टोबर २००१ ला आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. जनतेचा विश्वास आणि लाखो कार्यकर्त्यांचे कष्ट ही आपली शक्ती असून, यामुळेच भारताच्या सामर्थ्याला कमी लेखू नये, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

कधीकाळी धोरण लकव्यानं ग्रासलेला अशी ओळख असलेला भारत, आज मात्र आपलं वाढतं सामर्थ्य आणि लवचिकतेसाठी ओळखला जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या १२ वर्षांत देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, आता भारत निर्यातीत नवे विक्रम घडवत आहे, भारताच्या नव्याने उभारणीसाठी मोठी ध्येय बाळगण्याची हीच योग्य वेळ असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल पंतप्रधानांचं अभिनंदन केलं.

****

पंतप्रधानांच्या कारकिर्दीची ही २५ वर्षे विकासाची, समर्पणाची, मानवकल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले –

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या गौरवशाली वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. मोदी यांची ही कारकीर्द म्हणजे, देशाच्या बदलत्या राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण अध्याय असल्याचं, शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या, आपल्या कारकिर्दीत पंतप्रधानांनी भारताला आत्मनिर्भर, सामर्थ्यवान आणि विकसित राष्ट्र करण्याच्या संकल्पाला दृढ दिशा देत, आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने आणि अथक कार्याने देशाच्या प्रगतीवर अमिट ठसा उमटवला, असं म्हटलं आहे.

 

राज्यातही अनेक ठिकाणी या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. पंतप्रधानांचं, विकसित भारत संकल्प सभेतील भाषणाचं यावेळी थेट प्रक्षेपण करण्यात आलं. नवी मुंबईत नेरूळ इथं ‘सेवा ज्योती यात्रा’, ‘नमो सेवा संकल्प’ आणि ‘विकसित भारत संकल्प सभा’ घेण्यात आली. नेरुळ शहरात दुचाकी फेरीच्या माध्यमातून सेवा ज्योती यात्रा काढण्यात आली. प्रत्येक भारतीयाने स्वयंस्फूर्तीने देशहितासाठी कार्य करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.

 

छत्रपती संभाजीनगर इथं गारखेडा परिसरातून सेवा ज्योती यात्रा काढण्यात आली. शहरातून काढलेल्या सेवा ज्योती यात्रेत अनेक नागरिक सहभागी झाले. गारखेडा भागात, गजानन मंदिर ते सुतगिरणी चौकादरम्यान एका चौकाचं ‘विकसित भारत संकल्प चौक’ असं नामकरण करण्यात आलं.

बीड शहरातूनही ‘सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात आली, या यात्रेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले. या अभियानाच्या’ माध्यमातून समाजसेवा, जनकल्याण आणि राष्ट्रहिताच्या कार्याला चालना देण्याचा संदेश देण्यात येत आहे.

 

अहिल्यानगर इथं “विकसित भारत संकल्प” सभा घेण्यात आली. सभेनंतर शहरातून सेवा ज्योत यात्रा काढण्यात आली.

परभणी शहरात विकसित भारत संकल्प सभेला पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘विकसित भारत 2047’चा सामूहिक संकल्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रसारण यावेळी करण्यात आलं.

****

लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाद्रा विरोधात दिल्ली पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल-एफआयआर दाखल केला आहे. नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांविरोधातल्या निषेध मोर्चादरम्यान गांधी तसंच वाद्रा यांनी परवानगीशिवाय ऑल इंडिया रेडिओच्या इमारतीत प्रवेश करून तिथं धरणे आंदोलन केलं. या प्रकरणी हा एफआयआर दाखल केला आहे.

****

नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीत गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्याने देशात अव्वल स्थान पटकावलं. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी-जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच मूलभूत पायाभूत सुविधा या पाच क्षेत्रांतल्या ४८ निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे हे मानांकन निश्चित करण्यात आलं आहे.

****

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात शून्य पूर्णांक २५ टक्क्यांची वाढ केली असून, रेपो दर आता साडे पाच टक्के इतका झाला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. फेब्रुवारी २०२३ नंतर आरबीआयने धोरणात्मक दरात वाढ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वाढती किरकोळ महागाई आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीची माहिती दिली. राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देतानाच, यासंदर्भातील निवेदनही मुख्यमंत्र्यांनी सादर केलं, यानंतर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

एमपीएससी - राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयाने नमूद करत, विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे परतण्याचा सल्ला दिला आहे. परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक होतील, याची हमी देऊन विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. दरम्यान, आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे. दरम्यान, पुण्यातील टिळक चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरच्या कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटकं गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहेत. यात २१ जिवंत काडतुसे, सात डिटोनेटर आणि १५० मीटर केबल वायर जप्त करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तीन दिवसापासून सुरु असलेल्या केंद्रीय युवक महोत्सवाचा अभिनेत्री नम्रता संभेराव आणि पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांच्या उपस्थितीत आज जल्लोषात समारोप झाला. कुलगुरु डॉ. विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. नम्रता संभेराव आणि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी रवींद्र खोमने यांच्या हस्ते पारितोषिकं वितरीत करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघानं महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवलं. विजेतेपदासह २ गटातील ४ चषक आणि १६ कलाप्रकारात पारितोषिके मिळवून या संघाने हॅटट्रिक केली.

****

येत्या नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना माहूरगडावर जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १२० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, भाविकांच्या सुरक्षेसाठी ५०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. भाविकांच्या आरोग्य सुविधांसाठी ग्रामीण रुग्णालयातील ४० पैकी २० खाटा राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

****

नाशिक मुंबई रेल्वे मार्गावर आसनगाव ते कसारा दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे आजपासून पुढचे दहा दिवस अनेक रेल्वेगाड्या उशीराने धावणार आहेत. मुंबई बल्लारशा मुंबई गाडी १७ आणि १८ तारखेला पूर्ण रद्द करण्यात आली असून, १७ तारखेला हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आणि नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस फक्त अनुक्रमे मनमाड आणि नाशिकपर्यंत धावतील आणि तिथूनच परतीच्या प्रवासाला निघतील. या काळात राज्यराणी तसंच देवगिरी एक्सप्रेस कर्जत पुणे मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे, तर तपोवन एक्सप्रेस मनमाड ते मुंबई दरम्यान रद्द असेल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...