Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 October 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ ऑक्टोबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येकास
मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन द्यायचे राज्य सरकारचे निर्देश
· प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार-रविवारी
विशेष नोंदणी शिबीर
· ज्येष्ठ अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं निधन
आणि
· राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात धाराशिव जिल्हा राज्यात
अव्वल
****
दुष्काळ जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक
नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय
अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्या नागरिकांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळणार आहे.
अशा नागरिकांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करुन, कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करुन तत्काळ अन्नधान्य उपलब्ध करून
देण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं जारी केले.
शिधापत्रिका असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या
स्वस्त धान्य दुकानातल्या ई-पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेशही सरकारनं दिले
आहेत.
****
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात टंचाई निवारणाच्या कामांना
प्राधान्य देण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले
आहेत. जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दुष्काळ निवारण उपाययोजनांचा
आढावा घेतला,
त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी अडचणीत येऊ नये, हाच आपला प्रयत्न असल्याचं शिरसाट यांनी या बैठकीनंतर सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - संजय
शिरसाट, पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर
****
लातूर जिल्ह्यातील पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा
अपव्यय रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा
सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. मांजरा धरणातून पाणीपुरवठा
होणाऱ्या पाईपलाईनवरील पाणीचोरी आणि विविध जलप्रकल्पांमधील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी
कठोर कारवाई करावी, तसेच सिंचन प्रकल्पांवर रात्रीची गस्त वाढवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकांच्या
मुख्याधिकाऱ्यांची बैठक झाली. पाणीटंचाईग्रस्त भागात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक
निधीचे प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
****
विशेष पुनरीक्षण दरम्यान प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी
निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबीर
आयोजित करणार आहे. याशिवाय १२ ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि BLO कडेही
अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या
वेबसाइटवर किंवा ECINET ॲपवरही मतदार अर्ज भरू शकतात.
याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी, यासाठी
राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबीरं आयोजित
करण्यात येत आहेत.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेने कर अधिकाऱ्यांचे अटक करण्याचे अधिकार रद्द केले आहेत. आज नवी
दिल्लीत जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. परिषदेने खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा १ कोटी रुपयांवरून ५ कोटी
रुपयांपर्यंत वाढवली आहे.
****
औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर
लाभ देण्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का, याची
चाचपणी करण्यासाठी ३ सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र
सरकारला दिले आहेत. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं
आहे का,
आणि असेल तर त्यांचं स्वरूप काय असावं, याबाबतची शिफारस करेल.
****
ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं आज
गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यात दोना
पावला इथल्या आपल्या घरात आज पहाटेच्या सुमारास ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना त्वरित
रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून
मृत घोषित केलं. त्यांच्या पार्थिव देहावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले
जाणार आहेत. नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा –
विश्वनाथ
उर्फ नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी कोकणात मुरुड इथे झाला. उत्तम चित्रकार
असलेल्या नानांनी उमेदीच्या काळात पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम केलं.
मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी शिक्षण घेतलं. हमिदाबाईची कोठी या मराठी
नाटकातून नानांच्या अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. पुरुष या नाटकात त्यांनी रंगवलेली
खलनायकी भूमिकाही प्रचंड गाजली. सिंहासन, भालू, राघू
मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, यासह
पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे, आपला
माणूस, ओले आले हे त्यांचे मराठी चित्रपट
लोकप्रिय ठरले. नटसम्राट चित्रपटातल्या मध्यवर्ती भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट
अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
बाईट - नटसम्राट
हिंदी
चित्रपट सृष्टीवरही नाना पाटेकर यांनी आपला अमिट ठसा उमटवला. १९७८मध्ये आलेल्या गमन
या चित्रपटापाठोपाठ अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा
सा रूमानी हो जाए, राजू
बन गया जेंटलमन, यशवंत, अग्निसाक्षी, वजूद, परिंदा, तिरंगा, क्रांतिवीर, खामोशी, वेलकम, अब
तक छप्पन अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी उभी केलेली विविध पात्रं आणि त्यांचे संवाद
रसिकांच्या मनावर कोरले गेलेत.
बाईट - वजूद
प्रहार
या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. अभिनय क्षेत्रातल्या योगदानासाठी
अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना २०१३ साली पद्मश्री देऊन त्यांना
गौरवलं होतं. अभिनयासोबतच नाना पाटेकर यांनी सामाजिक कार्यातही मोलाचं योगदान दिलं.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या सोबतीने त्यांनी
नाम फाऊंडेशन स्थापन केलं. या माध्यमातून जलसंधारण आणि दुष्काळ निवारणासह शेतकरी कुटुंबांसाठी
भरीव मदत करण्यात येते. राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्यांनी रौप्य तसंच कांस्यपदकंही
पटकावली १९९९मध्ये कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला
ठेवून ते दोन महिने सैनिकांसोबत राहिले होते.
नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी
दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती
सी पी राधाकृष्णन्, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय
आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात
म्हटलं आहे. ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी नाना पाटेकर
यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनय तसंच सामाजिक क्षेत्रातूनही नाना पाटेकर
यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात काळसे इथं नाना पाटेकर
यांना श्रमदानाच्या कामातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोकसहभागातून नाल्यातील
गाळ काढून पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात धाराशिव जिल्हा राज्यात
अव्वल आला आहे. जिल्ह्यातील एकूण ७८ आयुष्मान आरोग्य वर्धिनी उपकेंद्रं आणि २३ प्राथमिक
आरोग्य केंद्रं,
अशा एकूण १०१ आरोग्य संस्थांचं राज्यस्तरीय तसंच राष्ट्रीय स्तरावरील
पथकाद्वारे मूल्यांकन होऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्रं प्राप्त झाली आहेत.
अशी कामगिरी करणारा धाराशिव हा राज्यातला एकमेव जिल्हा ठरला आहे.
****
लातूरच्या श्रावणी जगतापची जॉर्डनमध्ये होणाऱ्या आशियाई ट्रायथलॉन
चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. येत्या २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान जॉर्डनमधल्या अकाबा
इथं या स्पर्धा होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment