Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 October 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· आशियाई क्रीडा स्पर्धांची शानदार सोहळ्यात सांगता, २१ सुवर्णांसह भारत चौथ्या स्थानी, दोन सुवर्ण जिंकणाऱ्या
नीरू धांडाला ध्वजवाहकाचा मान
· विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
· औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १२ जणांचे अर्ज दाखल, आतापर्यंत ९७ इच्छुकांनी नेले अर्ज
· मराठवाड्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी पुण्यात ६ ऑक्टोबरला
बैठक,
मराठवाडा समन्वय समितीचा पुढाकार
आणि
· ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक मुंबईत
एकवटले
****
विसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज शानदार समारंभात समारोप
झाला. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमधे भारताने
दमदार कामगिरी केली. २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांसह
एकूण ८५ पदकांची कमाई केली, आणि पदकतालिकेत चौथं स्थान पटकावलं.
जपानमधील नागोया येथे २०२६ आशियाई स्पर्धेची अधिकृतपणे सांगता झाली. खेळांची ज्योत
आणि ध्वज २०३० च्या आशियाई खेळांचे यजमान असलेल्या कतारकडे सुपूर्द करण्यात आले. २०३०मध्ये
दोहा इथं ही स्पर्धा होणार आहे. नेमबाजीमध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकणाऱ्या
नीरू धांडाने समारोप समारंभात ध्वजवाहक म्हणून भारतीय तुकडीचे नेतृत्व केले.
दरम्यान, भारतीय गोल्फ युनियननं आज आशियाई
क्रीडा स्पर्धेतील देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला
१० लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला.
****
राज्य विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता
पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर
पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज
दाखल करणाऱ्यासोबतच अर्ज नेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. काल एकाच दिवसात १० इच्छुकांनी
दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या
१२ झाली असून,
६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार
आहे. आतापर्यंत ९७ इच्छुकांनी १७४ अर्ज नेले आहेत.
****
मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत यंदा सरासरीच्या तुलनेत
कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई, चाऱ्याची कमतरता, शेतीसमोरील संकट आणि रोजगाराच्या प्रश्नावर
चर्चा करून पुढील कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी पुण्यात मराठवाड्यातील नागरिकांची बैठक
आयोजित करण्यात आली आहे. मराठवाडा समन्वय समिती आणि एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन
यांच्या वतीने ही बैठक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता, गांजवे चौक येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनमध्ये होणार आहे. शासनाने जाहीर
केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याबरोबरच दुष्काळग्रस्त भागासाठी अधिक प्रभावी मदत
मिळवण्यासाठी शासनाशी संवाद आणि पाठपुरावा करण्याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
तसेच,
या संकटाच्या काळात समाज म्हणून कोणते योगदान देता येईल, यावरही विचारविनिमय होणार आहे. पुण्यात राहणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांनी आणि
दुष्काळग्रस्तांसाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे आणि मराठवाडा समन्वय
समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे-पाटील यांनी केले आहे.
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी पाच
उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मराठी, आसामी,
बंगाली, पाली, आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार
आहेत. पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालयात यातलं एक केंद्र असेल.
****
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी देशातील संस्था, सूक्ष्म,
लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप्स मजबूत झाल्यामुळेच विकसित
भारताचं उद्दिष्ट साध्य होईल, असं म्हटलं आहे. नवी दिल्ली
इथं इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या ५८ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात
ते आज बोलत होते. देशात उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्सला प्रोत्साहन देत, शाश्वत विकासाच्या क्षेत्रात संस्थेनं जागतिक मानदंड निर्माण केले आहेत, असंही ते म्हणाले. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी संस्थेचे सामूहिक प्रयत्न
भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यास सहाय्यभूत ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी
सरकारनं आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी तत्काळ संवाद साधावा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद
झाला,
तरच हा प्रश्न मार्गी लागेल, असं
मत त्यांनी मांडलं.
****
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी विरोधकांकडून आज मुंबईत 'विराट
गर्जना मोर्चा'
काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी
नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा
मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं
सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात
सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा
आरोप करत,
ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी
करावी,
अशी मागणी या नेत्यांनी केली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार
असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना
वगळण्यासाठी ही S I R प्रक्रिया राबवली गेली असेल, तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं, असा सवालही त्यांनी केला. तर, राज्यातल्या S I R, अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर, अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात, अशी
मागणीही त्यांनी केली.
निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड
समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं, तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण इथं आज दुपारी तीन वाजेच्या
सुमारास,
एसटी तसंच दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोघांचा घटनास्थळी मृत्यू
झाला. अशोक भालेराव आणि कृष्णा गायकवाड अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे पैठण इथुन संत
एकनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनानंतर कपडे खरेदी करुन घरी परत जात असताना हा अपघात
झाला.
****
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या
शंभर टक्के क्षेत्राचे पंचनामे करावेत, एकही शेतकरी पंचनाम्यापासून
वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री
जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. सांगोला तालुक्यातील कटफळ इथं पीक नुकसानीची पाहणी करून
पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऊस, फळबागा
आणि अन्य पिकांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचाही पंचनाम्यात समावेश करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, पंढरपूर
तालुक्यातील गार्डी गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कासाळ ओढ्यावरील तलावात पाणी सोडण्याची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही
त्यांनी जलसंपदा विभागाला दिले.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांतर्गत एकाच
दिवसात ४३ लाख ७० हजार रुपयांचा मालमत्ताकर वसूल करण्यात आला. त्यासाठी थकबाकीदारांची
मालमत्ता सील करणं आणि जप्तीची कारवार्इ अशी कारवाईही करण्यात आली. झोन कार्यालयांनी
मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली असल्याचं या वेळी मनपाच्या
प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
भगवान महावीरांनी दिलेली शिकवण ही केवळ धार्मिक तत्त्वे नसून
शांततापूर्ण,
न्यायपूर्ण आणि मानवी समाजाच्या निर्मितीचा आधार आहेत, अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी भगवान महावीरांच्या
शिकवणीचं महत्व विशद केलं. भारत जैन महामंडळातर्फे मुंबई इथं आयोजित सामूहिक क्षमापना, विश्व मैत्री दिवस आणि जैन समाज रत्न अलंकरण समारोहात आज ते बोलत होते. भारत जैन
महामंडळाच्या १२६ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उल्लेख करून राज्यपालांनी संस्थेने
जैन धर्मातील तत्त्वे, आध्यात्मिक मूल्ये, सामाजिक एकता आणि मानवसेवेची भावना पुढे नेण्यासाठी दिलेल्या योगदानाचं कौतुक करुन, जैन समाजानं सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत सहभाग वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment