Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 October
2026
Time 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
यूपीआय
व्यवहारांवरील व्यापाऱ्यांसाठीचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू करण्यात येणार
·
कचऱ्यापासून
कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसंदर्भात कृती दल स्थापन कऱण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·
पाणीपुरवठा
योजनांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्यासह मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम युद्धपातळीवर
करण्याची मंत्री गुलाबराव पाटील यांची सूचना
·
विद्यार्थ्याच्या
परीक्षा शुल्क माफीची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे विद्यापीठांना निर्देश
आणि
·
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी प्रसिद्ध
****
यूपीआय मर्चंट डिस्काउंट रेट, अर्थात, २०००
रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर व्यापाऱ्यांना किंवा दुकानदारांना
द्यावं लागणार असलेलं शुल्क दिवाळीनंतर लगेच लागू करण्यात येणार आहे. नॅशनल पेमेंट्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली. यासाठीची
तारीख स्वतंत्रपणे जाहिर केली जाणार आहे. सामान्य ग्राहकांना यूपीआय पेमेंट करण्यासाठी
कोणतंही शुल्क लागणार नसून,
व्यक्ती ते व्यक्ती यूपीआय व्यवहारही पूर्णपणे नि:शुल्क राहणार
आहेत. याशिवाय,
महिन्याला एक लाखापर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे मिळवणारे छोटे
दुकानदार आणि पथविक्रेत्यांनाही हे शुल्क द्यावं लागणार नाही.
****
राज्यातली शहरं कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड
बायोगॅस अर्थात सीबीजी निर्मितीला चालना देण्यासाठीचे प्रकल्प उभारण्याबाबत कृती दल
स्थापन करावेत,
आणि ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथं राज्याच्या सीबीजी
धोरणानुसार प्रकल्प उभारावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पांमुळे
कचरा उचलण्यासाठी महापालिकांना करावा लागणारा खर्च वाचणार असून, कचरामुक्त
शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद
केलं.
****
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य नावीन्यता सोसायटी
आणि उदैती फाउंडेशन यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून राज्यात
महिला उद्योजकता हब स्थापन करण्यात येणार असून या हबमुळे राज्यातल्या महिलांच्या आर्थिक
सक्षमीकरणाला चालना मिळेल,
असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
राज्यातली पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेत, पाणीपुरवठा
योजनांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात, असे
निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. काल मुंबईत
मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
वैजापूर आणि गंगापूर इथं गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने
कराव्यात, तसंच मराठवाडा वॉटर ग्रीड आणि जलजीवन मिशनची अपूर्ण कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे
निर्देशही त्यांनी दिले.
****
विद्यापीठांनी विद्यार्थ्याचं परीक्षा शुल्क माफीची शंभर टक्के
अंमलबजावणी करावी,
असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. छत्रपती
संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं
उद्घाटन करतांना ते काल बोलत होते. पालकमंत्री संजय शिरसाट, कुलगुरू
डॉ विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शैक्षणिक कर्जवसुलीच्या
स्थगितीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावरही कुलगुरुंनी लक्ष देण्याची
सूचना सामंत यांनी केली. ते म्हणाले –
बाईट - उदय सामंत, मराठी भाषा मंत्री
****
राज्यातल्या महामार्गांवर होणाऱ्या रस्ते अपघातांतल्या गंभीर
जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत या उद्देशानं पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला
‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत
होते. या योजनेत समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग
आणि मुंबई-गोवा महामार्गांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या अनाधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी कालपासून
बंद करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल विभागानं यासंदर्भात
प्रतिबंधात्मक आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, नियम
मोडल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा
प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा
आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक
परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. केंद्र सरकारनं सुरु केलेली उज्ज्वला योजना, हा
देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज या योजनेविषयी जाणून घेऊ -
ग्रामीण आणि वंचित कुटुंबांतील महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून
देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू
केली. स्वयंपाकासाठी पारंपरिक पद्धतीनं लाकूड, कोळसा आणि शेणाच्या गोवऱ्यांचा वापर होत असे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या
त्रासापासून महिलांना दिलासा देणं, स्वयंपाकासाठी
स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणं हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
बाईट – पंतप्रधान नरेंद्र
मोदी
२०२१ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. स्थलांतरित
कुटुंबांसाठी पत्त्याच्या पुराव्याबाबत या दुसऱ्या टप्प्यात सुलभ तरतुदी करण्यात आल्या.
तसंच,
लाभार्थ्यांना गॅस जोडणी आणि पहिले गॅस सिलेंडर विनामूल्य उपलब्ध
करून देण्यावरही या दुसऱ्या टप्प्यात भर देण्यात आला आहे.
****
सेवा संकल्प अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातल्या विविध आरोग्य
केंद्रांवर किशोरवयीन मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात येत
आहे. या उपक्रमांतर्गत काल जालना, अंबड आणि जाफ्राबाद तालुक्यांमधल्या विविध
आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये मुलींना एचपीव्ही लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगण्यात
आलं. या मोहिमेत एकूण २१ मुलींना लस देण्यात आली.
****
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अचूक, पारदर्शक
आणि अद्ययावत करण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. जिल्ह्यातल्या
दोन हजार ३९३ मतदान केंद्रांसह, महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये देखील
विशेष शिबिरं घेण्यात आली.
दरम्यान, एसआयआर अंतर्गत दावे-हरकतींचा निपटारा, नोटीस
बजावणी आणि सुनावणीची कामं १६ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
****
लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तात्कालिक
उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज, आमदार संभाजी पाटील निलंगेकर
यांनी व्यक्त केली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या
बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी
जिल्ह्यातल्या सगळ्या पाटबंधारे प्रकल्प, लघु तलाव, नदी-नाले
यामधून होणारा अनधिकृत पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. प्रकल्पांच्या
बुडीत क्षेत्रातल्या विहिरींवरून सिंचनासाठी होणारा अनधिकृत उपसा पूर्णपणे थांबवून
विद्युतपंप जप्त करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगरमधल्या जुना मोंढा परिसरातल्या बजरंग ट्रेडिंग
कंपनीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं निलंबित केला आहे. या कंपनीत ऑईल रिपॅकिंगचं
काम सुरू असताना झालेल्या कारवाईत २३ लाख ३५ हजार ६५४ रुपयांचं संशयास्पद आणि चुकीचं
ब्रँडिंग केलेलं खाद्य तेल जप्त करण्यात आलं. या ठिकाणी स्वच्छता आणि इतर नियमांचं
उल्लंघन झाल्याचंही दिसून आलं.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीला
पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध झाली आहे. आतापर्यंतच्या याद्यांमध्ये
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या १ लाख ४६ हजार ३७१ शेतकऱ्यांची नावं आहेत, त्यापैकी
एक लाख ५ हजार २०१ शेतकऱ्यांचंच आधार प्रमाणीकरण झालं आहे.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक लाख ९७ हजार ९१२ शेतकऱ्यांची
यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण
करून घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment