Saturday, 10 October 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 10 October 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

कॉक्रोज जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कॉक्रोज जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांना ताब्यात घेतले आहे. मुंबईहून विमानाने दिल्लीला अभिजित दीपक पोहोचले होते. विमातळावरच दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मी अटक होण्यासाठीच आलो आहे, असे म्हणत दीपके यांनी यावेळी पोलिसांना कोणताही प्रतिकार केला नाही. अभिजित दीपके यांच्यासोबतच कॉक्रोज जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलनाला पोलिसांनी कोणतीही परवानगी दिलेली नसतानाही दीपके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यासाठीच ते दिल्लीला निघाले होते. परवानगी नसल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतरवर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. कॉक्रोज जनता पार्टीने याआधी दिल्लीत केलेल्या आंदोलनादरम्यान, दिलेल्या सूचना पाळल्या नव्हत्या, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. जंतरमंतरवरील आंदोलनासाठी किमान १० दिवस आधी रितसर परवानगी घ्यावी लागते. कॉक्रोज जनता पार्टीने मात्र केवळ तीन दिवस आधी आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिल्ली पोलिसांकडे दिले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त केला आहे.

****

केंद्रीय पथकाकाकडून आज धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करण्यात येत आहे. धाराशिव तालुक्यात करजखेडा आळणी आणि येडशी शिवारातल्या शेत पिकांची, विहिरीची पथकाने पाहणी केली. केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांच्या पथकाने ही पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांची उपस्थिती होती. खासदार राजेनिंबाळकर यांनी शेत पिकांची झालेली अवस्था मागील कित्येक वर्षांपासून पहिल्यांदा इतकी बिकट झाल्याचं पथकाला सांगितलं. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पंचनामे करताना उपग्रहाद्वारे नुकसान न ठरवता पीक कापणी प्रयोगावरच निकष ठरवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

****

बीड जिल्ह्यातही आज केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात येत आली. केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने स्वयंचलित हवामान केंद्र, बिंदुसरा तलाव आणि विविध गावांतील शेती आणि जलस्रोतांची पाहणी केली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पाहणीत पाणीटंचाई, सोयाबीनचे नुकसान, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी डॉ. विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बिंदुसरा तलावातला उपयुक्त पाणीसाठा पाच टक्क्यांवर आला असून, बीड शहराला दररोज ३८ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. यापैकी २८ दशलक्ष लिटर पाणी माजलगाव धरणातून मिळतं.

****

केंद्रीय पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील चास, कर्जत आणि परिसरातील दुष्काळग्रस्त भागाचीही आज पाहणी केली. पथकप्रमुख के. पोन्नुसामी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

****

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो नेहमी भारताचाच राहील, अशा स्पष्ट शब्दात आज खासदार महिमाकुमारी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. संयुक्त राष्ट्र मंचावर भारताकडून पाकिस्तानच्या आरोपांना त्यांनी तडाखेबंद प्रत्युत्तर दिले. खासदार महिमाकुमारी यांनी पाकिस्तानचे खोटे आरोप धुडकावून लावले. दहशतवादाला नेहमीच खतपाणी घालण्याचा पाकिस्तानचा इतिहास राहिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

****

अमेरिकेचे काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी असाधारण शौर्य दाखवल्याबद्दल भारतीय पायलट कॅप्टन स्मित यांचा सन्मान केला आहे. कॅप्टन स्मित यांनी ३० सप्टेंबर रोजी फ्लाय दुबईच्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. कृष्णमूर्ती म्हणाले की, कॅप्टन स्मित यांच्या धैर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे दुबई ते तेल अवीव या विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. कॅप्टन स्मित यांच्यावर अबूधाबी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे.

दरम्यान, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी जाहीर केले आहे की, कॅप्टन स्मित यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन इस्रायलचा ‘नागरी शौर्यासाठीचा राष्ट्रपती पुरस्कार’ प्रदान केला जाईल.

****

राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी ३६ तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 10 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...