Wednesday, 7 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 7 October 2026

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ७ ऑक्टोबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      *छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी दहा हजार कोटी रुपयांच्या ग्रोथ फंडला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

·      दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय समिती याच आठवड्यात राज्याच्या दौऱ्यावर येणार-मुख्यमंत्र्यांची माहिती

·      पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी "मुख्यमंत्री शौर्य पदक" देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

आणि

·      पहिल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून विजय

****

छोट्या आणि मध्यम उद्योगांमध्ये समभाग अर्थात इक्विटी गुंतवणुकीसाठी दहा हजार कोटी रुपयांचा स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस ग्रोथ फंड स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. या निधीचा मोठा हिस्सा उत्पादन क्षेत्रातल्या छोट्या आणि मध्यम उद्योगांमध्ये गुंतवला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

एकीकृत परिवहन आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. याबाबत माहिती देतांना वैष्णव म्हणाले..

बाईट -  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून पंचवीस वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं संमत केला. मोदी यांनी सात ऑक्टोबर २००२ रोजी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला आणि २०१४ मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. सरकारचे प्रमुख म्हणून ते आज पंचवीस वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत.

पंतप्रधानांचा हा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित आहे, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. या परिवर्तनाच्या वाटचालीत अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची उभारणी, हा मैलाचा दगड ठरला आहे. या कार्याबाबत आज जाणून घेऊ..

अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी हा देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल दिला, त्यानंतर सरकारनं ५ फेब्रुवारी २०२० रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी भूमिपूजन करून मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. त्यानंतर २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

१४ जून २०२५ रोजी राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर साकारलेले भव्य श्रीराम मंदिर आज श्रद्धा आणि संस्कृतीचं महत्त्वपूर्ण केंद्र ठरत आहे.

****

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती याच आठवड्यात सात ते आठ तारखेपर्यंत राज्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. दुष्काळी भागातलं सर्वेक्षण गतीने पूर्ण केलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले... 

बाईट -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशानं स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची काल चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राज्यात आतापर्यंत ४५ टक्क्यांहून अधिक पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनाम्यांचं काम जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणं, चाऱ्याची टंचाई दूर करणं आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचं नियोजन करण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

****

पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी "मुख्यमंत्री शौर्य पदक" देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने कालच्या बैठकीत घेतला. पन्नास हजार रुपये, पदक तसंच प्रशस्तीपत्र अशा स्वरुपाचा हा पुरस्कार, दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात येणार आहे.

शैक्षणिक संस्थांमध्ये, उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधनासाठी सी.एम. सृष्टी अर्थात Scheme for Research, Innovations and Technological Hubs in Higher Education Institutions, ही योजना राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

पोलीस कोठडीतल्या मृत्युप्रकरणी नुकसानभरपाई देण्याबाबतच्या धोरणाला कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देणं, महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९६८ मध्ये सुधारणा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.

****

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महायुती तसंच महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. काल अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी, भाजपचे एम. के देशमुख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी काल अर्ज दाखल केला. माजी मंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान यांच्यासह स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते.

महायुतीकडून सतीश चव्हाण यांनी, तर महाविकास आघाडीकडून दिलीप घुगे या दोघा अधिकृत उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले आहेत. आज या अर्जांची छाननी होणार आहे.

****

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात येत्या १० आणि ११ ऑक्टोबरला विशेष मतदार नोंदणी शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत हे शिबीर घेण्यात येणार असून, पात्र नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

****

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल परळी वैजनाथ तालुक्यातल्या मौजे डाबी इथं दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पाणीटंचाई, पिकांची स्थिती आणि आवश्यक मदतीबाबत माहिती जाणून घेतली. मौजे नागापूर इथल्या वाण प्रकल्पाची पाहणी करून त्यांनी पाणीसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेऊन त्यांनी, ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत बीड जिल्ह्याचा गावनिहाय पाणीटंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.

****

परभणी जिल्ह्यात सेलू आणि जिंतूर तालुक्यांमधल्या सर्व सार्वजनिक जलसाठ्यांच्या ठिकाणी येत्या ३१ तारखेपर्यंत चोवीस तास प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी हे आदेश दिले. या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

****

जनता सहकारी बँकेच्या धाराशिव इथल्या शाखेने मुख्यमंत्री सहायता निधीला पंचवीस लाख रुपये, तसंच कर्नाटक मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही अकरा लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. 

दरम्यान, सेवा संकल्प अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या निपाणी इथं पशुपालकांना काल विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर उपविभागीय कार्यालयातही काल चारा साक्षरता अभियान राबवण्यात आलं.

दरम्यान, सेवा संकल्प अभियानांतर्गत नांदेड जिल्हा रुग्णालयात काल १७१ शालेय बालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी ६२ बालकांवर जालनाच्या श्री गणपती नेत्रालयात मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

****

कर्णधार श्रेयस अय्यरच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर काल पहिल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा आठ गडी राखून पराभव केला. लखनौ इथं झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत विसाव्या षटकात सर्वबाद १७१ धावा केल्या. भारताने हे आव्हान दोन गड्यांच्या बदल्यात ३२ चेंडू शिल्लक असतानाच पार केलं. १० चौकार आणि सहा षटकारांच्या सहाय्याने ४३ चेंडूत १०२ धावा करणारा श्रेयस सामनावीर ठरला. मालिकेतला दुसरा सामना येत्या शुक्रवारी रांची इथं खेळला जाणार आहे

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 7 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...