Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 October
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १० ऑक्टोबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
बुलढाणा संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी
डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी नुकतीच जिल्ह्यातल्या जलप्रकल्पांचा आढावा दौरा केला.
मेहकर तालुक्यातल्या कोराडी मध्यम प्रकल्प आणि संग्रामपूर तालुक्यातल्या चोंढी प्रकल्पातल्या
पाणीसाठ्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पाणीवापराच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना
निर्देश दिले. पाहणीदरम्यान डॉ. देवरे यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद
साधला. कमी पावसामुळे शेती संकटात असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी सोडण्याची
मागणी केली. पिण्याच्या पाण्याची गरज आणि शेतीची मागणी यांचा समतोल राखून लवकरच अंतिम
निर्णय घेण्यात येईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
****
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल आमदार नितीन देशमुख
यांनी केलेल्या कथित वक्तव्याविरोधात अकोला इथं भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सिव्हिल लाईन्स पोलिसांना निवेदन देत आमदार देशमुख
यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
****
अकोला शहरात अवैध सावकारीविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने
मोठी कारवाई सुरू केली आहे. अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे
शहरातल्या तब्बल ३५ ते ४० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये काही व्यावसायिक
प्रतिष्ठाने,
कार्यालये आणि खासगी घरांचाही समावेश आहे. या कारवाईसाठी उपनिबंधक
कार्यालयाकडून दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी विविध ठिकाणी एकाच
वेळी तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात
कोरे धनादेश,
बाँड आणि इतर आर्थिक व्यवहारांशी संबंधित दस्तऐवज आढळल्याची
माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.
****
राजधानी दिल्लीमध्ये सीजेपीच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
दिल्ली पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, दिल्लीमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रेल्वे स्थानके, मेट्रो परिसर आणि प्रमुख रस्त्यांवरही सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये
येणाऱ्या रेल्वेमधील प्रवाशांची रेल्वे पोलीसांकडून चौकशी केली जात आहे. तसेच रेल्वेगाड्यांच्या
डब्यांमध्ये आणि फलाटांवरही तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या
लांब पल्ल्याच्या रेल्वे शेजारील राज्यांमधील विविध स्थानकांवर थांबवून त्यांची तपासणी
केली जात असल्याचे वृत्त आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे संरक्षण दल यांना संयुक्तपणे
तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या तपासणीमुळे दिल्लीकडे
येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दोन ते चार तास उशिराने धावत असल्याची माहिती आहे.
****
ऑस्ट्रेलियातल्या बरहम इथं सुरू असलेल्या जागतिक लॉन बाउल्स
अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुतुल सोनोवाल याने पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी
केली आहे. या स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून देणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला
आहे. आसामच्या ४३ वर्षीय पुतुल याने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत ही कामगिरी
केली. उपांत्यपूर्व फेरीत त्याने सिंगापूरच्या हॅरिमन युएन याचा पराभव करून उपांत्य
फेरीत स्थान निश्चित केलं होतं. आसाम पोलिस दलात कार्यरत असलेल्या पुतुल हा भारतातल्या
आघाडीच्या लॉन बाउल्स खेळाडूंपैकी एक आहेत. यंदाच्या आशियाई लॉन बाउल्स अजिंक्यपद स्पर्धेत
त्याने पुरुष एकेरीचं सुवर्णपदक जिंकलं होतं.
****
राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी ३६ तालुक्यांचं सर्वेक्षण
करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. प्राप्त तक्रारींची दखल घेत, २० टक्के निकष शिथील करून पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले, यासंदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. तक्रारी प्राप्त झालेल्या १८ तालुक्यांमध्ये
प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार
असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
राज्यात आतापर्यंत सुमारे एक कोटी हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त
पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे येत्या चार
ते पाच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी
दिली. काल सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थित्रीची पाहणी केल्यानंतर
भरणे बोलत होते.
****
भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी
शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग यांनी काल ही घोषणा
केली. दरम्यान,
कॅप्टन मच्छार यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागातर्फे एक
विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे.
****
भारत कोणाच्याही अण्वस्त्र धमक्यांना घाबरणार नाही आणि कोणत्याही
दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल, असा
इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनचे
वरिष्ठ सल्लागार अनमोल शेर बेदी काल न्यूयॉर्क येथे जिनिव्हा निःशस्त्रीकरण परिषदेदरम्यान
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पहिल्या समितीच्या बैठकीत बोलत होते. जम्मू आणि काश्मीरमधील
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन
सिंदूर’चा संदर्भ देत, बेदी म्हणाले की, भारताने तणाव वाढू नये या उद्देशाने आत्मसंरक्षणासाठी जाणीवपूर्वक आणि लक्ष्यित
कारवाई केली. बेदी यांनी इशारा दिला की, दहशतवादी कारवाया लपवण्यासाठी
अण्वस्त्र धमक्यांचा वापर केल्यास तणाव वाढण्याचा धोका आहे.
****
No comments:
Post a Comment