Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12
October 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
जेव्हा जेव्हा घटनात्मक हक्कांचं
उल्लंघन होतं, तेव्हा न्यायालयांनी त्यात हस्तक्षेप
केलाच पाहिजे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती
सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या ३३ व्या
वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. मानवाधिकार आयोगांनी प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी
करावी, प्रशासकीय आणि संस्थात्मक त्रुटी
शोधून काढाव्यात आणि इतरत्र दुर्लक्षित राहणाऱ्या किंवा अदृश्य ठरणाऱ्या समस्यांना
संस्थात्मक पातळीवर प्राधान्याने समोर आणावं, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं.
मानवी हक्क हे मानवी प्रतिष्ठेशी
थेट जोडलेले असून त्यात आरोग्य सेवा, अन्न, निवारा, उपजीविकेची साधने आणि स्वच्छ पर्यावरण यांचा समावेश
होतो, असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी
सांगितलं. गेल्या ३३ वर्षांत आयोगाने २४ लाखांहून अधिक गुन्ह्यांची किंवा प्रकरणांची
नोंद केली असून, त्यापैकी २३ लाखांहून अधिक प्रकरणं
निकाली काढली आहेत; म्हणजेच ९८ टक्क्यांपेक्षा जास्त
प्रकरणे निकाली काढण्याचा प्रभावी दर साध्य केला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
याशिवाय, 'एनएचआरसी इंडिया' या मोबाईल ॲप्लिकेशनच्या उपलब्धतेमुळे हा आयोग सर्वसामान्यांसाठी
अधिक सुलभ आणि पोहोचण्यायोग्य बनेल, ज्यामुळे
नागरिकांना सहजरीत्या तक्रारी दाखल करणं, त्यांच्या
स्थितीचा मागोवा घेणं आणि माहिती मिळवणं सोपं होईल, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. कस्टडीतला छळ किंवा
मृत्यू, वेठबिगारी, औद्योगिक शोषण, शोषिक आणि वंचित घटकांच्या हक्कांचं रक्षण यांसारख्या
गंभीर प्रकरणांमध्ये आयोगानं केलेला हस्तक्षेप मानवाधिकार रक्षणात त्याची महत्त्वपूर्ण
भूमिका स्पष्ट करतो, असंही त्यांनी नमूद केलं.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि
मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्षांनी आज सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा
काढण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करण्यासाठी
सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी ही विनंती नाकारली. संबंधित बाबी सर्वोच्च
न्यायालयात आधीच न्यायप्रविष्ट असल्याचं त्यांनी ईमेलद्वारे स्पष्ट केलं असून, राहुल गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे याचिका
दाखल करण्याचा पर्याय दिला आहे.
दरम्यान, दिल्लीत प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा
व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संवेदनशील भागांत मोठ्या संख्येनं निमलष्करी दल तैनात
करण्यात आलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा
काढण्याची विरोधकांची भूमिका संविधानविरोधी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सरन्यायाधीशांनी आपल्या घटनात्मक
कर्तव्यांचे पालन करत, आपण कोणत्याही मोर्चाला भेटू
शकत नाही, असे स्पष्ट केलं. हा निर्णय
योग्य असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
****
‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट’ मालिकेतली
तिसरी युद्धनौका ‘मांगरोळ’ आज सकाळी मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं भारतीय नौदलात दाखल
झाली. ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्य वापरून तयार केलेली 'मांगरोळ', युद्धनौकांची रचना, बांधणी आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तसंच सेन्सर्सच्या
एकत्रीकरणातील भारताच्या वाढत्या क्षमतेचं दर्शन घडवते. सरकारच्या 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर
भारत' उपक्रमांतर्गत कोचीन शिपयार्ड
लिमिटेडने तयार केलेली ही युद्धनौका, संरक्षण
क्षेत्रात जहाजबांधणीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेलं आणखी एक महत्त्वाचं पाऊल आहे.
****
देशात २०२५-२६ या वर्षात डाळींच्या
एकूण उत्पादनात वाढ होऊन ते २७४ लाख टन झालं आहे. डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता
आणण्यासाठी सुरू केलेल्या अभियानामुळे डाळींच्या आयातीतही घट झाल्याचं केंद्र सरकारनं
म्हटलं आहे. सरकारनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, डाळींची आयात सुमारे ३१ टक्क्यांनी घटून ४६ हजार
४२७ कोटी रुपयांवरून ३१ हजार ७९३ कोटी रुपयांवर आली आहे. तर डाळींच्या निर्यातीत १३
टक्क्यांनी वाढ होऊन ती सुमारे ९६९ कोटींवर पोहोचली आहे.
****
मराठी लोककला आणि चित्रपटसृष्टीतल्या
ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन
झालं, त्या ७३ वर्षांच्या होत्या.
लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्यांनी
आपल्या अभिनयाची आणि नृत्यकलेची वेगळी ओळख निर्माण केली. ग्रामीण महाराष्ट्रातल्या
लोककलेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘राघू मैना’ या चित्रपटांमधल्या
भूमिकांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले होते.
****
No comments:
Post a Comment