Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 14
October 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रूपयांची
अग्रीम मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयाची
तत्काळ अंमलबजावणी केली जाणार असल्याचं त्यांनी आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी
बोलताना सांगितलं. राज्यातल्या आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आता एकूण ३०५ तालुक्यात १२ दुष्काळी सवलती आणि उपाययोजना
लागू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना
दिलासा देण्याऐवजी बँका, पतसंस्था आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा
लावला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वसुलीसाठी
शेतकऱ्यांच्या घरी जाणं, त्यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे काढणं आणि त्यांच्यावर दबाव
टाकणं असे प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारने तातडीने
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि कर्जवसुलीच्या नावाखाली सुरू असलेला
त्रास थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली.
****
जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये खर्चाच्या घटकांबरोबरच
आता विश्वासार्हता आणि सायबर सुरक्षा या गोष्टींनाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत
असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी
म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित 'ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम'मध्ये ते आज बोलत होते. सेमीकंडक्टर डिझाईन, उत्पादन तसंच तयार उत्पादनांच्या चाचणी क्षेत्रात भारताला एक
विश्वासू आणि जबाबदार भागीदार म्हणून प्रस्थापित करण्याचं देशाचं उद्दिष्ट आहे. शाश्वत
आणि दीर्घकालीन उत्पादनासाठी संपूर्ण परिसंस्था विकसित करणं अत्यंत आवश्यक असल्याचंही
वैष्णव यांनी नमूद केलं. देशाची आर्थिक, वित्तीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रे अधिक सक्षम आणि लवचिक बनवणं
हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेचा
फटका बसू नये आणि आर्थिक संकटाच्या काळातही देशाचा विकास दर स्थिर राहावा यासाठी सरकार
देशांतर्गत अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर देत असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
****
प्रशासकीय अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. या संदर्भात आज
राज्य शासनानं परिपत्रक जारी केलं. यापूर्वी या पदावर असलेले महेंद्र हरपाळकर यांचा
प्रतिनियुक्तीचा कालावधी एक ऑक्टोबर २०२६ पासून प्रशासकीय कारणामुळे संपुष्टात आणण्यात
आल्यानं हा पदभार कटियार यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत देण्यात आला आहे.
****
धाराशिव इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर इथल्या बसस्थानकात
विशेष विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. शेतकरी कुटुंबातल्या ग्रामीण महिलांची
उत्पादनं विक्री करण्यासाठी आणि शाश्वत उपजीविकेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा आगळावेगळा
उपक्रम दुष्काळाची जखम भरून काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना उपस्थितांनी यावेळी
व्यक्त केली.
****
नवरात्रोत्सवानिमित्त लातूरहून तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या
भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विशेष रस्ता सुरक्षा अभियान
राबवण्यात येत आहे. लातूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरून मोठ्या संख्येने
भाविक रात्रीच्या वेळी पायी प्रवास करतात. अंधारात हे भाविक वाहनचालकांना स्पष्टपणे
दिसावेत, यासाठी त्यांच्या बॅगवर रिफ्लेक्टर
लावण्यात येत आहेत. त्यामुळे वाहनांच्या प्रकाशात भाविक अधिक स्पष्टपणे दिसण्यास मदत
होणार असून अपघाताचा धोका कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
****
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या
२०२६ ते २०३१ या कालावधीसाठीच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
बँकेच्या एकूण १९ जागांसाठी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान
होणार आहे. १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, २१ ऑक्टोबर ते चार नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज मागे
घेता येतील. पाच नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचं
वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीत ९९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात दुष्काळाची दाहकता
वाढली असून, शेतकऱ्यांवर उभ्या पिकांवर नांगर
फिरवण्याची वेळ आली आहे. कवठळ इथले शेतकरी विनोद जाधव पाटील यांनी पाण्याअभावी आपल्या
आठ एकर ऊस आणि सहा एकर केळीच्या बागेवर रोटोव्हेटर फिरवला आहे. पावसाची दडी आणि भूजल
पातळीत झालेली घट यामुळे शेतकऱ्यांची अशी दुर्दशा पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याचं
आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment