Friday, 9 October 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 09 October 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमनी शिवारात पाहणी केली. यावेळी शेतकरी विलास देविदास शिंदे यांच्या शेतातील पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे. राज्याचे कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह स्थानिक प्रशासनातले अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यांतल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची हे पथक माहिती घेणार आहे. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी पथकाची जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत महिला आणि बाल विकासविषयक विभागीय शिखर परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. पोषण, बाल शिक्षण, बाल संरक्षण, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण या चार प्रमुख विषयांवर या परिषदेत भर देण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं, उत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणं आणि योजनांच्या अंमलबजावणीतील आव्हानांवर उपाय शोधणं, हा या परिषदेचा उद्देश आहे. सहकारी संघराज्यवाद बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेली ही दुसरी विभागीय शिखर परिषद आहे.

****

प्रादेशिक सैन्य अर्थात टेरिटोरियल आर्मी स्थापना दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व अधिकारी, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचं अभिनंदन केलं आहे. प्रादेशिक सैन्य ‘नागरिक भी, सैनिक भी’ या भावनेचं प्रतीक आहे, जी सामान्य नागरिकांचा राष्ट्राची सेवा करण्याचा दृढनिश्चय दर्शवते असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. सीमांचं रक्षण करण्यापासून ते आपत्कालीन मदत आणि राष्ट्र उभारणीपर्यंत, या सैनिकांनी शौर्य, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेची उत्कृष्ट परंपरा जपली आहे. त्यांनी राष्ट्रसेवेप्रती असलेल्या त्यांच्या अढळ वचनबद्धतेला आणि एका सुरक्षित, बलवान तसंच आत्मनिर्भर भारतासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला सलाम करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

गेल्या दशकात भारताच्या दूरसंचार आणि डिजिटल क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय परिवर्तन झालं असून ही क्षेत्रे जागतिक स्तरावर उदयास आली असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मोबाईल काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत स्वदेशी 4G स्टॅक विकसित करणारा जगातला पाचवा देश ठरला असल्याचं त्यांनी सांगितलं. एका गिगाबाइट डेटाची किंमत २६८ रुपयांवरून आठ रुपयांपेक्षा कमी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. २०३० पर्यंत 5G वापरकर्त्यांची संख्या ५५ कोटींवरून एक अब्जपर्यंत दुप्पट करण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं सिंधिया यांनी सांगितलं.

****

दरम्यान, सिंधिया यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करत राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या समर्पित सेवेबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. डिजिटल संवादाच्या युगात, भारतीय टपाल सेवा लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं सिंधिया यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

गुन्हे आणि गुन्हेगार नेटवर्क आणि प्रणाली - CCTNS च्या प्रभावी अंमलबजावणीत अकोला जिल्हा पोलिस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अकोला पोलीस दलाने सलग दुसऱ्यांदा हा क्रमांक पटकावला असून, अमरावती परिक्षेत्रातही प्रथम स्थान मिळवलं आहे. जून २०२६ च्या मासिक मूल्यांकनात अकोला पोलिसांनी २०१ पैकी तब्बल २०१ गुण म्हणजेच १०० टक्के गुण मिळवत राज्यातल्या ५३ पोलीस घटकांमधून अव्वल स्थान पटकावलं.

****

भंडारा जिल्ह्यात साकोली इथल्या शासकीय धान्य गोदामातून लाभार्थ्यांना वाटण्यासाठी ठेवलेल्या तांदळावर मजुरांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील दीड वर्षांपासून या शासकीय तांदूळ गोदामात मजुरीवर असलेल्या मजुरांनी चक्क गोदामातले ३१६ कट्टे तांदूळ चोरी केले. गोदाम व्यवस्थापक दीपक चौधरी यांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत नऊ मजूर आणि दोन राईस मिल मालकांना अटक केली.

****

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातला दुसरा टी-ट्वेंटी सामना आज रांची इथं खेळला जाणार आहे. सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...