Saturday, 3 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 03 October 2026

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०३ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही बालसंगोपन रजेचा लाभ देण्याची महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस

·      एक हजार दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

·      पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार

·      शेतीचे अचूक पंचनामे करून अधिकाधिक मोबदला देण्यासाठी सरकार प्रयत्नशील-महसूल मंत्र्यांची ग्वाही

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत काल आणखी सहा सुवर्णपदकं-भारताची पदकतालिकेत पाचव्या स्थानी झेप

****

राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्र सरकारकडे बालसंगोपन रजेबाबतच्या शिफारशी सादर केल्या आहेत. यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही प्रसूती तसंच बालसंगोपनविषयक लाभ देण्यासह, खाजगी क्षेत्रात बालसंगोपन रजा लिंग-निरपेक्ष करणं, भरपगारी पितृत्व रजा अनिवार्य करणं आणि २०३० पर्यंत पाच लाख शिशु-संगोपन केंद्रं उभारणं आदी शिफारशींचा समावेश आहे. ९० टक्क्यांहून अधिक महिला कामगार, प्रभावी संरक्षणाच्या कक्षेत येत नसल्याचं निदर्शनास आल्याने, आयोगाने या शिफारसी केल्या. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला सार्वत्रिक आणि कायदेशीररित्या अंमलबजावणीयोग्य करण्याचा प्रस्तावही आयोगानं दिला आहे. दत्तक आणि प्रसुतीपश्चात मातांसाठी रजेचा कालावधी १२ आठवड्यांवरून २६ आठवडे करण्याच्या प्रस्तावाचाही यात समावेश आहे.

****

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि महिला-बालविकास विभागानं संयुक्तपणे एक हजार दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. या मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीनं काम करावं, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

पुण्याच्या डेक्कन पदव्युत्तर महाविद्यालय आणि संशोधन संस्थेत अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. आज अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला झालेला हा निर्णय महाराष्ट्रासह देश-विदेशातील मराठीजनांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीनं प्रवाशांसाठीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या चार आणि सात दिवसांचे ऑनलाइन पास मिळवता येणार आहेत. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

****

दुष्काळग्रस्त शेतीचे अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेकटा मंडळात पीक स्थितीची पाहणी केल्यानंतर बावनकुळे बोलत होते. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळावा, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचं तसंच डीपीडीसी जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी दुष्काळी कामांकडे वळवल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट -  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात दगडवाडी तसंच बदनापूर तालुक्यातील वरुडी इथं महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. जालना विश्रामगृहात महसूलमंत्र्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५७वी जयंती तसंच दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदराजंली वाहण्यात आली. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी स्वच्छता मोहिमेसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आलं.

****

५७वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फी येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यातील पणजी इथं आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाच्या वृत्तसंकलनासाठी माध्यम प्रतिनिधींना येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. अटल इनोव्हेशन मिशन हा याचाच एक भाग आहे. आज या अभियानाविषयी जाणून घेऊ,

विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी सरकारनं अटल इनोव्हेशन मिशनची सुरुवात केली. नीती आयोगाच्या अंतर्गत २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शाळांपासून स्टार्टअपपर्यंत नवोन्मेष परिसंस्था निर्माण करणे हा आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशभरात दहा हजार अटल टिंकरिंग लॅब कार्यरत असून, त्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी नवकल्पना आणि तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत.

****

जपानमध्ये आईची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आता सोळा सुवर्णपदकांसह एकूण ७६ पदकं जिंकून पदकतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

काल दिवसभरात भारताने सहा सुवर्णपदकांची कमाई केली. हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने चीनच्या संघाचा एक शून्यने पराभव केला. 

कुस्तीपटू सुजीत कलकल, तर मुष्टियुद्धात अंकुश पंघाल, परवीन हुडा तसंच लवलिना बोरगोहेन यांनी सुवर्णपदकं पटकावली.

महिलांच्या रिकर्व्ह तिरंदाजी संघाने दक्षिण कोरियाचा ५-३ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकर्व्ह संघाला मात्र, रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय क्रीडा प्राधिकरण-साई केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या यशदीप भोगे याने धीरज बोम्मदेवरा आणि नीरज चौहान यांच्या साथीने ही कामगिरी केली. रिकर्व्ह मिश्र सांघिक तीरंदाजी प्रकारातही भारताने रौप्यपदक पटकावलं.

किक व्हॉलीबॉलमध्ये भारताच्या पुरुष गटाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या डिंगी सेलिंग प्रकारात नेत्रा कुमाननने कांस्य पदक जिंकले.

दरम्यान या स्पर्धेत आज पुरुषांच्या क्रिकेट मध्ये भारत आणि पाकिस्तान संघात सुवर्णपदकासाठी अंतिम सामना होणार आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेतही आज भारत आणि मलेशिया संघात अंतिम लढत होणार आहे.

या स्पर्धेत आतापर्यंत १६ सुवर्ण, २५ रौप्य आणि ३५कांस्य पदकांसह भारताने एकूण ७६ पदकं पटकावली आहेत.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान च्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. भारतानं या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.

****

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि विविध सवलती देण्याची मागणी शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलं आहे.

****

लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी काल माकणी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पाला भेट देऊन उपलब्ध पाणीसाठा आणि पाणीपुरवठा नियोजनांचा आढावा घेतला.  या प्रकल्पात शिल्लक असलेला २१ टक्के पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यात मौजे कुशावाडी इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती, नोंदणी - अचूकता याबाबत पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी देगलूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय प्रमुखांची आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.

दरम्यान, विष्णुपुरी प्रकल्पातील अन्तेश्वर उच्च पातळी बंधारा, विष्णुपुरी उच्च पातळी बंधारा तसंच रेणापूर सुधा लघु प्रकल्पातील संपूर्ण पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहनही पालकमंत्र्यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवून जलसुरक्षा निर्माण करण्यासाठी सार्वजनिक तसेच ग्रामीण भागात १० हजार लहान जलसाठे निर्माण करण्याचं नियोजन असल्याचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 04 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...