Monday, 5 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 5 October 2026

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०५ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      विकसित भारताच्या जडणघडणीत भौतिक आणि पायाभूत सुविधांइतकंच बळकट संस्था आणि भक्कम प्रशासनाला महत्त्व असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन

·      एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक, विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन

·      मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी

·      नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे अचूकपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रशासनाला सूचना, चारा टंचाईवर मात करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ‘चारा साक्षरता अभियान’

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेची सांगता, पुढील स्पर्धा कतारमध्ये

****

विकसित भारताच्या जडणघडणीत भौतिक आणि पायाभूत सुविधांइतकंच बळकट संस्था आणि भक्कम प्रशासनाला महत्त्व असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्था - ICSI च्या ५८ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. ICSI आणि ICMI सारख्या सनदी लेखापालांच्या संस्था विकसित भारताचे महत्त्वाचे संस्थात्मक स्तंभ असल्याचं त्यांनी नमूद केलं. विश्वास, पारदर्शकता आणि कंपनी प्रशासन या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या अदृश्य पायाभूत सुविधा असून, शाश्वत आर्थिक प्रगतीसाठी गुंतवणूकदारांचा विश्वास आवश्यक असल्याचं ते म्हणाले. देशात उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्सला प्रोत्साहन देत, शाश्वत विकासाच्या क्षेत्रात या संस्थेनं जागतिक मानदंड निर्माण केले, या शब्दांत उपराष्ट्रपतींनी ICSI चा गौरव केला. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी ICSI चे सामूहिक प्रयत्न भारताला जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्यास सहाय्यभूत ठरतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोग - एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून, तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशीनंतर पुढील कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, त्यानंतरही आंदोलन सुरू का ठेवलं, असा प्रश्नही मोहोळ यांनी उपस्थित केला.

****

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदमुक्त करण्याच्या मागणीसाठी काल मुंबईत मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तसंच विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी, तसंच देशभरात आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

****

राज्य विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १२ अर्ज दाखल झाले आहेत, तर आतापर्यंत ९७ इच्छुकांनी १७४ अर्ज नेले आहेत. उद्या सहा ऑक्टोबर दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे.

****

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या विनियोगाची फेरतपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातल्या सहा सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेल्या ५६४ कोटी ५४ लाख रुपयांच्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज मंजूर करण्यात आलं होतं, त्याच कारणासाठी झाला आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी याबाबतच्या सूचना दिल्या.

****

एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधीकरण - FSSAIनं दिले आहेत. या जिरेपुडीत ॲझोक्सि स्ट्रोबिन आणि थायमे थॉक्सॅम हे दोन घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर ही देखील नागरिकांची राष्ट्रभावना अधिक बळकट करणारी ठळक कारवाई होती. आज या कारवाईविषयी जाणून घेऊ,

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका अधिक कठोर आणि स्पष्ट झाली असून, 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून दहशतवादाविरोधातील लढ्याला नवा मापदंड आणि 'न्यू नॉर्मल' प्राप्त झाला आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. दहशतवादाचे सूत्रधार आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांकडं वेगवेगळं पाहिलं जाणार नसल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतानं दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याची आपली रणनीती अधिक निश्चित, स्पष्ट आणि कठोर केली असल्याचा संदेश सरकारनं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिला

****

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड तसंच पाटोदा तालुक्यातल्या विविध गावांना भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे अचूकपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचं आवाहनही मुंडे यांनी केलं. 

दरम्यान, बीड तालुक्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. तालुक्यातल्या २३८ गावांसाठी ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश असलेली पथकं नियुक्त करण्यात आली आहेत.

****

दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ‘चारा साक्षरता अभियान’ व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल ही माहिती देत, वैरण व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं. चाऱ्याची पौष्टिकता वाढवणं, कडबा कुट्टीचा वापर वाढवणं तसंच हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून त्याची योग्य पद्धतीनं साठवणूक करणं, यावर त्यांनी विशेष भर दिला.

****

विसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा काल शानदार समारंभात समारोप झाला. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या स्पर्धांमधे भारताने २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांसह एकूण ८५ पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथं स्थान पटकावलं. नेमबाजीमध्ये दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरू धांडाने या समारोप समारंभात ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचं नेतृत्व केलं. या खेळांची ज्योत आणि ध्वज २०३० च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमान असलेल्या कतारकडे सुपूर्द करण्यात आले.

दरम्यान, भारतीय गोल्फ युनियननं या स्पर्धेतली देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला १० लाख रुपये पुरस्कार जाहीर केला आहे.

****

राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेला काल परभणी इथं सुरुवात झाली. राज्य शासनाचा क्रीडा विभाग, परभणी जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आणि परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सन्मान होणार आहे. पुढच्या सोमवारी १२ ऑक्टोबरला नवी दिल्लीत आयोजित विशेष कार्यक्रमात हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. या योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीडसह नऊ जिल्ह्यांमधून प्रत्येकी चार प्रतिनिधींही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 5 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...