Tuesday, 13 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 October 2026

Time 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

·      रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपचारांचे शुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

·      एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस पक्षाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान, काँग्रेस देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

आणि

·      नाशिक कुंभमेळ्यात ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते महाध्वजारोहण आणि गोदाआरती

****

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती सादर करण्याच्या मुदतीत निवडणूक आयोगाने येत्या २६ ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे. अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणं, नोंदींमध्ये दुरुस्ती करणं तसंच आवश्यकतेनुसार हरकती दाखल करण्यासाठी ही मुदतवाढ महत्त्वाची आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी तसंच नवमतदारांनी या मुदतीचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

****

रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपचारांचे शुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहे. आरोग्यसेवेतल्या नियमांचं प्रभावीपणे पालन करून पारदर्शकता वाढवणं, रुग्णांना माहितीपूर्ण निर्णय घेता यावेत आणि देयकांशी संबंधित वाद कमी व्हावेत, यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. वैद्यकीय आणि आयुष व्हिसावर भारतात येणाऱ्या परदेशी रुग्णांसाठी उपचारांच्या पॅकेजचे दर पारदर्शकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे.

****

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका राहुल गांधी यांनी न्यायालयात दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून मोर्चेकऱ्यांना भेटायला नकार दिला. मात्र इतर याचिकांबरोबरच सदर याचिकाही विचारात घेऊ, असं सांगितलं.

****

देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निवेदन स्वीकारण्याच्या आग्रही मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काल नागपुरात वृत्तसंस्थेशी बोलत होते. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे घटनाविरोधी असून, विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही, हेच यातून सिद्ध होतं, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं तोंडावर काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली. आंदोलनात सहभागी आमदार अंबादास दानवे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करुन सोडून दिलं.

****

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेत कृषी उत्पादकता वाढवण्याच्या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नवी दिल्लीत काल यासंदर्भात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या योजनेच्या दुसऱ्या वर्षात प्रत्यक्ष परिणामांवर भर देण्याचं आवाहन केलं.

****

शारदीय नवरात्रोत्सवाचा आज तिसरा दिवस असून, या दिवशी आदिशक्तीच्या चंद्रघंटा स्वरुपाची पूजा केली जाते. काल तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा झाल्यानंतर छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी आणि भाविक उपस्थित होते.

****

नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ इथं येत्या ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती मुर्मू, यांच्या हस्ते महाध्वजारोहण आणि गोदाआरती होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. केंद्र सरकारनं सुरु केलेली सागरमाला परियोजना, हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज याविषयी जाणून घेऊ –

देशातील बंदरांचा विकास, सागरी वाहतूक अधिक कार्यक्षम करणे आणि मालवाहतुकीचा खर्च कमी करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं सागरमाला परियोजना सुरु केली. एप्रिल २०१६ मध्ये या योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. देशातील बंदरांचं आधुनिकीकरण, बंदरांशी रस्ते आणि रेल्वेद्वारे संपर्क वाढवणे, किनारी नौवहनाला प्रोत्साहन देणे आणि बंदरांच्या आसपास औद्योगिक विकासाला चालना देणे, ही या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बंदरांची कार्यक्षमता वाढवणे, वाहतुकीचा खर्च कमी करणे, निर्यातीची स्पर्धात्मकता सुधारणे आणि किनारपट्टीवरील रोजगारनिर्मितीला चालना देणे, या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणे हे सागरमाला परियोजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं काल पुण्यात दीर्घ आजाराने निधन झालं, त्या ७३ वर्षांच्या होत्या. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या माळेगाव इथं जन्मलेल्या मधू कांबीकर यांनी चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत ७५ हून अधिक नाटकं आणि चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या. ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. ‘एक होता विदूषक’, ‘बिनकामाचा नवरा, ‘डेबू’, झपाटलेला, ‘येऊ का घरात’ आदी चित्रपटातून कांबीकर यांनी साकालेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत. ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘राघू मैना’ या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी त्यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मधू कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिवावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात काल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते दहा रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं. रोटरी क्लब ऑफ जालना आणि एस.आर.जी. पत्ती स्टील या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून ६०० क्षयरुग्णांना कोरड्या पोषण आहाराचं वितरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संबंधित संस्थांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

****

लातूर जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा लातूरच्या पालक सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिल्या आहेत. त्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होत्या. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पेठ इथं जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवादही साधला.

****

धाराशिव जिल्ह्यात आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याच्या आणीबाणीचं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात धरणांतला पाणीसाठा सात टक्क्यांच्या खाली गेला आहे. त्यामुळे, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...