Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 11 October 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ६.१०
****
· पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूमध्ये १३ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या
विकास प्रकल्पांचं उदघाटन,
पायाभरणी
· दुष्काळी परिस्थितीमुळं शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण
नागरिकांना आधार देण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची माहिती
· कॉकरोच जनता पार्टीचे अटकेतले नेते अभिजित दिपके, आशुतोष
रांका आणि सौरव दास यांची सुटका
आणि
· महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये परभणी, बीड, छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यांची आघाडी
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
चेन्नईतील आयआयटी मद्रास इथं तामिळनाडूतल्या १३ हजार कोटी रुपयांहून अधिक
खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये
सुमारे तीन हजार ७०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग विकासकामांसह बंदर
पायाभूत सुविधा,
रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकास, पेट्रोलियम
आणि वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील उपक्रमांचा समावेश आहे. यावेळी तामिळनाडूचे
मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय उपस्थित होते. या प्रकल्पांमुळं दळणवळण अधिक सुलभ होईल, उद्योग-
व्यापाराला चालना मिळेल आणि राज्यातल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण
होतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आयआयटी मद्रास येथील सुधा
गोपालकृष्णन ब्रेन सेंटरचं राष्ट्राला समर्पण केलं तसंच मेंदूला होणाऱ्या
रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे उद्भवणाऱ्या पक्षाघाताच्या अभ्यासासाठी
तयार करण्यात आलेला ‘सी-स्ट्रोक’ हा मेंदूचा विशेष संदर्भ नकाशा पंतप्रधानांनी
प्रकाशित केला.
****
राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर शेतकरी,
शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ
महिने आधार देण्यासाठी रोजगारनिर्मिती, अन्नधान्य वितरण, पिण्याचं
पाणी तसंच पशुधनासाठी चारा-पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत
झालेल्या बैठकीत त्यांनी तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक पद्धतीनं दुष्काळ
निवारणाच्या उपाययोजना राबवण्यावर भर दिला. पावसातील दीर्घ खंडामुळं सोयाबीनसह कापूस, तूर
आणि ऊस पिकांचं नुकसान झालं असून, रब्बी आणि उन्हाळी हंगामातही
शेतकऱ्यांना नुकसान भरून काढण्याची संधी कमी असल्याचं ते म्हणाले. ग्रामीण भागात
टँकरद्वारे पाणीपुरवठा,
जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, जलसंधारणाची कामं
आणि आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी नमुद केलं. ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध पाण्याचे
पहिले आरक्षण पिण्यासाठी करण्यात आलं असून, नागरिक आणि पशुधनाच्या
पाण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी
दिली. केंद्रीय पथकानं जालना, बीड, धाराशिव तसंच अहिल्यानगर, सोलापूर, वाशिम
आणि यवतमाळ जिल्ह्यांत दुष्काळग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी
संवाद साधला. पथकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर मदत प्रक्रिया गतिमान
होण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केली.
****
राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज
विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध
पंचायतराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला. दुष्काळावर मात करण्यासाठी
जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
अभियानाचा हा दुसरा टप्पा ११ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबवलं
जाणार असून,
यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव
आणि नाल्यांचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं
पाणी साठवणं आणि वृक्षलागवड यांसारख्या जलसंधारणाच्या ११ प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे.
****
राज्यात साडेतीन शक्तिपीठांच्या
मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय
नवरात्रौत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.
कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची
रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तिपीठांमध्ये विधीवत घटस्थापना
झाली. घरोघरी तसंच अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांमधेही घटस्थापनेचा
कार्यक्रम झाला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र
फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला
नवरात्रौत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी
मंदिरातील कल्लोळतीर्थापासून, विधिवत घटाची मिरवणूक काढण्यात आली.
श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण
पुजार यांनी सपत्नीक मंदिरात देवीच्या सिंह गाभाऱ्यात या घटाची स्थापना केली. बीड
शहरातही खंडेश्वरी देवी मंदिर आणि श्री तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात
घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत आणि
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्णपुर इथंल्या श्री तुळजाभवानी माता
मंदिरात नवरात्र उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. मंदिराचे
संस्थापक अध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सकाळी सात वाजता कर्णपुरा
माता मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. उत्सवाच्या काळात सुरक्षेसाठी पोलिस
कायम सेवेत असतील,
असं छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी
म्हटलं आहे.
****
दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले
कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास
यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती
सीजेपीनं दिली. सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत
भारतीय जनता पक्षाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी
केला.
****
दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची
सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च
न्यायालयानं दिले आहेत. तसंच, या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील, याची
खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन
केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर
सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात
सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची
काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण
मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना
बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही, तसंच वाहतुकीच्या नियमांचं
पालन करून फिरण्याची मोकळीक राहील, असंही न्यायालयानं यावेळी
स्पष्ट केलं.
****
राज्य शासनाच्या सेवा संकल्प
अभियानांतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये
मराठवाड्यातील परभणी,
बीड,
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांनी सरस कामगिरी बजावली आहे.
राज्यात एकूण २ हजार ३२७ ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून, महिला
शेतकरी प्रमाणपत्र निर्मितीत बीड जिल्ह्यानं १७ हजार ८८७ प्रमाणपत्रांसह राज्यात
दुसरं स्थान मिळवलं आहे. परभणी जिल्हा १८ हजार ८६३ प्रमाणपत्रांसह प्रथम
क्रमांकावर आहे. ग्रामसभा आयोजनात छत्रपती संभाजीनगर जिल्हा १९१, परभणी
१६५ आणि नांदेड जिल्हाही १४४ ग्रामसभांसह आघाडीवर आहेत. या अभियानामुळे महिला
शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळण्यासह शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
****
अमळनेर इथं झालेल्या ‘प्रगतिशील
महाराष्ट्र-२०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनात महावितरणच्या दालनाला ‘सर्वोत्कृष्ट
दालन’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची
माहिती देण्यासाठी या प्रदर्शनात एकूण ७५ दालनं उभारण्यात आली होती. महावितरणच्या
दालनाची प्रभावी मांडणी आणि ग्राहकांशी साधलेला संवाद यामुळं या दालनाला
सर्वोत्कृष्ट दालनाचा बहुमान मिळाल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात माजलगाव जलाशयातून मंगरूळ
एक आणि मंगरूळ दोन या ठिकाणी होत असलेल्या अवैध पाणी उपशाविरोधात काल प्रशासनाच्या
संयुक्त पथकाकडून धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अवैध पाणी उपसा करणाऱ्या तीन
वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल ३५० पाण्याच्या मोटारी आणि ५० सोलर पॅनेल काढून
टाकण्यात आले आहेत.
****
बीड जिल्ह्यातील तरुणींना व्यावसायिक
वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘गिव्हिंग विंग्स टू फ्लाय’ हा
करिअर मार्गदर्शन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आज उत्साहात झाला. जिल्हा
प्रशासन, इंडिगोच्या सी एस आर उपक्रमांतर्गत आणि ‘भारत केअर्स’नं हा उपक्रम घेतला.
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार तसंच जिल्हाधिकारी
विवेक जॉन्सन यांच्या पुढाकारानं जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमास
सुरुवात झाली आहे.
****
नोकरीचं आमिष दाखवून अनेक लोकांची एक
कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर पोलीसांनी तीन जणांविरोधात
गुन्हा दाखल केला आहे. तीन जणांनी एका नोकरी देण्याचा दावा करणाऱ्या कंपनीच्या
माध्यमातून आपल्यासह इतर अनेकांची नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली असा
आरोप एका महिलेनं केला होता.
****
No comments:
Post a Comment