Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 October
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयन
मध्ये भारताने आज रौप्य पदक जिंकलं. पुरुष गटातल्या 'स्किफ' शर्यतीत मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरिसिंकल नोबल यांनी या प्रकारातलं हे पहिलं
पदक पटकावलं. आतापर्यंत झालेल्या नऊ शर्यतींमध्ये फ्रान्सिस आणि नोबल यांनी सातत्यपूर्ण
कामगिरीचं प्रदर्शन केलं, त्यांनी एकूण २३ गुण मिळवले आणि एका शर्यतीत विजयही संपादन केला, ज्यामुळे त्यांचं रौप्यपदक निश्चित
झालं. स्क्वॅशमध्ये भारतीय महिला संघाने आज कांस्य पदक जिंकलं. पुरुष हॉकी मध्ये उपान्त्य
फेरीत आज भारत - पाकिस्तान सामना होईल.
या स्पर्धेत भारत सध्या ६२ पदकांसह आठव्या स्थानावर
आहे. यामध्ये दहा सुवर्ण, २२ रौप्य आणि ३० कांस्य पदकांचा समावेश आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससीच्या शताब्दी सोहळ्याचा
समारोप आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. १९२६ मध्ये
यूपीएससीची स्थापना झाली. स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गेल्या वर्षी
एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या वर्षभराच्या शताब्दी उत्सवाचा समारोप या कार्यक्रमाद्वारे
होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यूपीएससीच्या शताब्दीनिमित्त विशेष
स्मारक नाणं, टपाल तिकीट आणि पुस्तकाचं
प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातल्या राज्य लोकसेवा आयोगांचे अध्यक्ष
आणि सदस्य, केंद्र सरकारचे वरिष्ठ
अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, यूपीएससीचे अधिकारी आणि अन्य हितसंबंधी
उपस्थित राहणार आहेत.
****
दुबईहून इस्रायलमधल्या तेल अवीव इथं जाणाऱ्या फ्लाय
दुबईचं विमानातल्या सहवैमानिकाने कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला करत दोन
मिनिटांपेक्षा कमी वेळेत विमान १७ हजार फूट खाली नेण्यास भाग पाडलं. मात्र प्रवासी
आणि विमान कर्मचाऱ्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करत हल्लेखोराला ताब्यात घेऊन विमान स्थिरावण्यास
मदत केली. या घटनेत भारतीय नागरिक असलेले कॅप्टन स्मित मच्छार जखमी झाले असून, त्यांनी शौर्याने प्रतिकार केल्यानं
मोठी दुर्घटना टळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मित मच्छार यांच्या धैर्य आणि
दृढनिश्चयाचं कौतुक केलं.
****
बँकर्स बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६ आजपासून लागू झाला. १३ ऑगस्ट
रोजी या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. या कायद्याने १८९१ च्या बँकर्स
बुक्स एव्हिडन्स कायद्याची जागा घेतली आहे. आधुनिक बँकिंग पद्धतींशी सुसंगत अशी बँकिंग
नोंदी पुरावा म्हणून वापरण्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट या नव्या कायद्याद्वारे उपलब्ध
होणार आहे.
****
राज्य शासनाच्या भर्ती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी
परीक्षा पद्धतीत मूलभूत बदलांची गरज आहे, असं राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि उच्चस्तरीय कृती
दलाच्या प्रमुख व्ही. राधा यांनी म्हटलं आहे. या कृती दलानं काल नाशिक विभागातले विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांशी थेट संवाद साधला, त्यानंतर त्या बोलत होत्या. राज्यातल्या
पाचही महसूल विभागांमध्ये परीक्षा पद्धतीतल्या सुधारणांच्या अनुषंगानं समितीनं आतापर्यंत
सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला, तर सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी
ई-मेल तसंच निवेदनाद्वारे आपल्या शंका, प्रश्न आणि सूचना मांडल्या असल्याचं व्ही. राधा यांनी सांगितलं.
****
किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धान
आणि भरडधान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेत मिळावी, यासाठी प्रलंबित देयकं तातडीने अदा
करण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना
दिले. पणन हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात एमएसपी अंतर्गत धानासह ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांची खरेदी करण्यात आली असून, शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम
तसेच द्यावयाच्या प्रलंबित रकमेची विभागनिहाय माहितीही संकलित करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पारदर्शक
आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी बीड जिल्ह्यात २५ विविध कक्षांची स्थापना
करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल
या कक्षांसह इतर यंत्रणेचा आढावा घेतला.
दरम्यान, या निवडणुकीसाठी काल २७ इच्छुकांनी एकूण ४५ नमुना नामनिर्देशन
पत्रं घेतली. मात्र एकाही उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्यात आला नाही.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल सुमारे ५५ लाख रुपयांचा गुटखा
पोलिसांनी जप्त केला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर करमाड परिसरात करण्यात आलेल्या
या कारवाईत पोलिसांनी मुद्देमालासह दोन जणांना ताब्यात घेतलं.
****
No comments:
Post a Comment