Thursday, 1 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 October 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      यूपीएससीची शतकपूर्ती;निवड प्रक्रिया अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त

·      दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी सण-उत्सव साधेपणानं साजरे करावे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

·      खामगाव एमआयडीसीतून अडीच लाख किलो सुटं सोयाबीन तेल जप्त

·      स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे महिला आणि पुरुष हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल-इतरही अनेक क्रीडा प्रकारात पदकनिश्चिती

****

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपली निवड प्रक्रिया भविष्यातल्या आवश्यकतांनुसार अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससीच्या शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते. गेल्या शंभर वर्षांच्या प्रवासात या संस्थेवरील लोकांचा विश्वास दृढ राहिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फक्त खुर्चीच्या आकर्षणामुळे नव्हे, तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित असलेल्या तरुणांना सार्वजनिक सेवेत आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले –

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

दुर्गम भागातल्या नागरिकांचं रोजगारासाठी होणारं पलायन थांबवण्यासाठी गावातच रोजगार मिळवून देणं आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत संसदीय संकुल विकास परियोजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. या पलायनामुळे मुख्यत: भावी पिढीच्या शिक्षणावर तसंच आरोग्यावर परिणाम होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. हे थांबवण्यासाठी संसदीय संकुल विकास परियोजना महत्त्वाचा निर्णय असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी, या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी, सार्वजनिक मंडळं आणि नागरिकांना केलं आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथल्या औद्योगिक वसाहतीत अन्न आणि औषध प्रशासनने कारवाई करत गोदामामध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेलं २ लाख ५१ हजार किलो सुटं सोयाबीन तेल जप्त केलं. या तेलाची किंमत सुमारे ३ कोटी ५१ लाख रुपये इतकी आहे. ए.एम. ऑईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे अन्न पदार्थाच्या साठवणुकीचा, उत्पादनाचा किंवा घाऊक विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. पीएम सूर्य घर योजना तसंच कुसुम योजना हा याच प्रयत्नांचा भाग आहे. आजच्या भागात या योजनांबाबत जाणून घेऊ –


देशातील स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत घरगुती छतावरील सौरऊर्जा, शेतीतील सौरपंप, मोठे सौर प्रकल्प तसेच देशांतर्गत सौर पॅनेल निर्मितीवर भर दिला आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून भारताची स्थापित सौरऊर्जा क्षमता 31 ऑगस्ट 2026 रोजी 168 पूर्णांक 04 गिगावॅट एवढी झाली आहे. घरगुती वीजग्राहकांना सौरऊर्जेकडे वळवण्यासाठी केंद्र सरकारनं ‘पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजना’ सुरू केली. तर, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान राबवलं जात आहे.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सौरऊर्जा क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारनं उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवली आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्मितीसाठी सोलार पार्क आणि अल्ट्रा मेगा सोलार उर्जा निर्मिती योजनेला प्रोत्साहन दिलं आहे.

****

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये भारताच्या पुरुष संघाने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानेही अंतिम सामन्यात आपलं स्थान यापूर्वीच निश्चित केलं आहे.

याच स्पर्धेत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे.

दरम्यान, भारतानं आज नौकायन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनु फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरिसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्यपदक मिळवलं. तीरंदाजीत पुरुष गटाच्या कपांउंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू याने कांस्यपदक पटकावलं. स्क्वॉशमध्येही महिलांच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात नितेश याने रौप्यपदक पटकावलं.

सेपकटकरॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा २-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे.

या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकूण संख्या ६४ वर पोहोचली असून त्यात १० सुवर्ण, २२ रौप्य आणि ३२ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदकतालिकेत ८व्या स्थानावर आहे.

****

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज बीड जिल्ह्यातल्या पेंडगाव परिसरातल्या शेतीपिकांची आणि नुकसानीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते. आयुक्तांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी पिकांची स्थिती, उत्पादनातील घट आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

बीड शहरातल्या नागरिकांचा मालमत्ता कर तसंच पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. करमाफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवाव अशा मागणी पक्षानं केली आहे.

****

नांदेड शहराचा पाणी पुरवठा तसंच उपलब्ध पाण्याच्या काटेकोर नियोजनाबाबत मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांनी आज महापालिकेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेतली. पावसाचं प्रमाण घटल्याने आगामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी मनपा आणि पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे काम करून पाणी बचतीचा आणि वितरणाचा योग्य आराखडा तयार करावा, असे निर्देश डोइफोडे यांनी दिले.

****

नोकरी- रोजगाराच्या निमित्ताने आपण गावाबाहेर पडलो तरी खेड्याशी नातं ठेवलं पाहिजे, असं आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यात खांडी पिंपळगाव इथं एक दिवसीय शेतकरी संवाद मेळाव्यात कुलगुरू बोलत होते. उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या ज्ञानाचा स्थानिकांना लाभ मिळवून दिला पाहिजे, असंही कुलगुरू फुलारी यांनी नमूद केलं.

****

यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी, सक्तवसुली संचालनालय - ईडीने आज जिल्ह्यात ९ ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून, रिझर्व्ह बँकेनं २०२२ मध्ये या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ईडीनं म्हटलं आहे. बँकेच्या माध्यमातून सुमारे २४२ कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, अधिकारी आणि कर्जदार यांच्यातलं संगनमत उघड झाल्याचा ईडीचा आरोप आहे.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत एक दिवस, एक तास, एक साथ या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातल्या गावागावांत व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसच विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयीन तरुण, शालेय विद्यार्थी, महिला, महिला बचत गट, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अधिकारी, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

****

नांदेड जिल्ह्यात स्वच्छता चळवळीचे दूत म्हणून ओळखले जाणारे माधवराव पाटील शेळगावकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. राज्य  शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे ते पहिले अध्यक्ष होते. स्वच्छता चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शेळगाव गौरी या गावाला दोन राष्ट्रपती पुरस्कार तसंच इतर विविध पुरस्कार मिळवून दिले होते. नायगाव तालुक्यातल्या शेळगाव गौरी इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

हवामान

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्याही या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...