Monday, 5 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 October 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात;स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश जारी

·      पेयजल पुरवठ्याला प्राधान्य;उद्योगांना ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्याची सूचना 

·      एमपीएससी अध्यक्षांविरोधात कारवाईसाठी समिती गठीत करण्याची राज्यपालांकडे विनंती

·      औरंगाबाद पदवीधर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे सतीश चव्हाण तर महाविकास आघाडीचे दिलीप घुगे यांचे अर्ज दाखल

·      उदगीर इथं अवैध सावकारीप्रकरणी सहकार विभाग आणि पोलिस प्रशासनाची कारवाई

आणि

·      १९व्या अंतराळशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला ४ सुवर्ण आणि १ रौप्यपदक 

****

राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिले आहेत. अपुरा पाऊस आणि सध्याची पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याची नासाडी आणि गळती रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फलोत्पादन, बांधकाम आणि साफसफाईसाठी वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर केला जाईल. उद्योगांना त्यांच्या पाण्यापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून, प्रत्येक धरणातील १० टक्के पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवले जाईल. पेयजल, जनावरांसाठी आणि त्यांच्या चाऱ्यासाठी पाण्याची गरज भागवल्यानंतर रब्बी पिकांसाठी पाणी पुरवले जाईल. धरणे, नद्या किंवा कालव्यांमधून विनापरवाना पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही सरकारने दिला आहे.

येत्या ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी वापरावर हे निर्बंध लागू राहणार असल्याचं, याबाबतच्या शासननिर्णयात म्हटलं आहे.

****

सांस्कृतिक कार्यविभागाकडून दुष्काळग्रस्त भागात रोजगारनिर्मिती आणि जलसंवर्धन करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. आज मुंबईत, सांस्कृतिक कार्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोककलावंतांना मदत होईल असे कार्यक्रम करावे, विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पांचा उपयोग जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि रोजगारनिर्मितीसाठी करावा. त्यासाठी सांस्कृतिक संचनालयाच्या आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पुरातत्व खात्याला निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही मंत्री शेलार यांनी यावेळी दिले.

दरम्यान, राज्य संरक्षित स्मारकांच्या कामांची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले. या पार्श्वभूमीवर विभागामार्फत केली जाणारी कामे गुणवतापूर्ण पद्धतीने आणि सर्व निकषांचे पालन करून केली जावीत, त्याअनुषंगाने त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करण्याचे निर्देश शेलार यांनी दिले. 

****

राज्य लोकसेवा आयोगाचे माजी तसंच विद्यमान अध्यक्ष आणि सदस्यांविरोधात कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, या समितीच्या माध्यमातून तीन महिन्यात अहवाल मागवून, त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

****

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान निवडणूक आयोगानं घेतलेल्या कथित एकतर्फी निर्णयांवरील आरोपांच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. जर आवश्यक एकमत किंवा बहुमताशिवाय निर्णय घेण्यात आल्याचं सिद्ध झाले, तर त्या निर्णयांवर पुनर्विचार केला जाऊ शकतो असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

अ‍ॅप-आधारित आणि डिजिटल परिवहन सेवा वापरणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी योग्य उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. महिलांनी सुरक्षितपणे आणि निर्भयपणे प्रवास करणे शक्य झाले पाहिजे, यासाठी राज्य प्रशासन, पोलीस, परिवहन विभाग आणि अ‍ॅप-आधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्या यांच्या समन्वयाने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचंरहाटकर यांनी म्हटलं आहे.

****

‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन सर्व अमराठी चालकांनी व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात एक लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे, या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती दिली आहे. अमराठी भाषिक चालकांनी या स्थगितीचा आधार घेऊन मराठी शिकण्याकडे दुर्लक्ष करू नये असं आवाहनही सरनाईक यांनी केलं. 

****

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा परवा बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी २०२३ नंतर बँकेने रेपो दरात वाढ केलेली नाही, त्यानंतर २०२३-२४ या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि २०२५ मध्ये दरकपात करण्यात आली. यंदा मात्र दरवाढीची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

****

मुंबईत महापौर रितु तावडे यांच्या संकल्पनेतून “शाडू बाप्पा दहा दिवस - फ्लेक्समुक्त मुंबई तीनशे पासष्ट दिवस” ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबईला प्लास्टिक आणि अनधिकृत फलकांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी तावडे यांनी याबाबत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले आहे. याबाबत कारवाई संदर्भात शून्य सहिष्णुता धोरण राबवण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.

****

औरंगाबाद पदवीधर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी धाराशिव जिल्ह्यात मतदानासाठी एकूण ७६ मतदान केंद्रं प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात धाराशिव तालुक्यात १६, तुळजापूरमध्ये ११, उमरगा १२, लोहारा सहा, कळंब दहा, भूममध्ये आठ, वाशीमध्ये पाच आणि परंडा तालुक्यात आठ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा-महायुतीच्या उमेदवार डॉ.स्मिता योगेश जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपा-महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आज आपले नामांकन अर्ज दाखल केले.

****

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ६९ हजार महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली आहे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी ही माहिती दिली. यासाठी कृषी विभागाने १७ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले असून यासंबंधी अडचणींसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं  आवाहन कळसाईत यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं आज प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज सकाळी विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढून महोत्सवाला सुरूवात केली. यात १०७ महाविद्यालयातील साडे सहाशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हा महोत्सव सात ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठ परिसरात होणार असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने करण्याचे नियोजित आहे.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना अवैध सावकारीप्रकरणी रहिवासी सुधीर पारसेवार यांच्या विरोधात सहकार विभाग आणि पोलिस विभागाच्या पथकानं आज कारवाई केली. या कारवाई दरम्यान त्यांच्या घरातून पुढील चौकशीसाठी संशयित असलेले कोरे बॉन्ड, कोरे चेक, व्याजाचा उल्लेख असलेल्या हिशोब वह्या आणि खरेदी-विक्री दस्तऐवजांच्या प्रती ताब्यात घेण्यात आल्या.

****

व्हिएतनाम इथं झालेल्या १९व्या अंतराळशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला ४ सुवर्ण आणि १ रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण, तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. ६४ देशांतील ३०७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. चार सुवर्ण पदकांसह भारत आणि यजमान व्हिएतनाम संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

****

हवामान

कोकणात पुढचे दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...