Sunday, 1 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 01.03.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 01 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सार्वत्रिक आरोग्य सुरक्षेचं उद्दिष्ट गाठण्यात भारताला यश आलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.
भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या ६४ व्या राष्ट्रीय परिषदेचं काल हर्षवर्धन यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून देशातल्या ५० कोटी नागरिकांना सुरक्षा कवच मिळेल, तसंच देशभरात सर्वत्रच आरोग्य केंद्र उभारली जातील, असं त्यांनी सांगितलं.
२०२२ पर्यंत देशभरातल्या दीड लाख प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मे महिन्यापर्यंत एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकपासून महाराष्ट्र मुक्त करण्याची घोषणा सरकारने केली आहे. अशा प्रकारचं प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलं आहे. अशा प्लास्टिकच्या वापराबद्दल दोषी ठरल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा दहा हजार रुपये दंड आणि तिसऱ्यांदा पंचवीस हजार रुपये दंडासह तीन महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल, असं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कालच्यासारखीच आजही सकाळीही अवकाळी पावसानं हजेरी लावली. उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, लोहारा, उमरगा तालुक्यांच्या काही भागांत पहाटे वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतातलं ज्वारीचं पीक आडवं झालं, तर काढणी केलेल्या हरभऱ्याचे ढीगही भिजून नुकसान झालं. वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोरही गळून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर सायगावजवळ काल रात्री दुचाकी आणि एका अज्ञात वाहनाची धडक झाली. या अपघातात एक जण ठार, तर एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. निजाम वल्ली सय्यद असं मृताचं नाव असून, शेख जलील शेख अहमद हे जखमी झाले आहेत. हे दोघेही परळी येथील रहिवाशी असल्याचं बर्दापूर पोलिसांनी सांगितलं.
****
औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये आजपासून ३१ मार्चपर्यंत ऑपरेशन मुस्कान-८ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये शून्य ते १८ वर्ष वयोगटातल्या हरवलेल्या, पळवलेल्या मुलांसदर्भात, मुलांचे आश्रय गृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुलं, धार्मिक स्थळं,  हॉटेल्स, दुकानं या ठिकाणी काम करणारी मुलं, अशा सर्वांना हरवलेली मुलं असं समजून त्यांच्या पालकांचा शोध घेण्यात येणार आहे. तसंच ज्यांच्या पालकांचा शोध लागला नाही, अशा बालकांना बाल सुधारगृहाकडे सोपवण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या माली पारगाव इथं आज शिवार साहित्य संमेलनाला सुरवात झाली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या या संमेलनाची सुरवात सकाळी ग्रंथदिंडी काढुन करण्यात आली. संमेलनाध्यक्ष डॉ, रमेश गटकळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, मसापच्या माजलगाव शाखेचे अध्यक्ष मुकुंदराज सोळंके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत.
****
पहिल्या राज्यस्तरीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा आणि मराठा मंदिर यांच्यातर्फे रविवारी ८ मार्चला महिला दिनी हे एकदिवसीय संमेलन होणार आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ख्राईस्टचर्च इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतानं न्यूझीलंडवर ७ धावांची आघाडी मिळवली आहे. आज दुसऱ्या कालच्या बिनबाद ६३ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केलेल्या न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ २३५ धावांत आटोपला. शेवटचं वृत्त हाती आलं, तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात ६ बाद ९० धावा झाल्या होत्या.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...