Wednesday, 18 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.03.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक१८ मार्च २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø राज्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी; सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित; अत्यावश्यक नसलेल्या सेवांमध्ये मर्यादित स्वरुपात काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन 
Ø  महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समावेश करण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
Ø मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पाऊस
आणि
Ø प्रसिद्ध मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन
****

 मुंबईत काल एका ६४ वर्षीय कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. राज्यातला हा कोरोना विषाणूचा पहिला तर देशातला तिसरा बळी ठरला आहे. पाच मार्च रोजी दुबईहून परतलेल्या या व्यक्तीवर प्रथम हिंदुजा रुग्णालयात आणि चौदा तारखेपासून मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. या व्यक्तीच्या कुटुंबातल्या दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे, या दोघांसह हिंदुजा रुग्णालयातल्या काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

 दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४झाली असून, यामध्ये २७ पुरुष तसंच १३ महिलांचा समावेश आहे.
****

 राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी काल ही घोषणा केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनानं निवडणूक आयोगाला केली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक तसंच परभणी, नाशिक, धुळे, आणि ठाणे महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. राज्यातल्या १९ जिल्ह्यातल्या एक हजार ५७० ग्रामपंचायतींसाठी येत्या ३१ तारखेला मतदान होणार होतं. बीड जिल्ह्यातल्या केज तसंच नांदेड जिल्ह्यातल्या भोकरसह नऊ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या तसंच सुमारे १२ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. हे सर्व कार्यक्रम या आदेशामुळे स्थगित झाले आहेत. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील कार्यवाहीसंदर्भात स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असंही मदान यांनी सांगितलं.
****

 मुंबईत मंत्रालयासह शासकीय कार्यालयं बंद करण्यात येणार नाहीत, मात्र, परिस्थितीचा सातत्यान आढावा घेण्यात येत असून याविषयी योग्य तो निर्णय आवश्यकतेनुसार घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुंबईत काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना शासनानं मर्यादित स्वरुपात काम करण्यास सांगितलं असल्याचं ते म्हणाले.  सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात आलेली नाही, मात्र पुढचे काही दिवस कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत कामासाठी बोलावण्याबाबत विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****

 कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मध्य रेल्वेनं नागपूर- मुंबई -नागपूर नंदिग्राम एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते निझामाबाद एक्सप्रेससह तेवीस गाड्या येत्या एक एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत. प्रवाशांनी याबाबत अधिक माहितीसाठी रेल्वे विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या अनेक मंडळांनी फलाटावर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पन्नास रुपये केले आहेत.
****

 जालना इथं काल आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी एकजण चीनमधून तर दुसरा गोवा इथून परतला आहे.

 दरम्यान, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मॉल, मोठे बाजार, आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेडचा सर्वात मोठा बुधवार बाजार बंद राहणार आहे. या बंद मुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 जालना जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये काल मोसंबीला प्रतिटन कमाल १२ हजार रुपये दर मिळाला. कापूस आणि रेशीम खरेदीवरही कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 औरंगाबादमध्येही सात जणांना संशयित म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.

लातूर इथं, येत्या चौदा एप्रिलपर्यंत अपंग प्रमाणपत्र, नोंदणी, तपासणी तसंच वयाचे दाखले वितरण बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत येण्याचं टाळावं, असं आवाहान अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केलं आहे.
****

 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या सर्व शाळांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तयार करण्याचंही यावेळी ठरवण्यात आलं.

 महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम, १९७० मधील तरतुदींची अंमलबजावणी करतांना, अपार्टमेंट्स मालकांना देखील अपिल करण्यासंदर्भातला अधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. या अधिनियमाची अंमलबजावण करताना अपार्टमेंट्स मालकांना कोणतेही अधिकार नव्हते, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 मराठवाड्याच्या काही भागात काल अवकाळी पाऊस झाला.

 जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या शहागड, खामगाव, वाळकेश्वर, गोरी- गंधारी, सावरगाव, नागझरी या भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धातास पाऊस झाला. शहागड परिसरात काही वेळ गाराही पडल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा पिकाचे नुकसान झालं. तसंच पत्र्याचे शेडही उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 औरंगाबाद जिल्ह्यातही वैजापूर, सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यात जोरदार वारा, विजांच्या कडकडाटासह काल पाऊस झाला. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. या पावसामुळे फुलंब्री तालुक्यातल्या तळेगाव वाडी, रिधोरा, कोलते टाकळी, गेवराई पिंळगाव या गावातल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.   
****

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ.जयश्री सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. विद्यापीठातल्या विविध संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्या.
****

 परभणी तालुक्याच्या शिंगणापूर इथले शेतकरी माणिक सूर्यवंशी यांनी, वेगवेगळ्या नैसर्गिक संकटावर मात करत, द्राक्षाची बाग विकसित करतानाच अंजिराचंही उत्पादन घेऊन आर्थिक संपन्नता मिळवली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
पाण्याअभावी तसंच नैसर्गिक संकटामुळे चारवेळेस बाग जळाली. मात्र पुन्हा जिंदीने उभी केली. एक्करी १५ टनापर्यंत द्राक्षाचे उत्पादन मिळाले. त्यानंतर ३ एक्कर मध्ये अंजिराची लागवड केली. सुर्यवंशी म्हणाले…

शेतात नेहमी आर्थिक उत्पन्न देणारे पिके घेतांना, त्यात सातत्याने बदल केल्यास आर्थिक स्थिरता कायम राहते. सुर्यवंशी यांची जिंद्द आणि मेहनतीचा शेतातील प्रवास  अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी होय.
आकाशवाणी बातम्यासाठी, परभणीवरून- विनोद कापसीकर
****

 प्रसिद्ध मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथं जन्मलेले कुलकर्णी यांनी पुणे आकाशवाणीतून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला. सुमारे दीडशे चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. यापैकी अशी ही बनवाबनवी, थरथराट, रंगतसंगत, चल रे लक्ष्या मुंबईला, आदी चित्रपटांना मोठी प्रसिद्धी मिळाली. खेळ आयुष्याचा हा नुकताच प्रसिद्ध झालेला चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या बाजार समितीत हळद विक्री झाल्यावर २४ तासात शेतकऱ्यांना पैसे देण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी या मागणीचं निवेदन जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलं आहे.
****

 महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकारनं मराठवाड्यावर अन्याय केल्याचा आरोप लातूर जिल्ह्यातल्या औशाचे आमदार अभिनम्यू पवार यांनी केला आहे. ते काल औसा इथं वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० हजार कोटी रुपयांना मंजुरी दिली होती, मात्र या सरकारनं केवळ २०० कोटी रुपयांची तरतुद केल्याचं ते म्हणाले.
****

 नांदेड जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातल्या पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी पटसंख्या असलेल्या नऊ शाळांना दुर्बिणीचं वितरण केलं आहे. या दुर्बिणीमुळे ग्रामीण भागातल्या मुलांना अंतराळातल्या घडामोडीचं निरिक्षण करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचं  खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलं.
*****
***

No comments: