आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ मार्च २०२० सकाळी ११.००
वाजता
****
देशभरातली कोरोनाग्रस्त
रुग्णांची संख्या आज एकशे सत्तेचाळीसवर पोहचली असून, त्यातल्या तीन रुग्णांचा आतापर्यंत
मृत्यू झाला आहे तर चौदा जण पूर्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात यापैकी सर्वाधिक म्हणजे
एक्केचाळीस रुग्ण आहेत. या सर्वांवर विलगीकरण कक्षांमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित
रुग्णांच्या संपर्कात आलेले सुमारे पाच हजार सातशे लोक कडक निगराणीखाली असल्याचं आरोग्य
मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
कोरोना विषाणूचा प्रसार
रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपन्या आणि देशांसाठी जागतिक बँकेनं चौदा अब्ज डॉलर्सच्या
मदतनिधीची घोषणा केली आहे. जगभरातले एकशेवीस देश या साथीच्या विळख्यात सापडल्यानं जागतिक
महामंदी येण्याच्या शंकेनंतर जागतिक बँकेनं ही घोषणा केली आहे. या निधीतून या विषाणूच्या
प्रसाराला अटकाव करणं, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणं आणि खाजगी उद्योगांना
मदत करणं, ही कामं केली जावीत, हा बँकेचा हेतू आहे.
****
देशातला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत सार्वजनिक सभा
आयोजित न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतल्याची माहिती पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा
यांनी दिली आहे. याशिवाय, कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्याचे निर्देश भाजपाच्या देशभरातल्या
कार्यालयांना देण्यात आले आहेत, असंही नड्डा यांनी सांगितलं.
****
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
कमलनाथ यांना विधानसभेत सरकारचं बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी
भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांची याचिका आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला येण्याची
शक्यता आहे. मागच्या आठवड्यात काँग्रेसच्या बावीस आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर या
सरकारनं बहुमत सिद्ध करावं, असे निर्देश राज्यपालांनी दिले होते, मात्र कोरोना साथीचं
निमित्त करत विधानसभा अध्यक्षांनी विधानसभा येत्या सव्वीस तारखेपर्यंत स्थगित केली.
****
येस बँकेचं कामकाज आज
संध्याकाळपासून पूर्ववत होणार असल्याची ग्वाही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत
कुमार यांनी दिली आहे. बँकेचे ग्राहक आता बँकेच्या सर्व सेवा वापरू शकतात असंही त्यांनी
सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment