Thursday, 19 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 राज्यात कोरोना संसर्गामुळे बाधित होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे भीतीचं कारण नाही, मात्र दक्षता घेणं आवश्यक असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राज्यात सध्या ४९ लोक कोरोना बाधित असून, त्यापैकी ४० रुग्ण परदेशातून बाधित होऊन आलेले आहेत. बाहेरुन आलेल्या या रुग्णांमुळे राज्यात बाधित झालेले लोक फक्त नऊ आहेत, त्यामुळे शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं, तसंच स्वच्छतेच्या सूचनांचं पालन करावं, आणि रोगप्रसाराला आळा घालावा, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे. मास्कचा बाऊ न करता, स्वच्छ रुमालांचा वापरही रोगप्रसाराला सक्षमपणे आळा घालतो, असंही टोपे यांनी नमूद केलं.

 दरम्यान टोपे यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन प्रवाशांच्या तपासणी सुविधेचा आढावा घेतला.
****

 कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चौदाशे खाटांचे विलगीकरण कक्ष आठवडाभरात उभारले जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. यापैकी पुण्यात ७००, मुंबईत २०० आणि उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळून ५०० खाटांचे विलगीकरण कक्ष असणार आहेत. वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सध्याच्या परिस्थितीत रुग्णांची काळजी घेण्यासाठी जबाबदारीने काम करत असल्याबद्दल त्यांनी या सर्वांचं कौतुक केलं. कोरोना संदर्भात दररोज दुपारी चार वाजता प्रसारमाध्यमांसाठी मेडिकल बुलेटिन प्रसारित करण्यात येणार असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.
****

 अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या आता दोन झाली आहे. हा रुग्ण दुबईहून ३ मार्चला अहमदनगर इथं आला आहे. त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
****

 मास्क आणि सॅनिटायझरची साठेबाजी तसंच चढ्या दराने विक्री विरोधात राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. राज्यभरात आतापर्यंत वीस ठिकाणी धाडी टाकून एक कोटी ४१ लाख ११ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****

 कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर वाहतुक शाखेत हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस तसंच तक्रारदारांनी कार्यालयात येताना हात स्वच्छ धुवावेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
****

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जालना जिल्ह्यातील राजूर इथलं गणपती मंदिर आजपासून भाविकांकरता दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे. दैनंदिन पुजेसाठी पुजारी आणि स्वछतेसाठी  सफाई कामगारांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
****

 सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेऊन प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या. श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात कोरोना संदर्भात उभारण्यात आलेल्या विशेष कक्षाची चव्हाण यांनी पाहणी केली.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. तुळजापूर तालुक्यात अणदूर इथल्या केशव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जनजागृतीपर पत्रकं तसंच शाळकरी मुलांना मास्क आणि हात धुण्यासाठी साबणाचं वाटप करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समितीच्या वतीने जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात जनजागृती करण्यात येणार आहे. लोक प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं जनतेच्या शंकांचं निरसन करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र काम केलं जाणार आहे.
****

 मुंबई-पुण्याहून लातूर इथं येणाऱ्या प्रवाशांची बसमध्येच प्राथमिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी आज लातूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****

 नांदेड जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीने हरभरा, गहू इतर पिकांसह केळीच्या बागाचं मोठं नुकसान झाल आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी जिल्ह्यातले शेतकरी करत आहेत.

 हिंगोली जिल्ह्यातही गारांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
****

 बीड इथं अन्न - औषधी प्रशासनाचा सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे याला पस्तीस हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. आटा मिलच्या परवान्याचं नुतनीकरण करण्यासाठी दाभाडे यानं ही लाच मागितली होती. तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून आज सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत आहे.
****

  शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी इथल्या शाळेतले शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे.
*****
***

No comments: