Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 March 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २० मार्च २०२० दुपारी
१.०० वा.
****
मध्यप्रदेशचे
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज भोपाळ इथं पत्रकार परिषद
घेऊन, त्यांनी ही माहिती दिली. आपण राज्यपालांना भेटून राजीनामा देणार असल्याचं त्यांनी
सांगितलं. भाजपनं हे षडयंत्र रचलं असून, हा जनतेचा विश्वासघात असल्याचं, कमलनाथ यांनी
नमूद केलं. मध्यप्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयानं आज सायंकाळपर्यंत बहुमत सिद्ध
करण्याचे निर्देश काल दिले होते. त्यानंतर बंडखोर सोळा आमदारांचे राजीनामे मध्यप्रदेश
विधानसभाध्यक्षांनी काल स्वीकारले. त्यामुळे कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात आलं होतं.
दरम्यान, भाजपच्याही एका आमदारानं आज राजीनामा दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
अन्न औषध
प्रशासनाचं कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी सरकार काम करत असल्याचं, सार्वजनिक आरोग्यमंत्री
हर्षवर्धन यांनी सांगितलं, ते आज लोकसभेत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विचारलेल्या
प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. या विभागाकडून अपेक्षित कायदेशीर कारवाईसाठी राज्य
सरकारांनी पुढे यावं, सर्व खासदारांनी यासंदर्भात सहकार्य करण्याचं आवाहन हर्षवर्धन
यांनी केलं. गुटखा विक्री करणाऱ्यांवर तसंच साठेबाजांवर कारवाई करण्यासाठी अन्न आणि
औषध प्रशासनाकडे आवश्यक मनुष्यबळासह अधिकार देण्यासंदर्भात खासदार जलील यांनी प्रश्न
विचारला होता.
****
कोविड-एकोणीस अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेनं अतिरिक्त प्रतिबंधात्मक
उपाययोजना घोषित केल्या आहेत. रेल्वे प्रवाशांना, विशेषतः या
संसर्गाचा अधिक धोका असलेल्या ज्येष्ठ
नागरिकांना अनावश्यक प्रवासापासून परावृत्त करण्यासाठी, आरक्षित
आणि अनारक्षित अशा सर्व प्रकारच्या तिकिटांवरच्या सवलती स्थगित करण्यात आल्या
आहेत. विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग व्यक्ती
वगळता, इतर प्रवाशांना या सवलती मिळणार नाहीत. सद्यस्थितीत,
रेल्वेमधली अतिरिक्त गर्दी आणि अनावश्यक प्रवास कमी करण्यासाठी एकूण
१५५ रेल्वे गाड्या ३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी भारतीय रेल्वेनं पर्यायी रेल्वे फेऱ्यांच्या उपलब्धतेची खात्री केली असून, रद्द
होणाऱ्या रेल्वे फेऱ्यांच्या तिकीटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचे आज आणखी तीन नवीन रुग्ण आढळले,
त्यामुळे आता राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ झाली आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी
चिंचवड इथं हे नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र पाच जणांची प्रकृती सुधारत असून,
त्यांना आज रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी
आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पाचही रुग्णांच्या थुंकीचा चाचणी अहवाल आता निगेटीव्ह आला आहे. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतरही
या रुग्णांना पुढचे चौदा दिवस घरी विलगीकरणात राहावं लागणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****
हिंगोली इथं दाखल संशयित रुग्णाची प्रकृती स्थिर असून,
त्याच्या थुंकीच्या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. हिंगोली जिल्हा शल्यचिकित्सक
कार्यालयानं जारी केलेल्या एका पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर इथल्या परमेश्वर मंदिर
संस्थान कमिटीने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा
निर्णय घेतला आहे. मंदिराच्या सभागृहात आयोजित लग्नसोहळे रद्द करण्यात आले असून, तशा
सूचना संबंधितांना दिल्या आहेत. शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांच्या मंदिर
प्रवेशावर बंदी असेल, असं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औरंगाबाद
शहरातली बाजारपेठ उद्या आणि परवा बंद राहणार आहे. जिल्हा व्यापारी महासंघाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, औरंगाबाद शहरात गर्दी होऊ नये म्हणून
जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा
इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.
****
अहमदनगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे झालेल्या
ऊसतोड कामगारांच्या वाहनाचा अपघात होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला. काष्टी शिवारात राहिंजवाडी
जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या टॅम्पोवर पाठीमागून भरधाव आलेला टॅम्पो धडकून हा अपघात
झाला. मृत महिला धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा इथल्या रहिवासी होत्या. टॅम्पोतल्या ऊसतोड
कामगारांपैकी एक जण गंभीर तर इतर कामगार किरकोळ जखमी झाले आहेत.
****
नांदेड इथले जनता दलाचे नेते गोवर्धन डोईफोडे यांचं काल
सायंकाळी पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. १९८९ मध्ये मंडल
आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी डोईफोडे यांनी पुढाकार घेऊन नांदेड जिल्ह्यात ओबीसी
संघटनेची बांधणी केली होती. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी कळंब तालुक्यातल्या
चारोळा या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आज मुंबई उच्च
न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. मुंबईत राजभवनात आज संध्याकाळी साडेसहा वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
त्यांना शपथ देतील.
न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची गेल्या
महिन्यात उच्च न्यायालयाचे कार्यवाहक न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली
होती. मार्च २००४मध्ये
पहिल्यांदा त्यांची उच्च न्यायालयातले न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
****
No comments:
Post a Comment