आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०२ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून
सुरुवात होत आहे. एक जानेवारी रोजी संसदेसमोर मांडलेल्या अर्थसंकल्पात, विविध मंत्रालयांच्या
मागण्यांची संसदेच्या स्थायी समित्यांना समीक्षा करता यावी, यासाठी हे अधिवेशन दोन
टप्प्यात घेतलं जातं, अधिवेशनाचा पहिला टप्पा अकरा फेब्रुवारीला पूर्ण झाला होता, आजपासून
सुरू होणारा दुसरा टप्पा तीन एप्रिलपर्यंत चालणार आहे.
****
मराठा आरक्षण प्रश्नी राजकारण बाजूला ठेवून संबंधित समाजाच्या
तरुणांना कशी मदत करता येईल याबाबत प्रयत्न करत असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी म्हटलं आहे. आज सकाळी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या तरुणांसोबत बैठक
झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपनेते चंद्रकांत पाटीलही या बैठकीला उपस्थित
होते. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात सरकारनं तज्ज्ञ
विधीज्ञ नेमले असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठेतले कांदा लिलाव, कांदा
उत्पादकांनी आज बंद पाडले. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाल्यानंतर कांद्याचा
सरासरी भाव प्रतिक्विंटल १४०० रूपये जाहीर होताच कांदा उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
भारत दिघोळे यांच्या नेतृत्वात हा लिलाव बंद करण्यात आला. शासनानं कांद्याला योग्य
भाव मिळवून द्यावा अन्यथा नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार पेठेत कांदा विक्रीस आणणार नसल्याचं
दिघोळे यांनी सांगितलं.
****
सांगली जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी,
हरभरा या रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. काढणीस असलेल्या द्राक्ष आणि डाळींब या फळबागांचं
देखील नुकसान झालं आहे. जत, पलूस, आटपाडी, कवठेमहांकाळ या भागातही काल पावसानं जोरदार
हजेरी लावली.
मराठवाड्यातही परभणी, लातूर, बीड, नांदेड, तसंच जालना जिल्ह्यात
अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या नुकसानाचे तातडीनं पाहणीद्वारे पंचनामे आणि अहवाल तयार करण्याच्या
सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या
****
No comments:
Post a Comment