Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 March 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १७ मार्च २०२० दुपारी
१.०० वा.
****
मुंबईत आज एका
६४ वर्षीय कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. राज्यातला हा कोरोनाचा पहिला तर देशातला तिसरा
बळी ठरला आहे. मात्र हा मृत्यू कोरोनामुळेच झाला का, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. पाच मार्च रोजी दुबईहून परतलेल्या या व्यक्तीवर
प्रथम हिंदुजा रुग्णालयात आणि चौदा तारखेपासून मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार
सुरू होते. या व्यक्तीच्या कुटुंबातल्या दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यासह
हिंदुजा रुग्णालयातल्या काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं
आहे. दरम्यान राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या ३८ झाली आहे.
****
दरम्यान, या
आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उद्योग क्षेत्राचं कामकाज बंद ठेवण्याबाबत आद्योगिक
क्षेत्राच्या प्रतिनिधींशी सकारात्मक बैठक झाल्याचं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे
यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत औद्योगिक प्रतिनिधींकडूनही
अनेक महत्त्वाचे सल्ले मिळाल्याचं टोपे यांनी सांगितलं. कोरोनावर उपचारासाठी अद्याप
ठोस औषध नाही, मात्र या संसर्गामुळे होणाऱ्या त्रासावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या
औषधांचा पुरेसा साठा राज्यात उपलब्ध असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
****
धुळे जिल्ह्यात
चार जणांना कोरोनासदृश आजाराची लक्षणं आढळली आहेत. या चौघा जणांची तज्ज्ञ तीन डॉक्टरांच्या
पथकाकडून तपासणी करण्यात आली. इटली, सौदी अरब आणि पुण्यावरून आलेल्या या चौघांना घरात
बंद खोलीत १५ दिवस आराम करण्याची सूचना देत त्यांचं समुपदेशन करण्यात आल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोना प्रादुर्भावापासून
पोलिसांचा बचाव करण्याच्या उद्देशाने महामार्ग पोलिसांनी मद्यपींना तपासण्याच्या ब्रेथ
ॲनालायझरचा वापर तुर्तास थांबवला आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी पीटीआयला
ही माहिती दिली. परिस्थिती निवळल्यानंतर या यंत्राचा वापर पुन्हा सुरू केला जाणार असल्याचं,
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोरोना प्रादुर्भावाला
प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आणखी तीन देशातून येणाऱ्या प्रवाशांना
तत्काळ प्रभावानं मज्जाव केला आहे. यामध्ये अफगाणिस्तान, फिलिपाईन्स आणि मलेशिया या
तीन देशांचा समावेश आहे. यापूर्वीही सरकारनं जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, इटलीसह अनेक
युरोपीय देश, तुर्की, इराण, आदी देशांमधून प्रवाशांना भारतात येण्यास मनाई केली आहे.
येत्या ३१ मार्चपर्यंत हे मनाई आदेश लागू राहतील.
****
संसदेचं अर्थसंकल्पीय
अधिवेशन नियोजित वेळापत्रकानुसार येत्या तीन एप्रिलपर्यंत सुरू राहील, वेळेपूर्वी गुंडाळलं
जाणार नाही, असं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर हे अधिवेशन लवकर संपवण्याची मागणी काही खासदारांकडून करण्यात आली होती,
त्या पार्श्वभूमीवर जोशी यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.
****
कोरोना मुळे
कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अनेक व्यावसायिकांनी आपल्या कोंबड्या नष्ट
केल्या, या व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी
लोकसभेत शून्यप्रहरात केली.
****
नांदेड जिल्ह्यात
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातले सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार
आहेत. आज माहूर, हिमायतनगर इथले बाजार तर उद्या नांदेडचा सर्वात मोठा बुधवार बाजार
बंद राहणार आहे. या बंद मूळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
भंडारा जिल्हयात
आठ परदेशी व्यक्ती आल्या
असून त्यांची करोना विषयक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जे.
प्रदीपचंद्रन यांनी दिली.तसचं कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत ग्रामस्तरावर समुपदेशन करुन, प्रतिबंधात्मक उपायाबाबत
माहिती देणार असल्याचंही ते म्हणाले.
****
महिला आणि पुरुषांना
समसमान अधिकार असल्याचं सांगत, सर्वोच्च न्यायालयानं नौदलात महिलांचं कायमस्वरुपी कमिशन
स्थापन करण्याला आज मान्यता दिली. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या
पीठानं हा निर्णय दिला. याबाबतची सर्व कार्यवाही पुढच्या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे
निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत.
****
मध्यप्रदेश विधानसभेत
सरकारच्या विश्वासदर्शक ठरावासंदर्भात माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दाखल
केलेल्या याचिकेसंदर्भात, सर्वोच्च न्यायालयानं कमलनाथ सरकारला उद्या सकाळपर्यंत उत्तर
देण्यास सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment