Wednesday, 18 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 18.03.2020 TIME 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****
राज्यात आठ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर बोलत होते. यापैकी चार प्रयोगशाळा उद्यापासून, तर वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत रुग्णालय सुरू असलेल्या औरंगाबाद, धुळे, सोलापूर आदी रुग्णालयांमध्ये येत्या आठ दिवसांत या प्रयोगशाळा सुरू होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आणि संशयित रुग्ण यांना सामान्य नागरिकांपासून वेगळं ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरात ऐंशी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहरात कोरोना विषाणूची साथ पसरू नये, यासाठी प्रशासन शक्य त्या सगळ्या उपाय योजना करत असून, या संबंधीच्या माहितीसाठी मनपा मुख्यलयात आजपासून २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आल्याचं हापौरांनी सांगितलं. नागरिकांना या कक्षाशी, ८९ ५६ ३० ६० ०७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. शहरातल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सुधारत आहे, हा रुग्ण रहात असलेल्या परिसरात एक हजार सातशे नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात कोणीही संशयित आढळून आलं नाही, मात्र तरीही या परिसरातल्या एक्केचाळीस जणांना घरी राहण्याचा सल्ला दिल्याचं महापौरांनी सांगितलं. मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी बोलताना, पुढचे सात दिवस नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावं, असं आवाहन केलं.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या एका युवकाला कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणं आढळून आल्यानं त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयातल्या कोरोना विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यातल्या एका कंपनीत काम करणारा हा तरुण सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं काल आपल्या गावाला परत आला. या तरुणाच्या थुंकीचा नमुना पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल दोन कोरोना संशयितांपैकी एका रुग्णाचा अहवाल नकारात्मक आला आहे.
****
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा जास्त दरानं विक्री करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं नुकतीच एक अधिसूचना काढून, मास्क आणि हँड सॅनिटायझर या दोन्हीचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याचं सांगून, या दोन्ही वस्तूंचा साठा किंवा काळाबाजार करणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्य सरकारनं शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला असतानाही अमरावतीची एसडीएफ इंग्लिश शाळा सुरू असल्यानं या शाळेला नोटीस बजावण्यात आली आहे. माध्यमिक उपशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली तेव्हा शाळेत विद्यार्थी उपस्थित होते. ही गंभीर बाब असून, साथरोग प्रतिबंधक कायद्याखाली या शाळेवर कारवाई का करु नये, याचा खुलासा चोवीस तासात करण्याची नोटीस शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे.
दुसरीकडे, कोरोनासंदर्भात अफवा पसरवणे आणि जनतेची दिशाभूल करून वस्तू विकणे, यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
जर्मनीहून भारतात आलेल्या आणि होम क्वारंटाईन अर्थात घरी विलगीकरणात राहण्याचा शिक्का हातावर असूनही गरीब रथ रेल्वेनं सूरतकडे निघालेल्या चार प्रवाशांना तिकिट कलेक्टर आणि सहप्रवाशांच्या सतर्कतेमुळे आज पालघर स्थानकावर उतरवण्यात आलं. या प्रवाशांना आता पालघर शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोना साथी च्या पार्श्वभूमीवर कोरेगाव- भीमा चौकशी आयोगानं सुनावणीचं कामकाज पुढे ढकललं आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात होणार असलेल्या सुनावण्या आता पुण्याऐवजी मुंबई इथल्या कार्यालयात येत्या तीस मार्च ते चार एप्रिल या कालावधीत होणार आहेत.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. २००४ च्या मार्चपासून ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आहेत. येत्या २७ एप्रिलला ते निवृत्त होतील.
****


No comments: