Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 19 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – १९ मार्च २०२० सकाळी
७.१०
मि.
****
** कोरोना विषाणू प्रादुभावाच्या
पार्श्वभूमीवर राज्यातली शासकीय कार्यालयं एक दिवसाआड पद्धतीनं ठेवण्याचा
आणि तपासणीसाठी राज्यात आठ ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा राज्य
सरकारचा निर्णय
** सर्व स्वायत्त शिक्षण संस्थांना परिक्षा
३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
** राज्यातल्या सात जणांची राज्यसभेवर
बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा
आणि
** राज्यात अनेक भागात गारपीटीसह अवकाळी पाऊस; पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान;
बीड जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू
****
कोरोना विषाणू प्रादुभावाच्या पार्श्वभूमीवर
राज्यातली शासकीय कार्यालयं एक दिवसाआड रोज ५० टक्के कर्मचारी येतील या पद्धतीनं सुरु ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रेल्वे,
एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो
ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेनं चालवण्यासाठी प्रयत्न
करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. दवाखाने, वैद्यकीय
महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील याची दक्षता
घेण्याचं, तसंच जनतेनं जीवनावश्यक
वस्तुंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा
करू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी
केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी राज्यात आठ ठिकाणी प्रयोगशाळा सुरू केल्या
जाणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
ते काल पुण्यात राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर
बोलत होते. यापैकी चार प्रयोगशाळा आजपासून सुरु होणार आहेत.
त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत रुग्णालय सुरू असलेल्या,
औरंगाबाद, धुळे, सोलापूर
आदी रुग्णालयांमध्ये येत्या आठ दिवसांत या प्रयोगशाळा सुरू होणार असल्याची माहिती टोपे
यांनी दिली. सध्या राज्यात फक्त तीन ठिकाणी, मुंबई, पुणे आणि नागपूर इथे अशी सुविधा असणाऱ्या प्रयोगशाळा
आहेत.
दरम्यान, राज्यात महत्त्वाच्या सेवा बंद केल्या जाणार नाहीत, असं टोपे यांनी सांगितलं. पाणीपुरवठा, स्वच्छता, दैनंदिन गरजेच्या वस्तुंची दुकानं राज्यभरात
सुरू राहतील, मात्र तातडीची गरज नसलेली कपडा, दागिने आदींची दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुंबईत नागरिकांनी शहर बस आणि उपनगरी रेल्वेगाड्यांतली गर्दी कमी केली नाही,
तर या सेवा दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल,
असा इशाराही टोपे यांनी दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यात काल आणखी चार करोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे
राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ४५ झाली आहे. पिंपरी चिंचवड
इथं ११ रुग्ण, पुणे - नऊ, मुंबई - आठ, नागपूर - चार, यवतमाळ, नवी मुंबई,
कल्याण इथं प्रत्येकी तीन, तर रायगड, ठाणे, अहमदनगर, रत्नागिरी आणि औरंगाबाद
इथं प्रत्येकी एक रुग्ण आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेला संबोधित करणार आहेत.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आणि संशयित
रुग्ण यांना सामान्य नागरिकांपासून वेगळं ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरात ऐंशी विलगीकरण
कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी काल औरंगाबादमध्ये वार्ताहरांशी बोलतांना
ही माहिती दिली. शहरात कोरोना विषाणूची साथ पसरू नये, यासाठी प्रशासन शक्य त्या सगळ्या उपाय योजना करत असून, या संबंधीच्या माहितीसाठी मनपा मुख्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात
आल्याचं ते म्हणाले. नागरिकांना या कक्षाशी, ८९ ५६ ३० ६० ०७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असं महापौरांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या एका
युवकाला कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणं आढळून आल्यानं त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातल्या एका कंपनीत काम करणारा हा तरुण सर्दी, खोकला
आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं काल आपल्या गावाला परत आला.
दरम्यान, जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल दोन्ही
कोरोना संशयित रुग्णांचा अहवाल नकारात्मक आला आहे.
****
समाजमाध्यमांवर सध्या ‘कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातल्या
रुग्णालयाची यादी व्हायरल होत आहे. मात्र कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही, असं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांनी समाजमाध्यमांवरील चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन आरोग्य विभागानं
केलं आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद,
राष्ट्रीय परिक्षा मंडळ, मुक्त विद्यापीठं,
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, राष्ट्रीय शिक्षक
शिक्षण परिषद यासह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त
शिक्षण संस्थांना त्यांच्या परिक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे निर्देश मनुष्यबळ
विकास मंत्रालयानं दिले आहेत. मंत्रालयानं मुख्य सामायिक प्रवेश
परिक्षा जेईई पण पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. या आदेशानुसार
सीबीएसईनं दहावी आणि बारावीची परिक्षा पुढे ढकलली आहे.
****
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण
मध्य रेल्वेनं काही गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद -रेणीगुंठा- औरंगाबाद, नांदेड -औरंगाबाद
-नांदेड एक्सप्रेस या गाड्या उद्या २० मार्चपासून ३० मार्च पर्यंत पूर्णत:
रद्द करण्यात आल्या आहेत, तर निझामाबाद-पंढरपूर-निझामाबाद गाडी एक एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत
नांदेड ते निझामाबाद दरम्यान अंशत: रद्द करण्यात आल्याचं दक्षिण
मध्य रेल्वेच्या जनसंर्पक कार्यालयांन कळवलं आहे..
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
यांच्यासह राज्यातल्या सात
जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवडीची काल अधिकृत घोषणा झाली. पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी
काँग्रेसच्या फौजिया खान, भारतीय
जनता पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड आणि उदयनराजे भोसले, काँग्रेसचे राजीव सातव आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये समावेश आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून
भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं त्यांच्या नावाची शिफारस केली
होती. मार्च २००४ पासून ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश
आहेत. येत्या २७ एप्रिलला ते निवृत्त होतील.
****
राज्यात अनेक भागात काल गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचं
मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
लातूर जिल्ह्यातल्या लातूर, औसा, चाकुर,
रेणापूर तालुक्यात, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई जवळ
आपेगाव परिसरात गारांचा पाऊस झाला. तालुक्यातल्या पूस परिसरात
झालेल्या पावसात वीज पडून एक गाय दगावली, तर परळी इथं वीज पडून
एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
परभणी जिल्ह्यातल्या पालम गंगाखेड, पुर्णा भागात तसंच नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. नांदेड शहरात आज पहाटेही पाऊस झाला. या पावसामुळे रात्री बराच वेळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या गोविंदपूर, देवधानोरा, खामसवाडी परिसरात तसंच हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा फाटा, डिग्रस, एकघरी इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
आज पहाटे आखाडा बाळापूर, जवळा, पांचाळ सह अनेक भागात पाऊस पडला. जालनासह राज्यातल्या वाशिम, गडचिरोली,
जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांतही काल अवकाळी पाऊस
झाला.
या पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा सुर्यफुल,
या पिकांच नुकसान झालं, तसंच
आंब्याचा मोहोर गळाला त्याचबरोबर द्राक्ष बागांचंही नुकसान झालं.
****
परभणी इथं काल दहावीच्या विज्ञान-द्वितीय या विषयाच्या परीक्षेत जिल्ह्यात
११ जणांना नक्कल करतांना रंगेहाथ पकडण्यात आलं. कॉपीमुक्त अभियान
राबवण्यासाठी जिल्ह्यात ९३ बैठी पथकं तसंच ३३ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यात सेलू नगरपालिकेत काल प्रत्येकाला
साबणानं हात धुवून प्रवेश देण्यात आला.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालय तसंच तहसील कामाचं स्वरूप पाहूनच अभ्यागतांना
कार्यालयात सोडण्यात आलं. कार्यालयातली अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी
ही दक्षता घेण्यात आली.
****
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या तीनशेहून
अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या
विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. काल या संपाचा तिसरा
दिवस होता. रजा रोखीकरण, वार्षिक वेतनवाढ,
महागाई भत्ता यासह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असं अध्यक्ष
आदित्य सारडा यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेडकडून सुरु करण्यात आलेल्या सहा हमीभाव तूर खरेदी केंद्रावर कालपर्यंत
तेराशे बासष्ठ शेतकऱ्यांकडून अकरा हजार आठशे पाच क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.
सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन कोटी सव्वीस लाख रुपये जमा
करण्यात आले आहेत.
****
लातूर महानगरपालिकेच्या शहर वाहतूक करणाऱ्या बसेसमध्ये काल स्वच्छता
मोहिमेअंतर्गत फवारणी करण्यात आली. ही फवारणी नियमित केली जाणार
असून, जनतेनं सर्वत्र स्वच्छता ठेवावी आणि आवश्यक असेल तरच प्रवास
करावा, असं आवाहन उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी यावेळी केलं.
****
No comments:
Post a Comment