आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ मार्च २०२० सकाळी ११.००
वाजता
****
कोरोना प्रादुर्भावाला
प्रतिबंध करण्यासाठी रेल्वेनं देशभरात धावणाऱ्या ८४ रेल्वे रद्द केल्या आहेत. उद्या
२० मार्चपासून येत्या ३१ मार्चपर्यंत या गाड्या धावणार नाहीत. पूर्ण देशभरात रद्द करण्यात
आलेल्या रेल्वेची संख्या आता १५५ झाली आहे. दरम्यान मुंबईतल्या दोन नवीन रुग्णांसह
देशभरात कोरोना बाधितांची संख्या १७१ झाली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज रात्री ८ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, त्यासाठीचे
प्रतिबंधात्मक उपाय आणि त्यावर सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत ते संवाद साधणार
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे
****
रिलायन्स उद्योग
समूहाचे चेअरमन अनिल अंबानी आज अंमलबजावणी संचालनालय - ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले.
येस बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अंबानी यांना समन्स बजावलं होतं. अंबानी यांच्या नऊ
उद्योग समूहांनी येस बँकेतून १२ हजार ८०० कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे.
****
तेजस या देशी
बनावटीच्या ८३ लढाऊ विमानांच्या खरेदीला संरक्षण
संपादन परिषदेनं मान्यता दिली आहे. या विमानांच्या ताफ्यामुळे भारतीय हवाई दलाच्या
संरक्षण सज्जतेत मोठी वाढ होणं अपेक्षित आहे. तेजस या हलक्या लढाऊ विमानांची रचना विमान
विकास संस्थेनं केली असून हिंदुस्थान एरॉनॉटिकल्स लिमिटेडनं, संरक्षण संशोधन आणि विकास
संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निर्मिती केली आहे.
****
नांदेड शहर तसच
जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे काढणीस आलेल्या
अर्धापूर, हदगाव, हडसणी, लोहा मुखेड, देगलूर, नरसी या भागातील गहू, ज्वारी हरभरा, सुर्यफुल, या पीकांचं मोठ नुकसान झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यातही
अनेक भागात काल गारपीटीसह पाऊस झाला, यामुळे रबी पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ठाणे जिल्यात
डहाणू आणि तलासरी तालुक्याला आज सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के
जाणवले. यामुळे या भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
****
No comments:
Post a Comment