Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø कोरोना
विषाणूचा संसर्ग कमी असलेल्या भागात शेती, बांधकाम,
माहिती तंत्रज्ञान, विशेष आर्थिक क्षेत्र आणि ग्रामीण उद्योग २० एप्रिलपासून सशर्त सुरु होणार; टाळेबंदी संदर्भात
केंद्र सरकारचे दिशा निर्देश जारी; कठोरपणे
पालन करण्याचे आदेश
Ø संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या,
स्थलांतरीत मजुरांना कोरोना विषाणू संसर्ग झाला नसल्याची खातरजमा करुन घेतल्यानंतर घरी
पाठवण्याबाबत विचार करण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
Ø राज्यात आणखी २३२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण; नऊ
जणांचा मृत्यू झाला.
Ø औरंगाबादची ५९ वर्षीय महिला यशस्वी उपचारानंतर कोरोना
विषाणूमुक्त
आणि
Ø यंदा सरासरी पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
****
देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि कोट्यवधी लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी असलेल्या नियंत्रण क्षेत्राबाहेरच्या भागात शेती,
बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, विशेष आर्थिक
क्षेत्र आणि ग्रामीण भागातले काही उद्योग २० एप्रिल पासून सशर्त सुरु
करण्यात येणार आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी
देशात लावलेल्या टाळेबंदीच्या संदर्भात केंद्र सरकारनं काल नवे दिशा निर्देश जारी केले.
केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी काल सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि
पोलिस महासंचालकांसोबत दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून एक बैठक घेतली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका
आयुक्तांनीही सहभाग घेतला होता.
या दिशानिर्देशांमध्ये नागरिकांची
गैरसोय टाळण्यासाठी काही व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. २० एप्रिल नंतर नियंत्रण क्षेत्राबाहेरच्या भागात त्याची अंमलबजावणी सुरू होणार
आहे. यात मालवाहतूक करणारी वाहनं, वीज दुरूस्ती
कामगार, प्लंबर, मोटर मेकॅनिक यासारखे स्वयंरोजगार
करणाऱ्या कामगारांना सूट देण्यात आली आहे. महामार्गावरील
ढाबे सुरु होणार, मात्र रेस्टॉरंट, हॉटेल
बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालयं,
कोचिंग क्लास, चित्रपपट गृह, मॉल, बाजारपेठा, जलतरण तलाव,
खेळांचे मैदान लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे बंद राहणार आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व व्यवहार सुरळीत सुरु राहतील. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी -मनरेगाची कामं सुरक्षित अंतर ठेऊन सुरू करण्यात येणार आहेत. तसंच केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची कार्यालयंही सुरू राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर मनाई करण्यात
आली असून, मद्य, गुटखा यासारख्या वस्तुंच्या
विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी
तसंच कार्यालयात अथवा सार्वजनिक ठिकाणी, मास्कचा वापर अनिवार्य
करण्यात आला आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर
बंदी असून, कार्यालयात प्रत्येक शिफ्ट मध्ये एका तासाचं अंतर
ठेवणं बंधनकारक ठेवण्यात आलं आहे. कामगारांसाठी
सॅनिटायझरची व्यवस्था आणि तापमोजणी
करणं आवश्यक असल्याचंही सरकारनं जाहीर केलं आहे.
****
केंद्र सरकारनं
टाळेबंदीच्या काळात जनतेला पिण्याचं स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठीही
दिशा निर्देश दिले आहेत. पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणीही
आवश्यक साधनांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून, पाण्याच्या शुद्धतेसाठी
क्लोरिनच्या गोळ्या किंवा ब्लिचिंग पावडरचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
दरम्यान, नव्यानं जारी करण्यात आलेल्या या दिशानिर्देशांचं कठोर पालन व्हावं यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य
आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. केंद्रीय गृह
सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात या दिशानिर्देशांची कडकपणे
अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे, गरज असल्यास संबधित राज्यं
आपल्या स्थानिक गरजेनुसार हे दिशानिर्देश आणखी कडक करू शकतात, असंही गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. या सर्व दिशानिर्देशांचा
प्रसार-प्रचार करण्यासही सर्व राज्यांना सूचित करण्यात आलं आहे.
****
येत्या तीन मे पर्यंत देशात
टाळेबंदी वाढवण्यात आली असल्यामुळे,
रेल्वे सेवाही तीन मे पर्यंत बंद राहणार असून, आरक्षण सुविधा बंद करण्यात आली आहे. पुढचे आदेश येईपर्यंत
कोणत्याही प्रकारचं तिकिट आरक्षित करता येणार नाही. प्रवाशांना
आरक्षित तिकिटं रद्द करता येतील आणि रद्द तिकीटाची पूर्ण रक्कम परत मिळेल, असं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं. ऑनलाईन तिकीट रद्द
करण्याची सुविधा सुरु राहील तसंच ऑनलाईन तिकीटाची रक्कम प्रवाशांच्या खात्यामध्ये जमा
केली जाईल. ज्या प्रवाशांनी १३९ नंबर वरून तिकीट रद्द केले असेल
अशा प्रवाश्यांना रेल्वे आरक्षण कार्यालयात प्रवासाच्या तारखेपासून ९० दिवसापर्यंत
आपले पैसे परत घेता येतील. आहे. या दरम्यान
रेल्वेची मालवाहतूक आणि पार्सल सेवा मात्र सुरू राहणार आहे.
****
संपूर्ण देशावर संकट असताना, पक्षीय मतभेद बाजूला ठेवावेत, आणि सगळ्यांनी मिळून कोरोना
संकटाचा पराभव करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून
जनतेशी बोलत होते. वांद्रे स्थानकाबाहेर मंगळवारी झालेला प्रकार
चुकीचा असून, असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असं पवार यांनी म्हटलं आहे.
सध्या टाळेबंदीमध्ये अस्वस्थ असलेल्या समाजघटकाचा
आत्मविश्वास वाढवण्याची गरजही त्यांनी नमूद केली.
****
संचारबंदीमुळे अडकून
पडलेल्या, राज्यातल्या स्थलांतरीत मजुरांना कोरोना विषाणू संसर्ग झाला नसल्याची खातरजमा
करुन घेतल्यानंतर घरी पाठवण्याबाबत विचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला सूचित केलं आहे. याबाबत दाखल
झालेल्या दोन याचिकांची सुनावणी करताना न्यायमूर्ती आर के देशपांडे यांनी ही सूचना
केली. या मजुरांना त्यांच्या गावी पाठवलं तर प्रशासनावरचा ताणही
कमी होईल, असं ते म्हणाले. त्यावर, स्थलांतरीत आणि रोजंदारी मजुरांच्या प्रश्नांचं निवारण करण्यासाठी नेमलेली
राज्यस्तरीय समिती न्यायालयाच्या या सूचनेवर विचार करेल, असं
महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितलं.
****
कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर
यांनी काल नवी दिल्लीत अखिल भारतीय कृषी परिवहन कॉल सेंटरचा प्रारंभ केला. नाशवंत वस्तू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी टाळेबंदीच्या काळात या कॉल सेंटरचा उपयोग होणार आहे. एक आठ शून्य
शून्य एक आठ शून्य चार दोन शून्य शून्य आणि एक चार चार आठ आठ हे या कॉल सेंटरचे दूरध्वनी
क्रमांक असून कोणत्याही वेळेस या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. यामुळे राज्यांना एकमेकांशी समन्वय साधणं सोपं होणार आहे.
****
राज्यात काल आणखी २३२
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या दोन हजार ९१६
झाली आहे. राज्यात काल या आजारानं नऊ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा १८७ झाला
आहे. आतापर्यंत २९५ जण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून
सुटी देण्यात आली आहे.
****
नाशिक शहरात काल आणखी एक २४
वर्षीय कोरोना बाधीत रूग्ण आढळला असून, त्यामुळे नाशिक
जिल्ह्यात बाधितांची संख्या ४३ झाली आहे. काल आढळलेला हा रुग्ण मुंबईतून आल्यानतंर स्थलांतरीत मजुर म्हणून त्याला नाशिक-
पुणे रोडवरील समाज कल्याण खात्याच्या निवारा केंद्रात ठेवण्यात आलं होतं.
जिल्ह्यात मालेगाव इथल्या एका कोरोना विषाणू बाधिताचा
मृत्यू झाला आहे.
****
औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू
बाधित असलेली ५९ वर्षीय महिला यशस्वी उपचारानंतर
कोरोना विषाणूमुक्त झाली आहे. त्यांची अंतिम चाचणी नकारात्मक आली आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर
सुनील गायकवाड यांनी या महिला रूग्णाला शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काल सुटी
देण्यात आल्याचं सांगितलं. ते म्हणाले…
५९ वर्षीची महिला जिल्हा रूग्णालयात
ॲडमीट करण्यात आलं होत. त्यांना आमच्या फिजीसियन्सच्या टिम ने आणि तिला पहिल्या ५-६
दिवस ऑक्सिजनची गरज होती. आणि नंतर प्रोटोकॉल प्रमाणे ट्रिटमेंन्ट चालू केल्या नंतर
तिच्या मध्ये हळूहळू सुधारणा झाली. तिचे बिपी, इ.सी.जी बाकी रक्ताच्या तपासण्या सर्व
नार्मल आहेत. आणि त्यामुळे १४ दिवस झाल्यामुळे आम्ही शासनाच्या गाइडलाईन नुसार त्यांना
आज आम्ही रूग्णालयातून सूट्टी देत आहोत.
कितीही कठीण परिस्थिती आली तरी
न घाबरता आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर या आजारावर मात करता येत असल्याची भावना या
कोरोनामुक्त महिलेनं व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या…
एकच संदेश
सांगेल की, किती जरी कठीण परिस्थिती आली तरी, आपली इथली ट्रिट पन वेवस्थीत आहे हे आपल्याला
वेवस्थीत लक्ष्यात येते. आपल्या बाकीच्या सेवा सुद्धा पाहून आपल्या मध्ये आत्मविश्वास
निर्माण झाला पाहिजे. घाबरण्यासारखे असं काहीच नाही आहे, प्रत्येकानेच सेफ डिसटन्सचे
पालन केलं पाहिजे. आणि जेवढा नियम जो सरकारने सांगितला आहे, तो नियम व्यवस्थीत पाळा,
तरी ऐवढी संख्या वाढणार नाही.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर यंदा एक मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याचा अध्यादेश राज्य
सरकारनं काढला आहे. प्रत्येक जिल्ह्यात सकाळी आठ वाजता पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ यांच्याच उपस्थितीत ध्वजारोहण करण्याचे
आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याशिवाय इतर मान्यवरांना कार्यक्रमाला आमंत्रित करू
नये तसेच कवायतीचंही आयोजन करून नये, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
विधीमंडळ, उच्च न्यायालय आणि इतर ठिकाणीही कमीतकमी उपस्थितीत
ध्वजारोहण करण्यास सांगितलं आहे.
****
मुंबईत वांद्रे रेल्वे
स्थानकावार जमा झालेल्या गर्दी प्रकरणी उस्मानाबादचे एबीपी माझाचे
वार्ताहर राहुल कुलकर्णी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अअक करण्यात आली
आहे. रेल्वेच्या एका पत्राच्या आधारे त्यांनी विशेष रेल्वेगाडी सोडण्यासंदर्भात बातमी
दिली होती.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
अंगणवाडी सेविकांच्यामार्फत
वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार येत्या आठवडाभरात सर्व बालकापर्यंत पोहोचवला
जाईल, असं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. ठाकूर यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे पोषण
आहार पुरवठा, अंगणवाडी सेविकांचं मानधन, बाल संस्थांसाठीचं अनुदान वितरण आदींबाबत आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. एकही बालक, गर्भवती,
स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर आणि जळकोट
बाजार समिती संचारबंदीचे सगळे नियम पाळत कालपासून सुरु करण्यात आली. संचारबंदीच्या काळात सामाजिक सुरक्षा अंतराचा नियम पाळण्याचा कसोशीनं प्रयत्न
केला जात असून, प्रत्येक दुकानात मालक,
मुनीम आणि तिन हमाल असे पाच लोकांनाचा परवानगी देण्यात आली असल्याचं उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील यांनी सांगितलं.
बाजार समितीमध्ये प्रवेश करतानाच प्रत्येकाला सॅनीटाझर वापरण्याची व्यवस्था
केली आहे. प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणंही बंधनकारक केल्याचं
ते म्हणाले.
****
औरगाबाद शहरामध्ये सार्वजनिक
ठिकाणावर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर सलग तिसऱ्या दिवशी महापालिकेनं
दंडात्मक कारवाई केली. काल शहरातल्या नऊ प्रभागात ८९ नागरिकांकडून
प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ४४ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला.
****
कोरोनाग्रस्त हॉटस्पॉट जाहीर
झालेली राज्यं किंवा जिल्ह्यातून प्रवास करून येणाऱ्या नागरिकांनी औरंगाबाद जिल्ह्यात
प्रवेश करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी याबाबत सूचना
जारी केली आहे. विनाकारण अथवा भावनिक कारणे दाखवून परवानगी शिवाय
प्रवेश करू इच्छिणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यात आली आहे.
खाजगी तसंच सरकारी रुग्णवाहिकेमधून येणारे रुग्ण
अथवा चालक यांनी देखील संबंधित जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं
केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन खात्यात
प्रत्येकी पाचशे रूपये आणि प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत प्रत्येकी दोन हजार रूपये
रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. औरंगाबाद
जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांविषयीची माहिती अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर
यांनी दिली आहे. ते म्हणाले…
जनधन योजनेच्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण
सात लाख पस्तीस हजार महिलांची खाती आहेत. ज्या खात्याला प्रत्येकी पाचशे रूपये प्रमाणे
केंद्र सरकारनं पैसे पाठवलेले आहेत एप्रिल महिन्याचे. आणि एका महिन्याला साधारण २७
कोटी रूपये रक्कम येत आहे. तीन महिने मिळून ऐंशी कोटी रक्कम जिल्ह्यामध्ये वितरीत होणार
आहे. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रूपये प्रमाणे केंद्र
सरकारनं पैसे पाठवलेले आहेत. ती रक्कमही या महिन्यामध्ये जमा झालेली आहे. त्याच्यामध्ये
साडे तीन लाखांच्या वर Account PM Kisan Beneficiary चे आहेत.
****
औरंगाबाद इथं राष्ट्रीयकृत बँकांच्या
शाखांबाहेर महिलांनी रांगा लावल्याचं दिसून आलं. परभणी
जिल्ह्यातल्या सर्व बँकांमध्येही काल जनधन खात्यातले पैसे काढण्यासाठी गर्दी दिसून
आली. जिंतूर आणि चारठाणा इथल्या बँकेत मात्र काल सामाजिक अंतर
राखण्याचा नियम पाळण्यात आला.
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात
किनी इथल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खातेधारकांनी काल पैसे उचलण्यासाठी एकच गर्दी
केली होती.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन इथं
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटप सुरू आहे. केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल या कामाची पाहणी
केली. राज्य राखीव दलाच्या जवांनांनी अन्नाची पाकिटे तयार करून
परिसरातल्या गरजुंना वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या दोन
दिवसांत तीन हजारांहून अधिक अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या औशाचे आमदार
अभिमन्यू पवार यांनी आपल्या मतदारसंघातल्या जनतेला कोरोना विषाणू
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्यासाठी आवाहन केलं होतं.
या आवाहनाला प्रतिसाद देत औसा तालुक्यातील नांदुर्गा आणि माळकोंडजी इथल्या
ग्रामस्थांनी प्रधानमंत्री सहायत्ता निधीसाठी ३२ हजार रूपयांची मदत केली
****
औरंगाबाद शहरातल्या विविध
भागातल्या दहा हजार गोरगरिब गरजू नागरिकांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार
सतीश चव्हाण यांनी किराणा साहित्याचं वाटप केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर तसंच शहरात स्पर्धा
परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ‘फुड पॅकेट’व्दारे भोजनाची
व्यवस्था केली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर
तालुक्यात पवना गाव शिवारात दस्तगीर वाडी इथं २४ महिला पुरुष तेलंगणा राज्यातून आले. त्यांना काल सकाळी हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन विलगीकरणात
ठेवलं आहे
****
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातही काटेकोरपणे उपाययोजना केल्या जात आहेत.
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातलं सांसद आदर्श ग्राम पालखेडमध्येही
ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी एकमेकांना मदत करत या विषाणूपासून गावाचा बचाव केला आहे.
अधिक माहिती देतांना सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर जाधव म्हणाले….
या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी पालखी ग्रामपंचायतच्या वतीने गावांमध्ये
सेंटर त्याचप्रमाणे मास आणि आता साबण हे सर्व साहित्य प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायतीने
मोफत दिले आहे. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गहू-तांदूळ प्रत्येक लाभार्थ्यांना
वाटप घेत आहे. बँकेच्या संदर्भामध्ये प्रत्येक खातेदारांच्या जनधन खात्यामध्ये पाचशे
रुपये जमा झाले आहे त्याच पद्धतीने बँकेचे कर्ज असतील त्याची मुदत वाढ मिळाली आहे विमा
भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या चारठाणा
इथं भाजी बाजारात काल नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सामाजिक अंतर पाळण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं वारंवार करण्यात येत असूनही
नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक ठिकाणी बाजारपेठेत पोलीस
बंदोबस्त तैनात करण्यात येत असून विक्रेते आणि ग्राहक यांच्यात अंतर ठेवण्याचं बंधनकारक
करण्यात आलं आहे. चारठाणा इथं मात्र नियम पाळला जात नसल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
टाळेबंदीच्या काळात गरजू व्यक्तींना अन्नधान्य तसंच जेवणाचं वाटप करतानाचे छायाचित्र,
तसंच व्हिडिओ चित्रीकरण करून समाज माध्यमांवर पोस्ट करण्यास जालन्याचे
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मनाई केली आहे.
****
लातूर जिल्ह्यात उज्ज्वला गॅस
योजनेतल्या १२ हजार ७१७ लाभार्थ्यांनी सिलेंडर खरेदी केले
आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
जिल्ह्यातील एक लाख २९ हजार पाचशे एकोणचाळीस लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
त्यातील १२ हजार ७१७ लाभार्थ्यांनी सिलेंडर खरेदी
केले अशी माहिती जिल्हा
समन्वय अधिकारी कौशल खंडेलवाल यांनी दिली. जिल्ह्यात उज्वला योजनेचे एक लाख २९ हजार
५३९ लाभार्थी आहेत. त्यापैकी एक लाख ७८९ लाभार्थीच्या खात्यावर पैसेही जमा झाले असल्याची माहिती श्री.खंडेलवाल
यांनी दिली.
अरुण समुद्रे आकाशवाणी
बातम्यांसाठी लातूर.
****
परभणी जिल्ह्यातल्या ११ केंद्रांच्या
माध्यमातून टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात दीड हजाराहून अधिक
जणांनी शिव भोजन योजनेचा लाभ घेतला. टाळेबंदीच्या काळात कामगार,
गरजुंना पाच रुपयात शिव भोजन थाळी देण्यात येत आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर
इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं शहरातली भाजी मंडई, जनावरांचा दवाखाना आणि हायस्कूल ग्राऊंडच्या गेटवर प्रत्येकी सॅनिटायझर वाटप
करण्यात आले.
****
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी
नांदेड जिल्ह्यातून आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीस एकूण ६० लाख ६३ हजार ७९४ रूपये, तर पंतप्रधान
पीएम केअर निधीस १३ लाख ७४ हजार ५५१ रूपये
मदत निधी जमा
झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्धी
पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
****
वाशिम जिल्ह्यातल्या
मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीनं टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांचा मालाची खरेदी- विक्री करण्यासाठी मर्यादित शेतकऱ्यांचा माल
खरेदी- विक्री करण्याची
कल्पना राबवण्यास सुरूवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा माल विक्री होण्यास मोठी मदत
मिळत असल्याचं सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितलं. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
विविध प्रसारमाध्यमातून शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आव्हान केले गेले. त्यानंतर फोनवर शेतकऱ्यांकडून मालाची
पूर्वनोंदणी बाजार समितीमध्ये केली जाते. त्यानुसार दररोज २०० शेतकऱ्यांना फोनवर मालविक्री साठी बोलावले जाऊन त्यांच्याकडून स्वच्छतेचे नियम पाळत
आणि विशिष्ट अंतर ठेवत शेतकऱ्यांचा मालक
विक्रीसाठी बाजार समितीमध्ये ठेवला जातो. त्यातून शेतकऱ्यांच्या मालास येथे योग्य भाव मिळतो.
आकाशवाणीच्या बातम्यासाठी
वाशिम सुनील कांबळे
****
जालना इथल्या राज्य राखीव बल
गट क्रमांक तीनचे जवान स्वत: अन्नाची पाकिटं तयार करून
परिसरातल्या गरजुंना वाटप करत आहेत. दोन दिवसांत तीन हजारांहून
अधिक अन्नाच्या पाकिटांचं वाटप करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर अत्यंत गरजु गोर गरीब नागरिकांना इतर राज्यांप्रमाणे तातडीनं निर्वाह
भत्ता उपलब्ध द्यावा अशी मागणी उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. केशरी शिधापत्रिका धारकांना
एप्रिल महिन्यातच सवलतीच्या दरातील धान्य उपलब्ध करून देण्याची मागणीही पाटील यांनी
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
****
यंदा पावसाळा सामान्य राहणार
असून, सरासरी एवढा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काल दुपारी घेतलेल्या
पत्रकार परिषदेत हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पहिला दीर्घकालीन अंदाज वर्तवताना
ही माहिती दिली. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन सुमारे आठवडाभरानं
लांबणार असून, पुण्यात १० जूनला तर मुंबई ११ जूनला मोसमी पाऊस
दाखल होण्याचा अंदाज आहे. पावसाच्या परत जाण्याचा कालावधीही सुमारे
दहा दिवस लांबण्याची शक्यता असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment