Friday, 17 April 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 17.04.2020 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 April 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक१७ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.

****

** कोरोना विषाणू संसर्गाच्या रॅपिड टेस्टिंगच्या पाच लाख किट्स चीनमधून आयात

** येत्या २० एप्रिलपासून इलेकट्रिक वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीला सरकारची परवानगी

** राज्यात आणखी सहा शासकीय कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

** रमझानच्या पवित्र महिन्यात टाळेबंदी, संचारबंदी आणि सामाजिक अंतराच्या नियमांच काटेकोर आणि प्रामाणिकपणे पालन करण्याचे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे अध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांचे निर्देश

** राज्यात आणखी २८६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण; सात जणांचा मृत्यू

आणि

** औरंगाबाद शहरात तीन तर परभणी शहरातही एक कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळला.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या रॅपिड टेस्टिंगच्या पाच लाख किट्स चीनमधून देशात आल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. मात्र या किट्सचा वापर रुग्णांचं निदान करण्यासाठी केला जाणार नाही, तर केवळ देखरेखीसाठी केला जाणार असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं. कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्ती, हॉटस्पॉटमध्ये असलेल्या व्यक्ती, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कर्मचारी, सारीआजाराने ग्रस्त रुग्ण, इन्फ्लुएन्झाची लक्षणं असलेले रुग्ण, परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींसाठीच या किट्स वापरल्या जाणार आहेत. यामधून एखाद्या भागात कोरोना विषाणूचा संसर्गाचा कल कसा आहे हेच जाणून घेतलं जाणार असल्याचं गंगाखेडकर यांनी सांगितलं.

रॅपिड टेस्ट किट्सच्या व्यतिरीक्त नेहमीच्या पद्धतीनं देशात दररोज ७८ हजाराहून अधिक चाचण्या करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत देशात सुमारे २ लाख ९० हजार चाचण्या झाल्याची माहिती गंगाखेडकर यांनी दिली.

****

देशात टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या २० एप्रिलपासून मोबाईल फोन आणि काही इलेकट्रिक वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीला सरकारनं परवानगी दिल आहे. टाळेबंदीच्या  सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी जारी केल्या, यात ही परवानगी देण्यात आली. यामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडल यांसारख्या ऑनलाईन संकेतस्थळांवरून मोबाईल फोन, टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप आणि अन्य स्टेशनरी वस्तू खरेदी करता येणार आहेत. या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं तैनात केलेल्या वाहनांसाठी संबंधित परवानगी घ्यावी असं गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

****

राज्यातल्या स्थलांतरित कामगारांसाठी निवास, भोजन आणि आरोग्य सुविधा निश्चित करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल राज्यांच्या मुख्य सचिवांशी केलेल्या चर्चेनंतर या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा, आणि प्रत्येक शिबीर एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली असावं, असं यावेळी सांगण्यात आलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका दूर करण्यासाठी सरकारनं आकस्मिक तपासण्या सुरू करण्याची आवश्यकता असल्याचं, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी, या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्ण देशानं एकजूट होण्याचं आवाहन केलं. या संकटातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी सर्व राज्यांना पुरेशा प्रमाणात साहित्य पुरवठा होण्याच्या गरजेवर गांधी यांनी भर दिला.

****

कोरोना विषाणू बाधितांबाबतच्या दिशानिर्देशांचं उल्लंघन तसंच चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल एका वृत्तवाहिनीच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश राज्याच्या गृहविभागानं दिले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीसंदर्भात चुकीची माहिती दिल्याबद्दल संबंधित वार्ताहर तसंच वृत्तनिवेदकाविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, वांद्रे रेल्वेस्थानक गर्दी प्रकरणी अटक झालेले एबीपी माझा वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाला आहे. पंधरा हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सामाजिक सुरक्षा अंतर राखणं आणि तोंडाला मास्क बांधणं ही आता जीवनशैली व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. फोनवरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. लातूर इथं कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्याची प्रयोगशाळा लवकरच सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यात बिघडलेल्या अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी सरकारनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीची काल दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बैठक झाली. टाळेबंदीतून कोणकोणत्या घटकांना वगळणं शक्य आहे, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विशेषतः नांदेड सारख्या कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेतीविषयक, उद्योगांची कामं लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

****

२५ मार्च ते तीन मे दरम्यान ज्या प्रवाशांनी विमान प्रवासाची तिकीटं आरक्षित केली होती, त्यांना कोणतेही शुल्क वजा न करता संपूर्ण परतावा मिळाला पाहिजे असं नागरी उड्डाण मंत्रालयानं सांगितलं आहे. टाळेबंदीमुळे देशांतर्गत विमान कंपन्यांनी रद्द केलेल्या उड्डाणांसाठी रोख परतावा न देता त्याऐवजी ती रक्कम भविष्यात होणाऱ्या प्रवासी खर्चात जमा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक प्रवाशांनी सामाजिक माध्यमांवर तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर मंत्रालयानं हे निर्देश जारी केले.

****

कोरोना विषाणूच्या साथीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा आणि मुलाखतींच्या नव्या तारखा संचारबंदी संपल्यानंतर जाहीर केल्या जाणार आहेत. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर माहिती दिली जाईल, असं आयोगानं म्हटलं आहे. आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी वर्षभरासाठी मूळ वेतनात ३० टक्के कपात करण्याचाही निर्णय घेतला आहे.

कर्मचारी निवड आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या काही परिक्षांच्या तारखांचा निर्णय तीन मे नंतर घेऊन या तारखा मंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येतील, असं मंडळानं कळवलं आहे. मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन पंतप्रधान मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

****

कोरोना विषाणू संदर्भात तपासणी करण्यासाठी आणखी सहा शासकीय तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र राजेश टोपे यांनी काल सांगितलं. ते म्हणाले..

टेस्टींगचं प्रमाण आपल्याला आणखीन पण वाढवायचं आहे. कारण टेस्टिंगचे लॅब आतापर्यंत आपल्याजवळ प्रायव्हेट पंधरा आणि शासकीय पंधरा असे मिळून तीस आहेत.आणखी सहा लॅब आपण वाढवतो आहे. जेणे करून एकूण गर्व्हनमेंटचे छतीस फॅसलटीज आपण उपलब्ध करून देत आहोत.पूल टेस्टिंगचा आपण आता परवानगी आयसीएमआर कडून मागवली आहे. रॅपिड टेस्टिंगसाठी परवानगी आपण आयसीएमआरकडून मागवली आहे. पूल टेस्टिंगचा अर्थ असा की दहा सँपल, वीस सँपल किंवा तीस सॅंपल पर्यंत आपल्याला ज्यांच्यावर संशय आहे त्यांचे एकत्र केले आणि त्या एकत्रचा एकच सँपल होईल.

****

महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश केंद्र सरकारनं जारी केले आहेत. काही संस्थांनी असा तगादा लावल्याचं निदर्शनास आलं आहे, त्यामुळे शुल्क भरण्यासाठीच्या या मुदतवाढीबाबतची माहिती या सर्व महाविद्यालयं आणि संस्थांनी आपल्या संकेतस्थळांवर जाहीर करावी, तसंच विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे कळवावी, असं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं कळवलं आहे.

****

येत्या आठवड्यात सुरु होणाऱ्या रमझानच्या पवित्र महिन्यात टाळेबंदी, संचारबंदी आणि सामाजिक अंतराच्या नियमांच काटेकोर आणि प्रामाणिकपणे पालन करण्याचे निर्देश केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे अध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिले आहेत. नक्वी यांनी काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ३० हून अधिक राज्य वक्फ मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

दरम्यान, टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम विचारवंतांनी आणि मशिदींमधल्या इमामांनी रमजान महिन्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रमजान काळात मशिदींमध्ये न जाता नमाज अदा, कुराण पठण आणि इफ्तार हे घरातच करावं, इफ्तार मेजवानीचं आयोजन करू नये, गरिबांना अन्न, तसंच पैशाची मदत करावी, सरकारच्या टाळेबंदीच्या सूचनांचं पालन करूनच रमजानच्या काळात खरेदी करावी, आदी सूचनांचा यात समावेश आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

राज्यात काल २८६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या तीन हजार २०२ झाली आहे. काल या आजारानं सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. एकूण मृतांचा आकडा १९४ झाला आहे. राज्यात आतापर्यंत ३०० जण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत.

****

औरंगाबाद शहरात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांची संख्या २८ झाली आहे. यामध्ये शहरातल्या बायजीपुरा भागातल्या १७ वर्षीय कोरोना बाधित रूग्णाची गर्भवती आई आणि एका नातलगाचा अहवाल सकारात्मक आला आहे. बिस्मिल्ला कॉलनीतल्या एका ६५ वर्षीय महिलेचा अहवालही सकारात्मक आला आहे.

****

परभणी शहरात कोरोना विषाणू बाधितचा पहिला रुग्ण आढळला आहे. एम आय डी सी भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणाचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. पुणे इथल्या भोसरी इथून हा युवक दुचाकीवरून परभणी शहरात आला होता. काही दिवसांपूर्वी त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या युवकाच्या कुटुंबातल्या सर्व पाच सदस्यांची तपासणी करण्यात आली असून, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. हा युवक राहत असलेल्या परभणी शहरातला एमआयडीसी परिसर सील करण्यात आला आहे. आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या पथकानं कालपासून या भागात सर्वेक्षण सुरु केलं असून, औषध फवारणी आणि स्वच्छतेचं कामही करण्यात येत आहे.

****

जालन्यातल्या एकमेव कोरोना बाधित असलेल्या ६५ वर्षीय महिलेवर जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात गेल्या ११ दिवसांपासून उपचार सुरु असून त्यांची  प्रकृती गंभीर आहे. या महिलेचा काल प्राप्त झालेला दुसरा कोरोना चाचणी अहवालही सकारात्मक आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल आणखी सात जणांचे अहवाल कोरोना विषाणू सकारात्मक आले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ५५ झाली आहे. यापैकी मालेगाव इथले ४७ रुग्ण आहेत. 

****

पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या एकोणसत्तर झाली आहे. काल जिल्ह्यात चौदा नव्या रूग्णांची नोंद झाली. एकूण रूग्णांपैकी पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकूण बारा रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नियमांचं पालन न केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये, मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास ५०० रुपये, तसंच सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना दोनशे रुपये तर विक्रेत्यांना दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले.

****

लातूर जिल्ह्यात कोरोना विरोधी दल- अँटी कोरोना फोर्सची निर्मिती केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे. टाळेबंदीच्या काळात प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन व्हावं, यासाठी पोलीस विभाग प्रभावी अंमलबजावणी करत आहे. पोलीस तसंच सैन्य भरतीची तयारी करणारे तरूण, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी तसंच माजी सैनिक यांना एकत्रित करून या दलाची स्थापना करावी असं जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, लातूर इथं मास्क न लावता फिरल्याबद्दल काल दंडात्मक कारवाई करण्यात आली, या नागरिकांकडून सुमारे साडे सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या ऊमरदरी गावात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे मोफत अन्नधान्य वाटप योजना राबवण्यात येत असल्याचं सरपंच मोहनाबाई कोनापूरे यांनी सांगितलं. गावात प्राधान्य कुटुंब योजनेत अकराशे एकोणावीस लाभार्थी तर अंत्योदय योजनेचे एकशे छपन्न लाभार्थी आहेत.

****

हिंगोली नगरपरिषशहरातल्या सर्व खाजगी इस्पितळांचं निर्जंतुकीकरण करत आहे. ज्या इस्पितळांचं निर्जंतुकीकरण राहिलं असेल, त्यांनी तात्काळ नगर परिषदेकडे संपर्क करण्याचं आवाहन हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केलं आहे.

****

परभणी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेला एक रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आजपासून १९ एप्रिल पर्यंत परभणी शहर आणि परिसरातल्या तीन किलोमीटर हद्दीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना सवलत दिली आहे. मात्र राष्ट्रीयकृत, सहकारी बँकांसह एटीएमही बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.

****

औरंगाबाद शहरातही आजपासून येत्या रविवार १९ तारखेपर्यंत संध्याकाळी पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत औषधी दुकानं वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. यापूर्वी संध्याकाळी सात पासून सगळी दुकानं बंद करण्यात येत होती, मात्र दिवसा तसंच रात्री विनाकारण फिरणाऱ्याविरूद्ध आणखी कडक कारवाई म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मात्र यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याचं पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासकीय आणि शैक्षणिक कामकाज तीन मे पर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे. टाळेबंदीचा कालावधी वाढल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे.

****

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणं तसंच कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नांदेड जिल्ह्याच्या बिलोलीचे माजी आमदार गंगाधर पटने यांनी स्वत:चं एक महिन्याचं पूर्ण निवृत्तीवेतन तसंच ते कार्यरत असलेल्या विविध संस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीस एकूण दोन लाख १७ हजार रुपयांची मदत केली आहे. मदतीचा धनादेश पटने यांनी काल जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्याकडे सुपूर्द केला.

****

परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाप्रसाद मुंदडा यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदुळाचं वाटप करण्यात आलं. शहरासह तालुक्यातल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन मुंदडा यांनी केलं आहे. जिंतूर इथंही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदुळ वाटप करण्यात येत असून, नागरिकांनी काल मोठी गर्दी केली होती. सामाजिक अंतर राखण्याचा नियमही पाळला नसल्याचं दिसून आलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं परिवर्तन विकास मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सईद खान यांच्यावतीनं ग्रामीण भागातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या पाच हजार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुचं वाटप काल करण्यात आलं.

****

बीड शहर आणि परिसरात गरजू व्यक्तींसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं मदत म्हणून पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, दोन किलो दाळ आणि एक किलो साखर देण्यात येत आहे. 

****

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी काल चेक नाक्यावरच्या पोलिसांना ताप तपासणी यंत्र वितरीत केलं. अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश देण्याअगोदर त्यांची या यंत्राद्वारे तपासणी करणे आवश्यक आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण नांदेड जिल्ह्यात प्रवेश करु नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्याच्या आणि राज्य सीमा बंद केल्या आहेत.

****

कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. रुग्ण बरे होऊन घरी जातांना टाळ्यांच्या गजरात आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणेतले अधिकारी निरोप देत असून, या रुग्णांच्या गृहनिर्माण संस्थांमधले सदस्य सुद्धा गॅलरीत उभे राहून टाळ्यांच्या गजरातचं त्यांचं स्वागत करत आहेत. अशा कृतीमुळे समाजातही सकारात्मक संदेश दिला जात असून, त्यामुळे उपचार करणारे आरोग्य सेवेतले कर्मचारी आणि कोरोना विषाणू बाधित रुग्ण, त्यांचे कुटुंबिय यांना मानसिक आधार आणि दिलासा मिळत असल्याचं, टोपे यांनी म्हटलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथला आडत बाजार वाढत्या गर्दीमुळे एका दिवसातच बंद करावा लागला. शेतकऱ्याच्या मालाची विक्री व्हावी या उद्देशानं उदगीर बाजार समिती बुधवारपासून सुरु करण्यात आली आहे. एका दिवशी एकच वाण, एकच धान्य बाजारात विक्रीला आणावं, असं समितीच्या संचालक मंडळानं सांगितलं होतं. मात्र काल शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे आणि विविध धान्यं आणल्यामुळे बाजार बंद करावा लागला. पुढील काळात तालुक्यातल्या महसूल मंडळ निहाय धान्य खरेदी - विक्री  करण्याचं नियोजन करत असून, बाजार सुरु करण्याची तारीख समिती घोषित करेल, असं सभापती मुन्ना पाटील यांनी सांगितलं.

****

नांदेड शहरासाठी विष्णुपूरी जलाशयातलं ३६ पूर्णांक ५० दशलक्ष घनमीटर पिण्याचं पाणी आरक्षित करण्यात आलं आहे. हे पाणी पुढील काळात उपलब्ध करण्यासाठी कालपासून ते ३० एप्रिल पर्यंत जलाशयाच्या दोन्ही तिरावरच्या एक्सप्रेस फीडरचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.

****

मागील दोन दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अवकाळी, वादळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या फळबागांचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भूम परंडा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

****

लातूर इथं यावर्षी सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या स्पर्धेची १५ हजार रुपयांची रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आली आहे. सध्याच्या टाळेबंदीमुळे प्रतिष्ठाणनं पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रद्द केला आहे. 

****

परभणी शहरातलं तापमान काल ४१ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागानं ही माहिती दिली.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सोनारी इथली काळभैरवनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातल्या लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या काळभैरवनाथाची यात्रा १८ ते २० एप्रिल दरम्यान होणार होती.

****

हिंगोली जिल्ह्यात शासन निर्देशानुसार शिधा पत्रिकाधारकांना धान्य वितरण न केल्यामुळे चार स्वस्त धान्य दुकानदार आणि एक किराणा दुकानदारांवर पुरवठा विभागानं कारवाई केली आहे. यामध्ये आखाडा बाळापूर इथले दोन, तर पांगरी, कळमनुरी आणि रेडगाव इथल्या प्रत्येकी एका दुकानदाराचा समावेश आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातही पाच स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटपात काळाबाजार करणं तसंच लाभार्थ्यांना चढ्या भावाने धान्य दिल्याप्रकरणी त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ज्या पात्र नागरिकांना स्वस्त धान्य  दुकानातून धान्य मिळत नसेल त्यांनी तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलं आहे.

//*************//

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...