Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø राज्याच्या अर्थव्यवस्थेला
टप्प्याटप्प्यामध्ये चालना देणार-
उपमुख्यमंत्री अजित पवार
Ø कोवीड १९ नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा; वृत्तपत्रांचं घरोघरी होणाऱ्या वितरणावर
निर्बंध
Ø राज्यात आणखी ३२८ कोरोना विषाणू बाधित
रुग्ण; ११ जणांचा मृत्यू
Ø औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू बाधित महिलेची प्रसूती तर एका ६५
वर्षाच्या महिलेचा मृत्यू
Ø रमजान महिन्यात मुस्लिम बांधवानी मशीद किंवा इतर
सार्वजनिक ठिकाणी एकत्रित न येता घरातच
नियमित नमाज, तरावीह पठण आणि इफ्तार कार्यक्रम करण्याचं राज्य
सरकारचं आवाहन
आणि
Ø औरंगाबादचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या वाहनात विदेशी मद्यासह रोख रक्कम सापडल्यावरून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे
लागू टाळेबंदीच्या या काळामधे राज्याच्या अर्थव्यवस्थेला टप्प्याटप्प्यामध्ये चालना
देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोरोना विषाणूविरुद्धच्या
लढाईच्या नियमांचं पालन करत उद्यापासून राज्यातले काही
औद्योगिक तसंच व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी केली होती. त्या पार्श्र्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी काल ही माहिती दिली. तीन
मे पर्यंत असलेल्या या टाळेबंदी दरम्यान रेल्वे, लोकल
सेवा बंद राहतील तसंच सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक सण साजरे करता येणार नाहीत, असं
पवार यांनी या वेळी सांगितलं. टाळेबंदी
कठोरपणे पाळली जाईल पण त्याच वेळी कोरोना विषाणू संबंधी नियमांचं पालन करत अत्यावश्यक
सेवा विनाखंड सुरू रहाव्यात, कृषी संबंधी उपक्रम वेळेवर सुरू
व्हावेत तसंच अर्थव्यवस्थेला गती मिळावी हे पाहिलं जाईल, असं
उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सरकार या काळात तूर, कापूस, हरभरा खरेदी करेल तसंच दूध, मत्स्योत्पादनं आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी- मनरेगाची कामं सुरू करायलाही परवानगी देण्यात आली असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. कृषी आणि संबंधित उपक्रमांवर कोणतेही निर्बंध टाकण्यात आले नसून योग्य खबरदारी
घेण्याच्या अटीवर त्यांना परवानगी देण्यात आली असल्याची माहितीही पवार यांनी यावेळी दिली.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाविरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर
मदत जमा होत आहे. अनेक हातांनी केलेल्या मदतीमुळे
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या स्वतंत्र खात्यात आतापर्यंत
२५१ कोटी रुपये जमा झाले आहेत. सैयदना बुरहानी
ट्रस्टच्या वतीनं मुख्यमंत्री
सहाय्यता निधीत दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून एडल वाइज कंपनीतर्फे पन्नास
लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. दाऊदी बोहरा
समाजाच्यावतीनं देशभरात विविध स्वरूपात मदत करण्यात येत असून आतापर्यंत आठ लाख ३३ हजार
२४३ लोकांना त्याचा लाभ झाला असल्याचं ट्रस्टच्यावतीनं कळवण्यात आलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या मुरुम इथल्या विठ्ठलसाई साखर
कारखानाच्या वतीनं अकरा लाख रुपये तसंच जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं दीड लाख रुपये
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आज देण्यात आले. विठ्ठलसाई कारखान्याचे
अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी
राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे हे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
****
टाळेबंदीच्या काळात राज्यातल्या
बांधकाम कामगारांना काम मिळत नसल्यानं त्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं
घेतला आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संबंधीची
घोषणा केली. ते म्हणाले...
या बांधकाम कामगारांना
की जे मंडळाकडे नोंदीत आहेत आणि सक्रीय आहेत, अशा सर्व कामगारांना प्रत्येकी दोन हजार
रूपये एवढे अर्थसहाय्य थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात डीबीटी पध्दतीने जमा करण्याच्या
संदर्भाने निर्णय घेतला आहे. याचा फायदा जवळ जवळ १२ लाख नोंदीत आणि सक्रीय कामगारांना
होईल. महाराष्ट्र इमारत बांधकाम आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाला आदेश देण्यात आलेले
आहेत.
****
राज्यात कोवीड १९ नियंत्रणासाठी
करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा
करण्यात आली आहे. नव्या सुधारणेनुसार, २०
एप्रिल पासून मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे. मात्र वृत्तपत्रांचं घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
यासंबंधीचं परिपत्रक काल जारी करण्यात आलं. तसंच
मंत्रालयीन सर्व विभागांच्या आयुक्तालयातले आयुक्त, संचालनालयातले
संचालक यांनी १० टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालयात उपस्थित रहावं, असे निर्देश देण्यात आले आहेत.
****
राज्यात काल आणखी ३२८
कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आल्यानं एकूण रुग्णांची संख्या तीन हजार ६४८ झाली
आहे. काल दिवसभरात ३४ रुग्णांना
घरी सोडण्यात आलं असून, आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे
झाले आहेत. राज्यात काल ११ करोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, या आजारामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११ झाली आहे.
****
औरंगाबाद इथल्या जिल्हा सामान्य
रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना बाधित गर्भवती महिलेची शर्थीचे प्रयत्न करत प्रसुती
केली आहे. देशातील अशाप्रकारे करण्यात आलेली ही
दुसरी प्रसुती आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी या संबंधी अधिक माहिती दिली, ते
म्हणाले..
कोविड पॉझिटिव्ह
डिक्लेअर झाल्यानंतर नऊ महिने पण पूर्ण होत आले होते तिचे गर्भावती अवस्थेचे आणि तिला
आम्ही नॉमर्ल करण्याचा जो आमचा प्रयत्न होता तो अयशस्वी ठरला. म्हणून मग सिझर अँड सेक्शन
करण्याचं डिसीजन घेतलं. आणि आज तिचं सिझर अँड सेक्शन करून मुलीला जन्म दिला. आणि ती
जी मुलगी आहे तिचं साधारण तीन किलो १२० ग्रॅम वजन आहे. बाळ आणि बाळांतीण दोघही सुखरूप
आहेत. त्यांना स्पाईनल अनेस्थेशिया मध्ये आम्ही सर्जरी केली. आणि सगळं व्यवस्थित आहे.
बेबीचेपण सॅंपल कलेक्ट केले. जेणे करून आम्ही तपासणी करून घेणार की तिला कोरोनाची लागण
आहे किंवा नाही.
ही महिला चार दिवसांपुर्वी मुंबईहून
रुग्णवाहिकेतून प्रसुतीसाठी औरंगाबाद शहरातल्या बायजीपुरा भागात आली होती. काही दिवसांपूर्वीच तिच्या १७ वर्षीय मुलाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर
केलेल्या तपासणीत या महिलेलाही कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
****
दरम्यान, औरंगाबाद शहरातल्या
सात वर्षीय मुलीनं कोरोना विषाणूवर मात केली आहे. काल या मुलीला रुग्णालयातून सुटी
देण्यात आली. या आजरातून बर्या झालेल्या एन फोर इथल्या महिलेची ही नात आहे.
औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात
गेल्या १४ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या नऊ कोरोना विषाणू बाधितांपैकी आठ जणांचे
पहिले अहवालही काल नकारात्मक आले. या आठ जणांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
****
औरंगाबाद इथं काल सकाळी एका
कोरोना विषाणू बाधित ६५ वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. गेल्या
तेरा तारखेला या महिलेला खासगी रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात
दाखल करण्यात आलं होतं. सोळा एप्रिल रोजी या महिलेला संसर्ग झाल्याचं
स्पष्ट झालं होतं. औरंगाबादमधे
या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे. काल रात्री उशिरा शहरातील एका पंधरा वर्षीय मुलाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं
स्पष्ट झाल्यानंतर औरंगाबादमधे विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या २९ झाली आहे.
यातील दोन रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पहिल्या
कोरोना विषाणूग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नऊ संशयित रुग्णांचे तसंच संपर्कात
आलेल्या सुमारे ३४ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. सहा
जणांचे अहवाल अद्याप बाकी आहेत.
दरम्यान, कोराना विषाणू बाधित रुग्ण हा जिल्हाबंदी असतानाही पुण्याहून दुचाकीवरुन परभणीला आला होता, त्यामुळे पोलिसांनी हा युवक आणि त्याला आश्रय देणाऱ्या नातेवाईकांविरोधात गुन्हा
दाखल केला आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद इथून येणाऱ्या इसमाची माहिती नातेवाईक किंवा इतर लोकांनी लपवून ठेवली
तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या
तिन्ही कोरोनो विषाणू बाधित
रुग्णांचा चौदा दिवसांच्या
उपचारानंतरच्या पहिल्या चाचणीचा अहवाल काल नकारात्मक आला. धानुरी, बलसुर, उमरगा इथल्या या रुग्णांनी उपचारांना चांगला प्रतिसाद
दिला असून त्यांचा विलगीकरण कालावधी संपला आहे. या तिघांची आणखी एक चाचणी होणार असून याचा अहवाल नकारात्मक
आल्यास ते रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाल्याचं स्पष्ट होईल, असं उस्मानाबादचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित पुरी यांनी म्हटलं आहे.
****
जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी इथं खासगी कंपनीत काम करणाऱ्या
एका मजुराच्या पत्नीचा
कोरोना विषाणू चाचणी अहवाल गुजरात इथं सकारात्मक आला होता. मागील आठवड्यातच सदर
महिला जालन्याहून गुजरातला गेली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून
प्रशासनानं या महिलेच्या गुंडेवाडी इथं वास्तव्यास असलेल्या पतीसह १६ जणांची तपासणी
केली होती. या १६ जणांसह राज्य राखीव दलाचे १० जवान आणि इतर सात
अशा एकूण ३३ लोकांचे
अहवाल काल नकरात्मक आले.
****
लातूर इथं आढळलेल्या कोरोना
विषाणूबाधित आठ प्रवासी उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. या सर्व प्रवाशांचे कोरोना संसर्ग चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत.
लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही माहिती दिली. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणेचं
महापौरांनी अभिनंदन केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू
बधितांची संख्या ९१ वर पोहोचली आहे. यात ७७ रुग्ण
मालेगाव मधले असून, याच शहरातल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरात १० रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागात चार
रुग्ण आहेत.
****
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं
तबलिगी जमातीच्या मरकजसाठी आलेल्या आणि कायद्याचं उल्लंघन करुन अहमदनगरमध्ये रहात असणाऱ्या
२६ परदेशी नागरिकांना २४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत तर तीन भारतीय नागरिकांना न्यायालयीन
कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वांना जिल्हा सामान्य
रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर काल पोलिसांनी या नागरिकांना अटक केली.
****
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव आणि जनजागृतीसाठी जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारातून जालना
जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केलं जात आहे. आतापर्यंत मतदार संघातली २९८ गावं, वाड्यांवर सहा हजार
सॅनिटायझरच्या बाटल्या, १५ हजार मास्क, तीन हजार माहिती पुस्तिका आणि पाच हजार माहिती पत्रकांचं वाटप करण्यात आलं.
****
राज्यातल्या सहा शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-19 तपासणीसाठी केंद्रांची मान्यता मिळाली आहे. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयासह, कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज,
अंबाजोगाईतलं स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय
महाविद्यालय, तसंच बारामती, गोंदिया
आणि जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा या तपासणी केंद्रांमध्ये समावेश
आहे. या तपासणी केंद्रांची निर्मिती लवकरात लवकर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले
आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
जायकवाडी धरणातून उन्हाळी हंगामासाठी
पाणी पाळी तीन करता पैठण डाव्या कालव्यात २२ ते २३ एप्रिल दरम्यान पाणी सोडण्यात येणार
असल्याची माहिती परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील
यांनी दिली. परभणी जिल्ह्यात भूईमुग पिकासाठी पाण्याची गरज खूप
असल्याचं पाटील यांनी जायकवाडी धरणाचे अधिक्षक अभियंता आणि प्रशासक शि.ना. भोलभट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाणी
सोडणार असल्याचं सांगितलं. तिसऱ्या पाणी पाळीमुळे जवळपास सोळा
हजार हेक्टरमध्ये सिंचन होईल, या पाण्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या
डाव्या कालव्यावरच्या लाभधारकांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत
होईल.
****
पुढच्या आठवड्यात सुरु
होणाऱ्या रमजान महिन्यात
मुस्लिम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्रित न येता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण आणि इफ्तार हे धार्मिक कार्यक्रम करावेत, असं आवाहन राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागानं केलं आहे. देशभर
लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक
कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घातले आहेत.
त्यानुषंगानं कोणत्याही धार्मिक कारणासाठी
एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयानं सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातल्या सर्व मुस्लिम बांधवांना राज्य सरकारनं हे आवाहन केलं आहे.
****
कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या
पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या लिंबगाव परिसरामधील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात
सापडले आहेत. मोसंबी बाजारपेठेत नेण्यासाठी वाहन उपलब्ध नाहीत,
खरेदीसाठी व्यापारी पुढे येत नसल्यामुळे मोसंबी बागेतच खराब होत आहेत.
राज्य शासनानं अशा मोसंबी बागांची पाहणी करून पंचनामे करावेत,
फळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अनुदान द्यावं अशी मागणी या
भागाचे नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य साहेबराव धनगे यांनी केली आहे.
****
लातूर इथं गरज नसताना घराबाहेर पडणाऱ्या
लोकांच्या फिरण्यावर आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे दोन दिवसांपासून मास्क न लावणाऱ्यांविरोधात
कारवाई सुरू आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी १४२ जणांविरुध्द कारवाई
करुन २८ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
तेलंगणा सीमा ओलांडून लोकांना नांदेड जिल्ह्यात येण्यापासून थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनानं
जिल्ह्यात पंधरा ठिकाणी
नाकेबंदी केली आहे. या भागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण आढळला नसल्यानं जिल्ह्याची
दिलासादायक परिस्थिती आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६२ नागरिकांना
घरात विलगीकरणात ठेवलं आहे. तर ५२ नागरिक रुग्णालयात विलगीकरण
कक्षात दाखल आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर
इथं गोरोबा काका समाधी उत्सव यंदा टाळेबंदीमुळे प्रथमच रद्द करण्यात आला आहे. फडकरी, दिंडीकरी, वारकऱ्यांनी सध्या असतील तिथूनच गोरोबा काकांची सेवा करून वारी पूर्ण करावी
असं आवाहन मुख्य पुजाऱ्यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढानागनाथ
मधल्या श्री नागनाथ संस्थानच्या वतीनं या भागातल्या गरजवंत असणाऱ्या तीन हजार कुटुंबांना
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी
देखील २१ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. सामजिक अंतराचे
नियम पाळून हे बैठक घेण्यात आली.
****
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर
जालना शहरातल्या नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नये यासाठी शिवसेनेनं
पुढाकार घेतला आहे. शिवसेनेच्या वतीनं शहरातल्या प्रत्येक वार्डात
गरजुंना मोफत भाजीपाला वाटप करण्यात येत आहे.
****
बुलडाणा इथं रुग्णांना योग्य
सुविधा मिळत नसल्याची चित्रफित तयार करून समाज माध्यमांवर प्रसारीत केल्याप्रकरणी बुलडाणा
जिल्हयातल्या मलकापूरचे नगराध्यक्ष विधिज्ञ हरीश रावळ यांच्या विरोधात बुलडाणा शहर
पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेडच्या हुजुर साहिब रेल्वे
स्थानकावर दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक उपिंदरसिंग यांनी काल पन्नास सफाई कर्मचारी, रेल्वे हमाल यांना अन्नधान्याच्या पाकीटांचं वाटप केलं. नांदेड विभागातले
अधिकारी आणि कर्मचार्यांनी जमवलेल्या निधीतून हे अन्नधान्य वाटप करण्यात आलं.
****
पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून
धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या १५६ जणांविरोधात राज्य शासनाने कारवाई केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. देशमुख यांनी काल अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंध आणि जिल्ह्यातील
कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी
बोलताना ते म्हणाले...
अनेक देशांना याच्यात आलेल्या
१५६ लोकांना आजच्या तारखेपर्यंत आम्ही १४बीच्या अंतर्गत नागरिचुनाव, सोयीसुविधा यांच्या
अंतर्गत त्यांना अटक केलेली आहे. आणि आजुन ज्या-ज्या ठिकाणी अश्या केसेस निघेल त्यांच्यासुद्धा
त्या पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल.
दरम्यान, गृहमंत्री एक दिवसाच्या औरंगाबाद दौऱ्यावर असून,
काल ते शहरात दाखल झाले. काल त्यांनी सुभेदारी
विश्रामगृहात पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक
रविंद्र सिंघल, ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील
यांच्याकडून कोरना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या जिल्ह्यातल्या परिस्थितीचा
आढावा घेतला. आज गृहमंत्री विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना
विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेबाबत
आढावा बैठक घेणार आहेत, दुपारनंतर ते बुलडाण्याकडे रवाना होतील.
****
परभणी जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचं
उल्लघंन करणाऱ्या १०२ आरोपींविरुद्ध २३ गुन्हे दाखल झाले. अद्यापपर्यंत जिल्ह्यात २२६ गुन्हे दाखल असून, ६४४ आरोपींवर
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात २६ ठिकाणी बेघर मजुरांसाठी शिबिर सुरु करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात सोनपेठ, पाथरी, गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीत मास्क न वापरता फिरणाऱ्या २५ जणांविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला.
लातूर इथं मास्क न वापरता फिरणाऱ्यांना
दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. महापालिकेनं
शुक्रवारी संध्याकाळपर्यंत १४२ जणांवर कारवाई करत २८ हजार ४०० रुपये दंड वसूल केला
आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या
पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे कर्मचारी गावपातळीवर कर्तव्य बजावत असताना, त्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाणीचे प्रकार घडत असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी संघटनेचे
जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गादगे यांनी केलं आहे. जिल्ह्यात दररोज
आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत, त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये
भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर गादगे यांनी
हे आवाहन केलं.
****
शासनाच्या विविध अनुदानांची
रक्कम उचलण्यासाठी परभणी जिल्ह्यात बँकांमध्ये नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी
जिल्ह्यातल्या बँकेबरोबरच पोस्ट ऑफिस आणि सब पोस्ट ऑफिसमधून विविध योजनांची रक्कम दिली
जाणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे आदेश जारी
केले. जिल्ह्यातल्या सर्व बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण,
जन- धन योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांची गाव निहाय
यादी जिल्हा अग्रणी बँकेकडे तात्काळ सादर करावी आणि जिल्हा अग्रणी बँकेने ही यादी एकत्र
करून टपाल कार्यालयाकडे जमा करावी, असं या आदेशात म्हटलं आहे.
****
औरंगाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अमोल गीते यांच्या वाहनात विदेशी मद्यासह रोख
रक्कम सापडली असून, त्यांच्या विरोधात दारूबंदी कायदा,
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा नोंदण्यात
आला आहे. सध्या जिल्हाबंदी असूनही डॉ. गीते
लोणारकडे निघाले होते. जालना जिल्ह्यात बदनापूर इथं पोलिसांनी
डॉ गीते यांना अटक केली, महागड्या विदेशी मद्याच्या बाटल्या,पावणेसात लाख रुपये आणि चारचाकी वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
मराठवाड्यातल्या काही भागात काल पावसानं हजेरी लावली.
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या
औराद शहाजनी परिसरात काल जोरदार गारांचा पाऊस झाला. या पावसानं
सावरी औराद दरम्यानचा ओढा खळाळून वाहत आहे. इथल्या हवामान केंद्रात
५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यातल्या किल्लारी इथंही
गारांचा पाऊसम झाला. उमरगा तालुक्यातल्या गुगळगाव इथं वीज कोसळून
एक गाय दगावली.
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली
तालुक्यातल्या चिटमोगरा या गावात काल मेघगर्जनेसह मुसळधार गारांचा पाऊस पडला.
उस्मानाबाद शहरात
काल रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातल्या बिजनवाडी
इथंही काल अवकाळी पाऊस झाला, याठिकाणी उन्मळलेल्या झाडाखाली दबून
चार शेळ्या दगावल्या.
या पावसामुळे ठिकठिकाणच्या पिकांचं, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.
****
उस्मानाबाद इथं कालपासून तूर खरेदीसाठी प्रक्रिया सुरु झाली
असून, काल पहिल्या दिवशी १० शेतकऱ्यांची ३९ क्विंटल
तूर खरेदी करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या
सुकळी इथं ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक फवारणी करण्यात
आली. तसंच प्रत्येक कुटूंबाला सॅनिटायझरची एक बाटली
अशा २०० बाटल्या वाटप करण्यात आल्या.
****
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या
सोपोर इथं काल दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात बुलडाणा जिल्ह्यातल्या पातुर्डा इथले
जवान चंद्रकांत भाकरे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आलं. दहशतवाद्यांनी गस्त घालणार्या
जवानांच्या वाहनावरच गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदचे तीन दहशतवादी
ठार झाले.
*****
***
No comments:
Post a Comment