Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 May 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७
मे
२०२० सायंकाळी ६.००
****
Ø राज्यातली टाळेबंदी ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय. राज्य शासनानं काढली
अधिसूचना. केंद्रीय सशस्त्र पोलिस बलाच्या तुकड्याही राज्यात दाखल.
Ø स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर कॉँग्रेसनं
राजकारण करू नये. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं
आवाहन.
Ø गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकून दोन पोलिस शहीद. तीन जवान जखमी.
आणि
Ø औरंगाबाद
आणि लातूर जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू.
****
राज्यातली टाळेबंदीची मुदत ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात
घेत साथ रोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार टाळेबंदीची मुदत ३१ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केले आहेत. या
आदेशामुळे उद्यापासून राज्यात टाळेबंदीचा चौथा टप्पा सुरू होईल.
राज्य सरकारांच्या विनंतीवरून
केंद्रीय सशस्त्र पोलिस बल-सीएपीएफच्या तुकड्या राज्यात दाखल झाल्या आहेत. मुंबई, पुणे,
मालेगाव, अमरावती आणि इतर ठिकाणी त्या तैनात करण्यात आल्या असून, यामुळे राज्यात पोलिस
दलावरचा भार काही प्रमाणात हलका होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सीएपीएफच्या
२० तुकड्या राज्यात पाठवण्यात याव्यात, अशी विनंती राज्य सरकारनं केंद्र सरकारला केली
होती.
****
सरकारनं जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज एक नाटक असल्याचा
आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. पण खरे नाटकी तेच आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनी म्हटलं आहे. रस्त्यावर बसून बोलल्यानं मजुरांचे प्रश्न सुटणार नाहीत.
उलट असं करून राहुल गांधी मजुरांचा वेळ वाया घालवत आहेत, असंही त्या म्हणाल्या. स्वावलंबी
भारत अभियानाअंतर्गत २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनी आज पाचवी आणि शेवटची पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना
त्यांनी काँग्रेसच्या आक्षेपांना प्रत्युतरही दिलं. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर
आपल्याला एकत्र काम करावं लागेल. सोनिया गांधी यांनी आमच्याशी चर्चा करावी आणि या मुद्यावरून
राजकारण करू नये, असंही निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना करण्यात आलेल्या
आर्थिक मदतीबद्दल त्या म्हणाल्या, की या काळात राज्य आणि केंद्र सरकारच्या महसूलात
मोठी घट झाली आहे. अर्थसंकल्पीय तरतूदीप्रमाणे एक एप्रिलपर्यंत ४६ हजार ३८ कोटी रुपयांचा
महसूल राज्य सरकारांना वितरित करण्यात आला आहे. १२ हजार ३९० कोटी रुपयांच्या महसूली
तूटीसाठीची परवानगी राज्य सरकारांना देण्यात आली आहे. ११ हजार ९२ कोटी रुपयांची मदत
राज्य आपत्ती निवारण निधीअंतर्गत एप्रिल महिन्यात राज्य सरकारांकडे वर्ग करण्यात आली
आहे. कर्ज घेण्यासंदर्भातील मुदत ३२ दिवसांवरून ५२ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
राज्यांच्या कर्ज घेण्याच्या मर्यादेत वाढ करून ती जीडीपीच्या ३ टक्क्यांवरून वाढवून
५ टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्य सरकारांना एकूण ४ लाख २३ हजार कोटी
रुपयांच्या कर्जाची परवानगी देण्यात आली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या सुरूच राहणार असल्या,
तरी सर्वच क्षेत्रं खासगी कंपन्या आणि गुंतवणुकीला परवानगी देण्यात येणार असल्याचं
अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. धोरणात्मक क्षेत्र आणि इतर क्षेत्र यांच्या वर्गीकरणासाठी
सरकार विशेष धोरण आखणार असून, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी नवं धोरण आखत त्यांची
पुनर्रचनाही केली जाणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या जीवघेण्या सापळ्यामध्ये फसल्यानंतर
झालेल्या चकमकीत पोलिस उपनिरीक्षक
धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम शहीद झाले. भामरागड तालुक्यातल्या कोठी पोलिस
ठाण्याच्या हद्दीत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात आज सकाळी ही चकमक झाली. यात तीन
जवानही जखमी झाले असून,
एकाची प्रकृती गंभीर आहे.
शहीद जवानांचे मृतदेह दुपारी गडचिरोलीत आणण्यात आले, तर जखमी जवानांना गडचिरोली इथल्या
जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळावर दुपारपर्यंत चकमक सुरुच
होती.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि
रुग्णालय-घाटी इथं उपचार घेत असलेल्या ७४ वर्षीय एका पुरुष रुग्णाचा आज कोरोनाच्या
बाधेमुळे मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबाद इथं कोरोनामुळे मृत्युमुखी
पडलेल्यांची संख्या ३० झाली आहे. या रुग्णाला शुक्रवारी उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आलं होतं. त्यांना मधुमेह, तसंच उच्च रक्तदाबाचा
विकार होता.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार
घेणाऱ्या ६५ वर्षाच्या कोरोनाग्रस्त पुरुष रुग्णाचा आज दुपारी मृत्यू झाला. लातूरमध्ये
कोरोनाच्या संसर्गामुळे गेलेला हा दुसरा बळी आहे. या रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह आणि न्यूमोनिया
हे आजारही होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली.
****
औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या
पाहता, या रुग्णांना तातडीनं
उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयांतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सहकार्य करावं, असं आवाहन विभागीय आयुक्त
सुनील केंद्रेकर यांनी केलं आहे. जिल्हयातल्या वैद्यकीय सल्लागारांचं कृति दल आणि इतर अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज ते बोलत
होते. खाजगी डॉक्टरांनी वारनिहाय शहरातल्या कोविड उपचार केंद्रांना भेट देऊन रुग्णांची
पाहणी करावी आणि योग्य त्या उपचाराबाबत मार्गदर्शन करावं, असं केंद्रेकर यावेळी म्हणाले.
*****
अमरावती जिल्ह्यात कारागृहांमध्ये ही कोरोना विषाणुचा प्रसार होत असल्यानं जिल्हा मध्यवर्ती कारागृहातल्या
११५ कैद्यांना गेल्या ५ दिवसात पॅरोल वर घरी सोडण्यात आलं आहे. सात
वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची
शिक्षा ठोठावली आहे आणि कारागृहात ज्या कैद्यांचे वर्तन चांगले आहे अश्या १५ कैद्यांचा यात समावेश आहे.
****
टाळेबंदीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून सिंधुदुर्ग
जिल्ह्यात अडकलेल्या १ हजार पाचशे पस्तीस मजूर आणि कामगारांना घेऊन दुसरी श्रमिक विशेष रेल्वे काल रात्री कर्नाटकमधल्या
यादगिरीकडे रवाना झाली. जिल्ह्यातल्या सात तालुक्यांतून एसटीच्या ७६ बसेसमधून या प्रवाशांना सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आणण्यात आलं. या वाहतुकीवेळी सामाजिक अंतराचं योग्य ते पालन करत या सर्वांना
त्यांची तिकीटं देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं.
****
कोल्हापूर जिल्ह्यात
आज आणखी चार कोरोनाबाधित रुग्ण
आढळले. आतापर्यंत
जिल्ह्यात कोरोनाचे ४० रुग्ण आढळले आहेत. आज आढळलेले ४ रुग्ण मुंबई आणि सोलापूर इथून कोल्हापुरात आले होते.
****
सोलापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण १४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वैद्यकीय अहवालावरुन स्पष्ट झालं आहे.
यात सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. सोलापूरमध्ये तीनशे अठ्ठ्याहत्तर कोरोनाबाधित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत
२४ जणांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असून, १५० जण कोरोनामुक्त होउन घरी परतले आहेत.
****
पालघर जिल्ह्यात आज ७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळून आले. त्यामुळे आता जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या तीनशे बावन्न
वर पोहचली आहे. त्यापैकी १६ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात आज आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण
आढळला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची संख्या आता ३० झाली आहे. जिल्ह्यात
२३ जण कोरोनामुक्त झाले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रूग्णालयात पाच कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत.
****
औरंगाबादच्या सायबर
पोलिसांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेल्या १३ जणांचे दोन लाख ४१ हजार ९०० रूपये परत
मिळवून दिले आहेत. पोलिस आयुक्त कार्यालयानं जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे
ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणू
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत सायबर चोरटे विविध संकेतस्थळावर
आकर्षक सूट, बक्षिसे तसंच बँकेमधील अधिकारी असल्याचं सांगून सर्व सामान्य जनतेची फसवणूक
करत आहेत. अशा भुलथापांना बळी न पडण्याचं आवाहन पोलिस आयुक्त कार्यालयातील सायबर शाखेच्या
वतीनं करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर शहर परिसरात शेतातून सुमारे
१ लाख ११ हजार रुपये किमतीची बनावट दारु पोलिसांनी आज जप्त केली. एकाच शेतात वेगवेगळ्या ९ ठिकाणी बनावट दारू
लपवून ठेवण्यात
आली होती. भोकर पोलिसांनी या संदर्भात १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, तर
एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment