Wednesday, 20 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.05.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 May 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० मे २०२० सायंकाळी ६.००
****  

Ø  स्थलांतरित कामगारांसाठी धान्य वाटपाच्या आत्मनिर्भर भारत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
Ø  देशांतर्गत विमानसेवा येत्या सोमवारपासून सुरू होणार
Ø  कोरोना विषाणू प्रतिबंधांचा जीवनशैलीत अंतर्भाव करावा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आवाहन
Ø  मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक पातळीपर्यंत राज्यात समन्वयाचा अभाव - प्रवीण दरेकर यांची टीका
आणि
Ø औरंगाबाद इथं आज दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या ३८वर
****

 स्थलांतरित कामगारांसाठी धान्य वाटपाच्या आत्मनिर्भर भारत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. या सर्व कामगारांना मे आणि जून महिन्यासाठी प्रत्येकी पाच किलो धान्य मोफत दिलं जाणार आहे. या धान्याची वाहतुक, साठवण तसंच वितरकाचा खर्चही केंद्र सरकारकडून वहन केला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात नियमित मासिक उत्पन्नाची हमी देणाऱ्या तसंच सामाजिक सुरक्षा देणाऱ्या प्रधानमंत्री वयवंदना योजनेलाही तीन वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही योजना ३१ मार्च २०२३ पर्यंत कार्यान्वीत असेल. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जमा रकमेवर चालू आर्थिक वर्षात सात पूर्णांक चाळीस शतांश टक्के व्याज मिळेल, व्याजाचा दर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी निर्धारित करण्याचे अधिकार अर्थमंत्र्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय मत्स्य संपदा योजना, अन्न प्रक्रिया क्षेत्रात सुक्ष्म उद्योग उभारणी योजना, यासह अनेक निर्णयांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
****

 देशांतर्गत विमानसेवा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतुक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली. सर्व विमानतळं तसंच हवाई वाहतुक कंपन्यांनी यासाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रवासी वाहतुकीसंदर्भातली कार्यप्रणाली लवकरच जारी करणार असल्यासं पुरी यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
****

 कोरोना विषाणू बाधित रूग्णांना उपचारानंतर रूग्णालयातून सुट्टी देण्याच्या धोरणात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं बदल केला आहे. या सुधारित धोरणाची कोविड-19 च्या त्रिस्तरीय व्यवस्थापन आणि उपचार व्यवस्थेशी सांगड घालण्यात आली असून रुग्णाची अवस्था किती गंभीर आहे, यानुसार त्याचं वर्गीकरण केलं आहे. यानुसार कोरोना विषाणू संसर्गाची सौम्य, आणि अति सौम्य लक्षणं दिसण्यापूर्वीच्या अवस्थेत रुग्णांना कोविड केअर सुविधेत ठेवलं जाणार आहे. लक्षणांची सुरवात झाल्यापासून १० दिवसांत रुग्णाला सलग तीन दिवस ताप आला नाही, तर त्याला घरी सोडताना चाचणी केली जाणार नाही. या रुग्णानं घरी परतल्यावर विलगीकरणात राहावं, असं यात म्हटलं आहे.

 एखाद्या व्यक्तीला सलग ३ दिवस ताप अथवा अन्य काही लक्षणं दिसली नाहीत तर त्याच्या शरीरातला विषाणू निष्क्रीय झालेला असतो. असा या निष्कर्ष अभ्यासातून काढलेला असून, त्याच्या आधारावर, रुग्णाला उपचारानंतर घरी पाठवण्याच्या धोरणात बदल केल्याचं ICMR मधले साथ आणि संसर्गजन्य आजारविभागाचे प्रमुख डॉ रमण गंगाखेडकर यांनी  सांगितलं.
****

 कोरोना विषाणूचं पूर्णत: निर्मूलन लवकर होणं शक्य नसून, आता त्यासाठीच्या प्रतिबंधांचा जीवनशैलीत अंतर्भाव करावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे, त्यांनी आज आपल्या ट्वीट संदेशात ही बाब नमूद केली आहे. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावं, राज्यशासनाच्या माहिती प्रसारण विभागानं यासंदर्भात जनजागृती करावी, असं पवार यांनी म्हटलं आहे. राज्यांतर्गत रस्ते वाहतुक टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यासाठी तसंच रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची गरजही पवार यांनी नमूद केली आहे.
****

 वंदे भारत अभियानाअंतर्गत आतापर्यंत मुंबईत एक हजार ९७२ भारतीय मायदेशी परत आले आहेत. यातील ८२२ मुंबईतले आणि एक हजार २५ राज्यातल्या अन्य ठिकाणाचे तर १२५ नागरिक दुसऱ्या राज्यातले आहेत. दहा देशांमधून १३ विमानांमधून या सर्वांना मुंबईत आणण्यात आलं आहे. येत्या काही दिवसात विविध देशातून आणखी २७ विमान उड्डाणांच्या माध्यमातून मायदेशी परत आणण्यात येणार आहे.
****

 मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक पातळीपर्यंत राज्यात समन्वयाचा पूर्णपणे अभाव आहे, अशी टीका राज्य विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या स्थितीचा आढावा दरेकर यांनी आज जिल्हाधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कोकणात मोठ्या प्रमाणावर मुंबईतले चाकरमानी येत असतानासुद्धा कोरोनाच्या तपासणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग तपासणीची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने अद्यापही अर्ज पाठविलेला नाही, यावरही दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 औरंगाबाद इथं आज दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे औरंगाबाद इथं या आजारामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाला गेल्या १५ वर्षांपासून रक्तदाबाचा त्रास होता तर दुसऱ्या रुग्णाला सहा वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता, अशी माहिती माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

 दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या एक हजार ११७ झाली आहे.
****

 उस्मानाबाद आणि तुळजापूर इथं अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत. दोन्ही शहरात काल प्रत्येकी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानं, हा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी साडेदहा वाजता हे आदेश दिल्यानं, उस्मानाबाद शहरात आज सकाळी उघडलेली दुकानं तत्काळ बंद करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं.

 खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. प्रतिबंधित क्षेत्रातून जाण्याऱ्या तसंच येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी, प्रशासनाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, नागरिकांनी सूचनांचे पालन करावं, असे आवाहन खासदारांनी केलं.

 दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व १३ रुग्णांची प्रकृती स्थिर असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी केलं आहे.
****

 टाळेबंदीच्या  कालावधीत एकही व्यक्ती उपाशीपोटी राहू नये म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही किंवा जे स्थलांतरीत मजूर आहेत त्यांनाही मे आणि जून महिन्यासाठी मोफत धान्य देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या सर्वांना प्रति व्यक्ति ५ किलो तांदुळ मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मे आणि जून महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून हे धान्य वाटप होणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली
****

 परभणी जिल्ह्यात मानवत इथल्या गजानन महाराज मंदीर संस्थानच्या वतीनं कामगारांना दोन वेळ जेवणाचे डब्बे घरपोच देण्याचं कार्य सुरु आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….

 लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मानवत शहरातील मजूराचा रोजगार बंद झाला. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला. मानवत येथे गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीने दर गुरुवारी देण्यात येणारे अनुदान बंद केले. आणि मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती किराणा असोसिएशन यांच्या मदतीने मंदिर परिसरात अन्न शिजवून, दररोज बाराशे जेवणाचे डबे १५ एप्रिलपासून सकाळ आणि संध्याकाळी सेवेकरा मार्फत मजूरांना पोहोचवीले जातात. गजानन महाराज मंदिर संस्थान चा उपक्रम अन्य संस्थानासाठी दिशादर्शक राहिल. 
आकाशवाणी बातम्यासाठी, परभणीहून विनोद कापसीकर
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तसंच खुलताबाद तालुक्यात आमदार प्रशांत बंब यांच्या सहकार्यातून गरजू कुंटुंबासाठी पंचवीस हजार किराणा किटच्या वाटपाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातली सर्व लहान गावं, वाड्या आणि वस्त्यांमधल्या गरजू लोकांना या किराणा किटचं वाटप करण्यात येणार आहे. मुंबईहून औरंगाबादच्या दिशेनं पायी येणाऱ्या कामगार कुटुंबांसाठीही आमदार बंब यांनी लासुर स्टेशन, नागपूर - मुंबई महामार्गावरील एएस क्लब चौफुली तसंच औरंगाबाद इथल्या महावीर चौक परिसरात गेल्या एक महिन्यापासून भोजनाची सोय केली आहे
****

 जालना औद्योगिक वसाहतीमधल्या एका गोदामावर आज दुपारी छापा टाकून पोलिसांनी सुमारे ५० लाख रुपये किंमतीचा अवैध गुटख्याचा साठा जप्त केला. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी पथकासह केलेल्या या कारवाईत तीन वाहनंही जप्त करण्यात आली असून, दोन संशयितांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 दरम्यान, अंबड पोलिसांनी आज पहाटे केलेल्या अन्य एका कारवाईत अंबड रोडवरील एका आश्रमातल्या खोल्यांमधून तसंच जामखेड इथल्या एका व्यक्तीच्या घरातून १२ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित व्यक्तीवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
****

 टाळेबंदीमुळे पुण्याहून परभणी जिल्ह्यातल्या गावाकडे पायी निघालेल्या एका तरुणाचा बीड जिल्ह्यातल्या धानोरा या गावी मृत्यू झाला. पिंटू पवार असं या तरुणाचं नाव असून, तो ४० वर्षांचा होता. गेल्या आठ तारखेला पुण्यातून निघालेल्या या तरुणाचा अतिश्रम आणि शरीरातली पाण्याची पातळी घटल्यानं मृत्यू झाल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 नांदेड इथले सहा कोविड रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली नांदेड जिल्ह्यात बरे झालेल्या कोविड रुग्णांची एकूण संख्या आता ३६ झाली आहे. उपजिल्हाधिकारी  प्रशांत शेळके यांनी ही माहिती दिली. कोविड १९ आजाराने बाधीत रुग्णांची नांदेड जिल्ह्यात एकूण संख्या १०६ सहा आहे. यापैकी पाच रूग्ण मृत्यू पावले आहेत. तर दोन रुग्ण अद्याप फरार आहेत.

*****
***

No comments: