Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21
May 2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मे २०२० सायंकाळी ६.००
****
Ø
औरंगाबाद
इथं आज दोन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू; जिल्ह्याची रुग्णसंख्या एक हजार १७९
Ø
बीड जिल्ह्यात
कोविडचे
नवीन १३ रुग्ण तर उस्मानाबाद इथं आणखी एका महिलेला लागण
Ø
देशांतर्गत विमान प्रवासासाठी नागरी हवाई वाहतुक मंत्रालयाकडून तिकीट
दर निश्चित
आणि
Ø औरंगाबाद जिल्ह्यात महानगरपालिका
हद्द वगळता उद्यापासून एसटी बस सेवा सुरू
****
औरंगाबाद इथं आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा
मृत्यू झाला, या दोन्ही रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत
उपचार सुरू होते. यामध्ये आसेफिया कॉलनीतील ४८ वर्षीय आणि रहेमानिया कॉलनीतील ६५ वर्षीय
व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ४१ झाली असल्याचं घाटीचे माध्यम
समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं आज सकाळी ५४ तर दुपारी सहा, असे दिवसभरात ६० नवीन कोरोनाबाधित रुग्ण
आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू ग्रस्तांची एकूण संख्या १ हजार १७९ झाली आहे.
आज
दुपारनंतर शहरात सापडलेल्या रुग्णांमध्ये मकसूद कॉलनी, एन-५ सिडको, एन-७ सिडको, पिसादेवी, राम नगर
आणि कन्नड तालुक्यातल्या धनगरवाडी इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
बीड
जिल्ह्यात आज आणखीन १३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या तेरा
जणांपैकी माजलगाव तालुक्यातल्या नित्रुड इथं ११, सुर्डी इथला एक तर धारूर
तालुक्यातल्या कुंडी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. बीड जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या आता ३० झाली आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात उमरगा इथं आणखी एका महिलेला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं
तपासणीत निष्पन्न झालं आहे.
पुणे इथून उमरगा इथं आलेल्या या महिलेला दोन दिवसांपासून
विलगीकरणात
ठेवण्यात आलं होतं. तिच्यावर उमरगा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात
उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक
डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणू बाधितांची संख्या आता १४ झाली आहे.
****
पालघर जिल्ह्यात आज दिवसभरात
१० जणांना कोरोनाविषाणूची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोव्हीडच्या रुग्णांची संख्या
४३४ झाली आहे. यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला असून २३४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात
आलं आहे.
****
मुंबईत
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ९३५ झाली आहे. यापैकी ८४१ रूग्णांचा
मृत्यू झाला आहे. शहरात १ हजार ३७२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून ४१ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ६ हजार ४६६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
****
पुण्यात आज एका ४३ वर्षीय पोलिस
हवालदाराचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. गेल्या दहा तारखेपासून या पोलिसावर
रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यात किमान २६ पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली
होती, यापैकी १४ जण बरे झाले तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे
उद्भवलेल्या संकटाच्या काळात भारतीय जनता पक्ष राजकारण करत असल्याची टीका राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. भारतीय जनता
पक्षाच्या उद्याच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. कोरोना विषाणू
प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याबद्दल भाजपने उद्या हे आंदोलन पुकारलं
आहे. भाजपच्या प्रदेश शाखेचा हा बालिशपणा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील
अशाप्रकारच्या आंदोलनाला मान्यता नसेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधल्या
महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी, केंद्र सरकारवर मुंबई आणि महाराष्ट्राशी
सापत्नभावानं वागत असल्याचा आरोप केला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाला प्रतिबंध
करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत पुरवण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप त्यांनी
केला आहे. गेल्या आठवड्यात जारी केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्येही महाराष्ट्राला
डावलल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. मुंबईतील सर्व महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे
वळवण्याचा केंद्राचा कुटील डाव असून तो आम्ही हाणून पाडू, असा निर्धारही ठाकूर यांनी
व्यक्त केला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
येत्या
सोमवारपासून सुरू होत असलेल्या देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीसंदर्भात नागरी हवाई
वाहतुक मंत्रालयानं तिकीट दर निश्चित केले आहेत. नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंह पुरी
यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुढच्या तीन महिन्यांसाठी विमान प्रवासाचा
दर कमीत कमी साडे तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर १० हजार रुपये इतका असेल. विमान
प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेच्या आधारावर हे दर ठरवण्यात आले आहेत. २४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत
हे दर लागू असतील असं पुरी यांनी सांगितलं.
****
येत्या
एक जूनपासून धावणाऱ्या शंभर रेल्वेगाड्यांसाठी तिकीट आरक्षण आजपासून सुरू झालं, पहिल्या
दोन तासातच दोन लाख नव्वद हजार पाचशे दहा प्रवाशांसाठी तिकीटांचं आरक्षण झालं असल्याचं,
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. पूर्णपणे आरक्षित असलेल्या या गाड्यांमध्ये वातानुकुलित
तसंच बिगर वातानुकूलित डबे असणार आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
स्थलांतरीत
मजुरांच्या रेल्वे प्रवासासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत ६७ कोटी
१९ लाख ५५ हजार ४९० रुपये देण्यात आले आहेत. हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या
खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून
बिहार इथल्या अररिया आणि मुझफ्फरपूर साठी उद्या आणि परवा विशेष श्रमिक रेल्वे रवाना
होणार आहे. उद्या अररियासाठी रवाना होणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद जिल्ह्यातले तर परवा
मुझफ्फरपूरला जाणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातले
असे जवळपास तीन हजार दोनशे मजूर प्रवास करणार असल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे
यांनी सांगितलं आहे. या दोन्ही विशेष श्रमिक रेल्वे सकाळी अकरा वाजता औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून
रवाना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या मजूरांचा प्रवास खर्च जिल्हा प्रशासनामार्फत
करण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील
महानगरपालिका हद्द वगळता तालुक्याच्या ठिकाणी उद्यापासून राज्य परिवहन महामंडळाची बस
सेवा सुरू होत आहे. जिल्ह्यातल्या पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, आणि सोयगाव
या तालुक्यांअतर्गत एसटीच्या एकूण १७८ फेऱ्या नियोजित असल्याचं याबाबतच्या पत्रकात
नमूद करण्यात आलं आहे. या बसमध्ये शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन बंधनकारक
असून, एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांची वाहतूक करण्यात येणार असल्याचं कळवण्यात
आलं आहे.
****
बीड जिल्ह्याचे
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ
वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला हाफकिन महामंडळाने सामाजिक दायित्व निधीतून सात नवीन
व्हेंटिलेटर्स मोफत उपलब्ध करून दिले आहेत. सध्या या रुग्णालयात १३ व्हेंटिलेटर्स असून
यापैकी तीन व्हेंटिलेटर हे खास कोविड - 19 कक्षासाठी राखीव आहेत. नवीन व्हँटिलेटर्स
उद्या रुग्णालयात दाखल होणार आहेत.
****
लातूर शहरात नगराच्या
मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटायझर यंत्र बसवण्यात आलं आहे. शहरातल्या सुभेदार रामजी नगर
प्रभागाच्या नगरसेविका कांचन अजनीकर यांच्या पुढाकारातून आणि प्रभागातील युवकांच्या
सहकार्याने हे यंत्र बसवण्यात आलं आहे.
****
नांदेड
इथं गेल्या ५८ दिवसापासून भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या वतीने कम्युनिटी
किचन सामाजिक स्वयंपाकघर उपक्रम सुरू करण्यात आला होता. यामुळे टाळेबंदी काळात २९ हजार
लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या कार्याची दखल केंद्रीय पातळीवर घेण्यात आली
असल्याचं, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितलं.
****
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव
गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आदरांजली अर्पण
केली आहे. दहशतवाद आणि हिंसाचाराला मानवी जीवनातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणं
हीच राजीव गांधींना खरी आदरांजली ठरेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
लातूर इथं राजीव
गांधी चौकात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख
यांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं. राज्यमंत्री संजय
बनसोडे, आमदार धीरज देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी राजीव गांधी यांना अभिवादन
केलं.
परभणी
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला
अभिवादन केलं. दहशतवाद आणि हिंसाचाराला मानवी जीवनातून हद्दपार करण्याची शपथ जिल्हाधिकाऱ्यांनी
उपस्थितांना दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यात आगामी काळात
कोरोना रुग्ण सापडले नाहीत, तर जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल, त्यासाठी प्रत्येकाने
नियमांचे पालन करणं अपेक्षित असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. अहमदनगर
इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या
प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.
*****
***
No comments:
Post a Comment