Monday, 18 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 18 MAY 2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येने आज एक हजाराचा टप्पा पार केला. आज सकाळी शहरात कोरोना विषाणूची लागण झालेले ५९ रुग्ण वाढल्याने, जिल्ह्यातल्या रुग्णांची एकूण संख्या १०२१ झाल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
      औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जुना मोंढा परिसरात ११, सिल्क मील कॉलनी ८, मकसूद कॉलनी ६, भवानी नगर ५, बहादूरपुरा- बंजारा कॉलनीतल्या दुसरी गल्ली तसंच हुसेन कॉलनी प्रत्येकी ४, न्याय नगर, हिमायत बाग जलाल कॉलनीत प्रत्येकी ३, पुंडलिक नगर तसंच मदनी चौकात प्रत्येकी २, आणि पैठण गेट-सब्जी मंडी, किराडपुरा, सेव्हन हिल कॉलनी, एन-6 सिडको, बायजीपुरा, रोशन नगर, हनुमान नगर, संजय नगर, हिमायत बाग, एन-13 ‍सिडको, सादाफ कॉलनी, आणि बेगमपुरा या भागात प्रत्येकी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला आहे. यामध्ये २७ महिला आणि ३२ पुरुषांचा समावेश आहे.
****
गडचिरोली जिल्हयात प्रशासनाकडून संस्थात्मक विलगीकरण केलेल्या तीन प्रवाशांचे कोरोना चाचणी अहवाल नमुने काल रात्री पॉझिटीव्ह आले आहे. यामध्ये कुरखेडा विलगीकरण संस्थेतील २ आणि चामोशी विलगीकरण संस्थेतील एकाचा समावेश असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.या तीघांवर जिल्हा रूग्णालयातील कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.
****
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतियांसाठी उत्तरप्रदेश, बिहार, तसंच दक्षिण भारतासाठी विशेष रेल्वे सेवा सोडण्याची मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी  रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. टाळेबंदीच्या काळात रोजगार नसल्यामुळं या कामगारांसाठी वांद्रे स्टेशनवरून विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात तसंच अंधेरी आणि बोरीवली स्थानकात या रेल्वे गाड्यांना थांबे देण्यात यावेत, अशी मागणी कीर्तिकर यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना या निवेदनाद्वारे केली आहे.
****
सांगली शहरात बाजारपेठेतील दुकानं आजपासून एक दिवस आड एक सुरू केली जाणार आहेत. बाजारपेठ खुली होत असल्यामुळे लोकांच्या अडचणी कमी व्हायला मदत होणार आहे.
****


No comments: