Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोरोना विषाणू संसर्गाचं संकट संपुष्टात आणून जनजीवन पूर्वपदावर आणण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
**
राज्यात आणखी दोन हजार ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण; ५१ जणांचा मृत्यू
**
औरंगाबाद जिल्ह्यात रूग्ण संख्या एक हजाराच्या
वर; तिघा जणांचं उपचारादरम्यान निधन
**
बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यातही रूग्णांच्या संख्येत वाढ
**
औरंगाबादसह, कोरोना विषाणूचा अधिक संसर्ग असलेल्या शहरांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या
दहा तुकड्या तैनात
आणि
**
देशभरातल्या कामगारांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आज देशव्यापी निदर्शनं
**
पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोरोना विषाणू संसर्गाचं संकट संपुष्टात आणून जनजीवन पूर्वपदावर आणण्यास प्राधान्य असल्याचं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल
राज्यातल्या जनतेशी समाजमाध्यमांवरून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
माझी
तर इच्छा अशी आहे की हे जे संकट आहे संकट कोणत्याही
परिस्थितीत आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपावयचं कारण जून महिना सुरू झाल्यानंतर शाळा-कॉलेजेस
यांचे प्रवेश त्यांचे शैक्षणिक वर्ष त्यांची हे सगळे सुरु करावे लागते हे जनजीवन पूर्ण
सुरळीत व्हायला काही काळ जावा लागणार जेवढी लवकर आपण कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ तेवढ्या
लवकर आपण बंधन मुक्त होऊ जे काय करतो आहेत आपल्या सर्वांच्या हितासाठी करतो आहे आज पर्यंत तुम्ही जे काय सरकारला सहकार्य केलं तसंच सहकार्य सरकारला कराल
अशी खात्री बाळगतो
राज्यात ३१मे पर्यंत टाळेबंदी कायम
राहणार असून
ग्रीन झोनमधील निर्बंध शिथील करणार
असून ऑरेंज झोनमध्ये काही सवलती देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र
रेड झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या रेड झोनला ग्रीन झोन मध्ये आणणं हे मोठं आव्हान असून यासाठी
जनतेनं विनाकारण रस्त्यांवर फिरू नये आणि नियमांचं काटेकोर पालन करावं. आतापर्यंत पाळलेली शिस्त अजून कडकपणे पाळा असं आवाहन त्यांनी
यावेळी केलं.
पश्चिम महाराष्ट्रातल्या
तसंच कोकणातल्या लोकांनीही आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी स्थलांतर करण्याची
घाई करू नये आणि कोरोना
विषाणूचे वाहक होऊ नये असं
आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
राज्यात ४० हजार एकर जमीन नवीन उद्योगांसाठी
राखीव ठेवण्यात आली असून प्रदूषण न करणाऱ्या हरीत उद्योगांसाठी कोणत्याही अटीशिवाय परवानगी
देऊन मुलभूत सुविधा देणार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी नवीन उद्योजकांना
राज्यात उद्योग सुरू करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले……
सरकारला
सहकार्य केलं तसंच सहकार्य सरकारला कराल अशी खात्री बाळगतो.
नवीन
उद्योग येण्यासाठी एक वेगळी स्पर्धा आहे कोण
काय आणखी सुविधा देतेय महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं आज आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास
४०हजार एकर पेक्षा जास्त जमीन देण्यासाठी राखून ठेवत आहोत त्याचप्रमाणे नवीन उद्योग
परदेशातून येथील आपले काही उद्योजक नवीन उद्योग सुरू करू इच्छित असतील त्याला आपण Green Industry म्हणतो त्यांच्यासाठी सुरू करताना कोणत्याही अटीतटी
त्यांना पण ठेवणार नाही परवानगीशिवाय कोणी उद्योग सुरू करा उद्योजकांनो महाराष्ट्र
तुमची वाट बघतोय या नवीन उद्योजकांना या उद्या महाराष्ट्रात या
परप्रांतिय आपल्या प्रांतात परत गेल्यामुळे
मनुष्यबळ कमी पडत असेल अशा ठिकाणी भुमीपुत्रांनी पुढे येऊन स्वावलंबी होण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिला.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेवर निवडून
आलेल्या नऊ जणांनी काल विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. यामध्ये
मुख्यमंत्र्यांसह, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,
शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील,
रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, आणि
राजेश राठोड यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी
सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची
काल राजभवनात सदिच्छा
भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचं विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -
सीबीएसईने बारावीच्या उर्वरित परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
या परीक्षा आता १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहेत. परीक्षार्थींनी मास्क वापरणं तसंच सॅनिटायझर सोबत ठेवणं बंधनकारक करण्यात आलं
आहे. आपल्या पाल्याला कोणताही आजार होणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यावी, असंही मंडळानं म्हटलं आहे.
****
राज्यात काल आणखी दोन हजार ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात मुंबईत एक हजार १८५, तर पुण्यात १५९ रुग्ण सापडले.
यामुळे राज्यात एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा आकडा ३५ हजार ५८
इतका झाला आहे. या आजारानं काल राज्यात ५१ जणांचा मृत्यू झाला,
मुंबईत २३ तर पुण्यात पाच मृत्यूची नोंद झाली. कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात आतापर्यंत एक हजार २४९ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. काल ७४९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात
आलं. राज्यात आतापर्यंत आठ हजार ४३७ जण कोरोना विषाणू मुक्त झाले
आहेत.
****
औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येने काल
एक हजाराचा टप्पा पार केला. काल सकाळी शहरात कोरोना विषाणूची लागण झालेले
६० रुग्ण वाढल्यानं, जिल्ह्यातल्या रुग्णांची एकूण संख्या एक
हजार २१ झाल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. या नव्या रुग्णांमध्ये
जुना मोंढा परिसरातले ११, सिल्क मिल कॉलनी आठ, मकसूद कॉलनी सहा, भवानी नगर पाच, बहादूरपुरा- बंजारा कॉलनीतली दुसरी गल्ली तसंच हुसेन
कॉलनी इथं प्रत्येकी चार, न्याय नगर, हिमायत
बाग जलाल कॉलनीत प्रत्येकी तीन, पुंडलिक नगर तसंच मदनी चौकात
प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. पैठण गेट-सब्जी मंडी, किराडपुरा, सेव्हन हिल कॉलनी, सिडको एन-सहा, बायजीपुरा, रोशन नगर,
हनुमान नगर, संजय नगर, हिमायत
बाग, सिडको एन-१३, सादाफ कॉलनी,
आणि बेगमपुरा या भागात प्रत्येकी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला
आहे. यामध्ये २७ महिला आणि ३३ पुरुषांचा
समावेश आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं काल तीन रुग्णांचा
मृत्यू झाला, यामध्ये पैठण गेट परिसरातली ५६ वर्षीय महिला,
बुढी लेन इथला ४२ वर्षीय पुरुष तर मदनी चौक परिसरातल्या एका ६५ वर्षीय
कोरोना विषाणू ग्रस्ताचा समावेश आहे. यामुळे औरंगाबाद इथं कोरोना
विषाणू संसर्गामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. आतापर्यंत ३२२ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं घरी परतले आहेत.
****
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात परवा कोरोना विषाणू बाधित
आढळलेल्या सात रुग्णांपैकी एका ६५ वर्षीय महिलेचा काल पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, माजलगाव तालुक्यातल्या दोन जणांचे अहवाल बाधित
असल्याचं प्राप्त झाल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी ही सांगितलं. यामुळे आता बीड जिल्ह्यातल्या एकूण रूग्णांची संख्या
११ झाली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं काल एकाच कुटुंबातले सहा कोरोना विषाणू बाधित असल्याचं
आढळून आलं. हे कुटुंब परवा रात्री मुंबईहून गावी आल्यानंतर
त्यांना विलगीकरणात ठेवलं होतं. त्यामुळे त्यांचा इतर कोणाशीही
संपर्क झाला नसल्याचं नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या शेळगाव या गावी मुंबईहून परतलेल्या एका
४६ वर्षीय महिलेला कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक
मुगळीकर यांनी काल सायंकाळपासून पुढील आदेशापर्यंत शेळगांव हे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून
घोषित केले आहे.
****
नांदेड जिल्ह्यात
काल सायंकाळपर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ९७ झाली आहे. उपचार
सुरु असलेल्या ६० रुग्णांपैकी १० रुग्ण, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय इथं तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर आणि
यात्री निवास कोवीड केअर सेंटर इथं ४८ रुग्ण, तसंच बारड ग्रामीण रुग्णालय इथल्या धर्मशाळेतल्या कोवीड केअर सेंटरमध्ये २ रुग्णांवर औषधोपचार
सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत
स्थिर आहे.
****
सोलापूर इथं काल एकाच दिवशी ५० नवीन कोरोना
विषाणू बाधित रूग्ण आढळले. यात ३४ पुरूष आणि १६ महिलांचा समावेश
आहे. रायगड जिल्ह्यातही काल २८ नवीन बाधित रूग्ण आढळले.
****
नंदूरबार जिल्ह्यात कोरोना
विषाणूनं बाधीत सर्व २१ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.
जिल्ह्यात सध्या एकही बाधीत रुग्ण नाही. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
-
गेल्या
महिन्याभरात जवळपास १ हजार ३८ जणांचे स्वॅप तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यातील
२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ९८४ अहवाल नकारात्मक आले होते महिन्याभरातील कोरोना योद्धाच्या
अथक परिश्रमानंतर नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधितांचा आकडा शून्यांवर पोहोचला
आहे गेल्या ८ मे रोजी शेवटचा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला होता नागरिकांनी सतर्क
राहून हा आकडा शून्यांवर ठेवत जिल्हा Green Zone येण्याची गरज देखील व्यक्त होत आहे
आकाशवाणीच्या बातम्यासाठी नंदुरबारहून निलेश पवार
****
अहमदनगर जिल्ह्यातले
सात रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले. या सर्वांना काल रूग्णालयातून सुटी देण्यात आली.
त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची
संख्या आता ४९ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १० जणांवर उपचार सुरू
आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
****
औरंगाबादसह, मुंबई, पुणे, अमरावती आणि
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या कोरोना विषाणूचा
अधिक संसर्ग असलेल्या शहरांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या दहा तुकड्या
तैनात करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे राज्याच्या पोलिस दलावर तणाव आला आहे,
या पार्श्वभूमीवर राज्यानं केंद्राकडे मनुष्यबळाची मागणी केली होती, त्यानुसार या नऊ
तुकड्या राज्यात पाठवण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या
जिल्ह्यात या तुकड्या नियुक्त करण्यात आल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या शेवटच्या रविवारी ३१
मे रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या मालिकेचा हा ६५ वा भाग असेल. नागरिकांनी येत्या
२५ मे पर्यंत या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक
एक सात आठ शून्य शून्य या मोफत दूरध्वनी क्रमांकावर, माय जीओव्ही ॲपवर किंवा नमो ॲपवरही नोंदवावेत,
एक नऊ दोन दोन या क्रमांकावर मिस कॉल देऊन आलेल्या लिंकवरही नागरिकांना
संदेश पाठवता येणार आहे.
****
शुक्रवारची रमझान महिन्यातली शेवटची नमाज आणि रमझानची नमाज सरकारच्या
दिशानिर्देशांचं पालन करूनच अदा करावी अस आवाहन मुस्लीम
पर्सनल लॉ बोर्डाचे संस्थापक सदस्य शिक्षण तज्ज्ञ कमाल फारूकी
यांनी केलं आहे. सरकारनी जाहीर केलेली टाळेबंदी
सर्वसामान्यांच्या हितासाठी उचलेलं योग्य पाऊल असून सरकारला सहकार्य
करावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात
बाधितांचे प्रमाण कमी होत असून, ही दिलासादायक बाब असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री छगन
भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. तथापी, कोणत्याही
परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज राहण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाची १३० जवानांची एक तुकडी दाखल झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात
एकूण बाधितांचा आकडा खूप मोठा असला तरी शासनाच्या नवीन नियमानुसार रुग्णांना दहा दिवसांनंतरच
घरी पाठवले जात असल्यानं रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
इथून आज एक मजुरांची विशेष श्रमिक रेल्वे झारखंडला जाणार आहे. दुपारी दोन वाजता ही
रेल्वे रवाना होईल. तर २२ तारखेला बिहार राज्यातल्या सिवान इथं, आणि २३ तारखेला मुजफ्फरनगर
इथं रेल्वे जाणार आहे.
****
जालना जिल्ह्यात टाळेबंदीत अडकून पडलेल्या मजुरांना बिहारमधल्या
छापरा स्थानकापर्यंत सोडण्यासाठी शुक्रवार २२ मे रोजी जालना रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात
येणार आहे. ही रेल्वे दानापूर आणि आरा स्थानकावरही थांबणार
आहे.
****
संचारबंदीच्या काळात तरुणांना महात्मा गांधी राष्ट्रीय
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे लातूरचे
जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे. केंद्र
सरकारने यासाठी ४० हजार कोटी रुपयाचं पॅकेजही जाहीर केलं असून याअंतर्गत शेतकऱ्यांना
आणि मजुरांना काम मिळवून द्यावं अशी मागणी सस्तापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या
निवेदनात केली आहे.
****
राज्य सरकारचे सर्व राजपत्रित अधिकारी मे
महिन्यातलं दोन दिवसांचं
तर अराजपत्रित अधिकारी
तसंच गट क
आणि ड वर्गातले कर्मचारी एका दिवसांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणार आहेत. यासंदर्भात काल आदेश जारी करण्यात
आले.
****
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘पीएम केयर्स निधी’ला ५१ लाख रुपये मदत दिली आहे. संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी काल या बाबतचं पत्र औरंगाबाद
इथं विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे सुपूर्द केलं.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
मात्र असं असूनही या भागातले नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांनी १४ दिवस गृह विलगीकरणात राहावं.
अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क वापरावा, तसंच शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे.
****
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने, शिफारस केल्यानुसार नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील गणेशनगर भागात रोगप्रतिकारक
क्षमता वाढविणार्या अर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथी औषधीचं काल भाजपच्या नगरसेविका
वैशाली मिलींद देशमुख यांच्या वतीनं मोफत वाटप करण्यात आलं.
****
परभणी इथं संचारबंदी काळात बाहेर फिरणाऱ्या
नागरिकांची जप्त केलेली वाहनं, २०० रुपये दंड आकारून सोडण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित वाहनधारकांनी आजपासून आपली वाहनं योग्य
कागदपत्रे दाखवून एकमेकांमधील अंतराच्या नियमाचं पालन करत सोडवून
न्यावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे. पोलिस
प्रशासनानं एकूण १ हजार ७५८ दुचाकी, तर १५७ चारचाकी वाहनं जप्त
केलेली आहेत.
****
टाळेबंदीमुळं पतीच्या हाताला काम नव्हतं, घरात
खाणाऱ्यांची पाच तोंड, आणि मुलीचं दहावीचं वर्ष या अडचणींवर बीड जिल्ह्यातल्या
पाटोदा तालुक्यातल्या पारगाव घुमारा इथल्या शिवकन्या परदेशी यांनी मात केली. त्यांनी
उमेदच्या मदतीनं बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन पिठाची गिरणी सुरू केली. यामुळे संसाराला मोठा
हातभार लागला. आपल्या या
यशाबद्दल सांगतांना त्या म्हणाल्या.......
कोरोनाच्या
परिस्थितीमध्ये आमच्या ह्यांना काम नसल्यामुळे ग्रामसंघ तुमची आम्हाला साठ हजार रुपये
भेटले होते त्यांची चक्की घेतली त्यातून व्यवसाय चालू केला आहे त्यात घर भागवते माझी
मुलगी दहावीला शिक्षण चालू आहे तिच्या शिक्षणाला खर्च होत आहेत त्यातूनच भागवितं आहे
****
राज्यातल्या शेतकऱ्यांनी
उत्पादित केलेल्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या पानगाव इथल्या व्यंकटेश जिंनीग
प्रेसिंग मिल इथं शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री
देशमुख बोलत होते. पानगाव इथं कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे
आपल्या भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
नांदेड वाघाळा
शहर महानगर पालिकेच्या कार्यालयीन कामकाजाला कालपासून सुरूवात झाली. मास्क
न वापरता काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्याचे
आदेश काल पालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी दले आहेत. शहरात कोरोनाविषाणू
बाधीत रूग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे
महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या
कर्तव्यावर हजर होण्याचे निर्देश
आयुक्त लहाने यांनी दिले होते.
****
नवी मुंबईतल्या
कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार कालपासून
पुन्हा सुरू झाले. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव
बघता गेल्या सोमवारपासून हे व्यवहार बंद करण्यात आले होते. समितीच्या
पाच बाजारांमध्ये भाजी, खाद्यपदार्थ आणि मसाल्यांचा बाजाराला
आजपासून सुरूवात झाली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं शासनाच्या हमी भाव शेतमाल खरेदी योजनेअंतर्गत
मका आणि ज्वारी खरेदी केंद्राचा शुभारंभ काल खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते झाला. लोहा इथंही तूर आणि हरभरा खरेदी सुरू करण्यात आली असून, काल आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते या विक्रीचा शुभारंभ झाला.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या
सारोळ बुद्रुक गावात अवैध दारू विक्रीला प्रतिबंध करत नागरिकांनी
एका निर्मिती केंद्रावरची दारू आणि रसायन नष्ट केलं. टाळेबंदी काळात दारूची दुकानं बंद असल्यामुळं गावठी दारुचा व्यवसाय तेजीत आहे.
पोलिसांची वाट न बघता नागरिकांनीच ही कारवाई केली.
****
नांदेड जिल्ह्याच्या
कंधार तालुक्यातल्या बिजेवाडी इथले अल्पभूधारक शेतकरी गजानन डांगे यांना राज्य सरकारच्या
वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा लाभ मिळाला
आहे. या योजनेतून त्यांना एक एकर शेतात आंबा लागवडीसाठी दोन लाख अठरा हजार रूपये अनुदान
मंजूर झालं आहे. या आंबा लागवडीसाठी खड्डे खोदण्याचा आरंभ आमदार शामसुंदर शिंदे यांच्या
हस्ते झाला. या योजनेविषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले -
तमाम
शेतकरी बांधव त्याला त्याचा लाभ मिळेल जो काय मजूरी करतो त्या मजुरीचे या योजने अंर्तगत
पैसे मिळतील झाड जगेल आणि झाड मोठे होईल ज्या काय अशा प्रकारच्या योजना आहेतन जो शेतकरी
अल्पभूधारक आहे जो एक हेक्टरच्या खाली शेती आहे याला अशा शेतकराला याचा लाभ मिळतो
****
देशभरातल्या कामगारांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज देशव्यापी निदर्शनं करण्यात येणार आहेत. पक्षाचे राज्य सचिव राम बाहेती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
स्थलांतरित कामगारांसाठी अधिकाधिक रेल्वे आणि बससेवा पुरवली जावी,
प्रवासादरम्यान भोजनाची सोय असावी, सर्व मजुरांना
प्रत्येकी १० हजार रुपये प्रवास भत्ता द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी
हे आंदोलन केलं जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या खेडकरवाडी या गावाजवळ
मजुरांना घेऊन जाणारी खासगी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर २८
जण जखमी झाले. सोलापूर इथं अडकलेल्या बिहार राज्यातल्या मजुरांना घेऊन ही बस औरंगाबादला
येत होती. जखमी कामगारांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
दुधना नदीपात्रात पाणी सोडावं या मागणीसाठी परभणी
जिल्ह्यात मानवत इथं काल ‘मानवत तालुका दुष्काळ
निवारण संघर्ष समितीनं’ रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना
मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते
कॉमरेड लिंबाजी कचरे, तसंच बैल गाड्या
घेऊन आलेले शेतकरी, आदिवासी आणि विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
तीन महिन्यापासूनच्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेनं महापालिकेच्या संकुलातल्या भाडेकरूंना
भाड्यात ५० टक्के सवलत द्यावी तसंच मालमत्ता धारकांना या काळातला मालमत्ता
कर माफ करावा अशी मागणी नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर
यांनी महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्याकडे पत्राद्वारे केली
आहे. पाणी पुरवठा करातही ५० टक्के सवलत देण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
****
परभणी जिल्ह्यात
जिंतूर शहरात जीवनावश्यक वस्तुंशिवाय अन्य दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी
जिंतूर तालुका व्यापारी महासंघानं आमदार मेघना
बोर्डीकर यांच्यामार्फत केली आहे. याबाबतचे एक निवेदन तहसीलदारांना सादर
करण्यात आलं..
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात ताडकळसच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामपंचायतीतर्फे कोरोना
विषाणू संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य
देण्यात आलं पंचायत समितीचे गट विकास
अधिकारी अमित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या
साहित्याचं वाटप झालं.
****
सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील
पुळूज इथले हुतात्मा सैनिक धनाजी होनमाने यांच्या पार्थिव देहावर
जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात काल दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. होनमाने यांना गडचिरोली इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण आलं
होतं.
****
धुळे जिल्ह्यात
नागपूर- सुरत महामार्गावर मुकटी
या गावाजवळ काल सायंकाळी खाजगी प्रवासी
बस आणि गॅस टँकरची समोरासमोर धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर
दोन्ही वाहनं जळून खाक झाली. दोन्ही वाहन जाळून खाक झाल्यानं वाहनांची
आणि मृतांची ओळख पटू शकली
नाही, तसंच बसमध्ये नेमके किती प्रवासी होते
हे स्पष्ट झालं नाही.
****
No comments:
Post a Comment