Thursday, 21 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 21 MAY 2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
जालना शहरात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत तीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४४ झाली आहे. कोरोना विषाणूच्या नवीन बाधितांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे तिघं मुंबईहून घनसावंगी तालुक्यातील सिध्देश्वर पिंपळगाव इथं आलेले आहेत. दरम्यान, राज्य राखीव दलाच्या ११५ पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य ४३ जणांचे कोरोना विषाणू तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत, यापैकी कोणालाही या विषाणूची लागण झालेली नसल्याचं, या अहवालात नमूद आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज ५४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या १ हजार १७३ झाली आहे.
****
अमरावती जिल्ह्यात आणखी पाच जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाविषाणू ग्रस्तांची एकूण संख्या १३९ झाली आहे. दरम्यान, अमरावती इथं जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कोरोनाविषाणू संसर्ग पसरु नये यासाठी मध्यवर्ती कारागृहातल्या १७० कैद्यांचं त्यांच्या घरी ४५ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांचा यात समावेश आहे. गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांचं गृह विलगीकरण केलं जाणार नाही, असं गृह विभागाने स्पष्ट केलं आहे.
****
बृहन्मुंबई महापालिका आपल्या सर्व २४ प्रभागातल्या खासगी रुग्णालयांमधल्या प्रत्येकी १०० रुग्णखाटा अधिग्रहीत करणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेकडे किमान २४०० अधिक रुग्णखाटांची व्यवस्था होणार आहे. मुंबईत वाढणारी रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण चाळीस टक्क्यांच्या वर पोहोचलं आहे. गेल्या चोवीस तासात ३ हजार दोन रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त झाले, या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३०० वर पोहोचली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत ५ हजार ६०९ नवीन रुग्ण समोर आले असून, १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरातल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख १२ हजार ३५९ झाली असून, यापैकी ३ हजार ४३५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
****
देशात आतापर्यंत २६ लाख १५ हजार ९२० जणांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केली असल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद -आयसीएमआरनं म्हटलं आहे. आतापर्यंत ३८६ सरकारी आणि १७३ खाजगी प्रयोगशाळांना मंजुरी देण्यात आल्याचं आयसीएमआरनं सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये नियमित करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवणार असल्याचं, परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी म्हटलं आहे. याबाबतची शिफारस शासनाकडे लवकरच करण्यात येणार असल्याचं आश्वासन केंद्रे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधीत रुग्णांचं प्रमाण वाढत असतानाही,वस्तू खरेदीसाठी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. यावेळी नागरिकांकडून शारिरिक अंतर राखण्याचा नियम पाळला जात नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीसंदर्भात नागरी हवाई वाहतुक मंत्रालयानं विमान वाहतुक कंपन्या, विमानतळं तसंच प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांना आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करणं, विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल सिक्रिंग - तापमान तपासणी कक्षातून चालत येणं तसंच विमान सुटण्याच्या किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचणं आवश्यक आहे, तर विमान वाहतुक कंपन्यांना प्रवाशांचं सामान निर्जंतुक करून घेणं आवश्यक आहे. विमानतळावर सगळीकडे शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करणं आवश्यक असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करण्यात येत आहे. १९९१ साली आजच्या दिवशी तमिळनाडूत पेरुम्बुदूर इथं एलटीटीई या दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट घडवत राजीव गांधी यांची हत्या केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीव गांधी यांना ट्वीट संदेशाद्वारे आदरांजली अर्पण केली आहे.
****

No comments: