Friday, 22 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 22 MAY 2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी सव्वीस कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या एक हजार दोनशे बारा इतकी झाली आहे. जयभीम नगर - पाच, टाइम्स कॉलनी, कटकट गेट - तीन, न्याय नगर - चार, गरम पाणी, रेहमानिया कॉलनी, भवानी नगर, जुना मोंढा प्रत्येकी दोन, कुंवारफल्ली, राजा बाजार, सुराणा नगर, मिल कॉर्नर, रहीम नगर, जसवंतपुरा, पुंडलिक नगरमध्ये दहावी गल्लीत, सातारा परिसर, जवाहर कॉलनी, एन -२ सिडको या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. यामध्ये सोळा पुरूष आणि दहा महिला असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोन क्षेत्रात असल्यानं केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज पासून जिल्ह्यातले व्यवहार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यानुसार आज जिल्ह्यातलं केश कर्तनालयं, कापड दुकानांसह चारचाकी गाड्या, रिक्षा, जिल्हा अंतर्गत वाहतुक सुरू झाली आहे. सर्व शासकीय कार्यालयं, खाजगी कार्यालय, टपाल सेवा, कुरिअर सेवा, ग्रामीण तसंच उद्योग, बांधकाम व्यवसाय सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात एसटी बस वाहतुकही सुरू झाली आहे
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात साठ वर्षांवरील दोन कोरोना विषाणू बाधित महिला रुग्णांचा काल मृत्यू झाला. यातील एक महिला मुंबईहून राशीन इथं आली होती तर दुसरी महिला अहमदनगर इथली आहे. यामुळे जिल्ह्यातली मृतांची संख्या सात झाली असून तर एकूण रुग्ण संख्या बहात्तर झाली आहे.
****
भारतीय रिझर्व बँकेनं रेपो दरात चाळीस शतांश टक्यांनी कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर चार पूर्णांक चार टक्क्यांवरून चार टक्के झाला आहे, तर रिवर्स रेपेा दर तीन पूर्णांक ३५ शतांश टक्के झाला आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यामुळे कर्जांवरील व्याजदर कमी होणं अपेक्षित असून, मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांमध्ये कर्जाचे हप्ते भरण्यात सूट देण्यात आली आहे. २०२०-२१ चा जीडीपी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर शून्याखाली जाण्याचा अंदाजही दास यांनी व्यक्त केला आहे.
****


No comments: