Friday, 22 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 22 MAY 2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 May 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
जालना जिल्ह्यात आज सकाळी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले आहे. बाधितांमध्ये जुना जालना परिसरातल्या दवाखान्यातील तीन परिचारिका, एक पुरुष कर्मचारी तर मंठा चौफुली इथल्या खासगी रुग्णालयातली एक महिला कर्मचारी, मालेगाव बंदोबस्तावरुन आलेला सुरक्षा दलाचा एक सैनिक आणि मंठा तालुक्यातला पेवा इथल्या एका पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कारोना बाधितांची संख्या एक्कावन्न झाली असून आतापर्यंत अकरा रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.
****
औंरगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आणखीन सव्वीस कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या एक हजार दोनशे बारा इतकी झाली आहे. आतापर्यंत ५५७ रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधार झाल्यानं, रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे
****
सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्यात एका अठ्ठावन्न वर्षाच्या कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेह आणि श्वसन संस्थेचा आजार असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितलं. दरम्यान, एका चौसष्ट वर्षाच्या महिलेचा आणि दोन महिन्याच्या बाळाचाही श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मृत्यू झाला आहे. संशयित रुग्ण म्हणून या दोघांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.
****
कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करावेत, शेतकरी-बारा बलुतेदार तसंच असंघटीत कामगारांसाठी राज्य सरकारनं ५० हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं, अशी मागणी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माझं अंगण माझं रणांगण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेलया टाळेबंदीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारकडून कोणत्याही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत काहीही मदत नाही, कापूस खरेदी फक्त सीसीआय अर्थात भारतीय कापूस परिषदेकडूनच सुरू आहे, राज्य सरकारी यंत्रणा कापूस खरेदी करत नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापूर इथं आंदोलन झालं, कोरोना विषाणू प्रादुर्भावावरच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सर्व यंत्रणांशी समन्वय साधणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी सांगितलं.पोलिसांवरचे हल्ले थांबायला हवेत, असंही पाटील यांनी यावेळी नमूद केलं.

औरंगाबाद इथं खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सरकारने या आंदोलनाची दखल घेत, सर्वसामान्यांसाठी पॅकेज जाहीर न केल्यास, या पुढचं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सावे यांनी दिला.

परभणी इथं आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला.

नांदेड इथं भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य चैतन्यबापू देशमुख यांनी तर अर्धापूर इथं विधीज्ञ किशोर देशमुख आणि इतरांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

लातूर जिल्ह्यातही भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेउन आंदोलनात सहभाग नोंदवला. लातूरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी काळे मास्क, काळी पट्टी बांधून, हातात काळे रिबीन दाखवून निषेध व्यक्त केला. भाजपचे शहर अध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी उपमहापौर देवीदास काळे, शैलेश लाहोटी यांनी दंडाला काळ्या पट्‌या बांधल्या होत्या. अनेक कार्यकर्त्यानी त्यांच्या घरासमोरच हातात फलक घेउन आंदोलन केलं. 

धुळे शहरात काळे झेंडे, फलक दाखवत भाजप खासदार डॉक्टर सुभाष भामरे, यांच्यासह अनेकांनी आंदोलन केलं.
****
टाळेबंदीमुळे औरंगाबाद इथं अडकून पडलेल्या बिहार राज्यातल्या सुमारे सोळाशे कामगारांना घेऊन, एक विशेष श्रमिक रेल्वे आज सकाळी बिहारमधल्या अररियाकडे रवाना झाली. उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी ही माहिती दिली. उद्या सकाळी आणखी एक रेल्वे बिहारमधल्या मुझफ्फरपूरकडे रवाना होणार आहे
****
प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तींवरची बंदी एका वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट संदेशातून ही माहिती दिली आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी पुढच्या वर्षापासून होणार आहे.
****


No comments: