Saturday, 16 May 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.05.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 May 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मे २०२० सायंकाळी ६.००

****

·      सामाजिक पायाभूत आराखड्यांसाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद - अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची माहिती.

·      औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या नऊशे.

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील `इनक्यूबेशन सेंटर`साठी दहा कोटी रुपयांचा निधी.

आणि

·      स्थलांतरित कामगारांना परत पाठवण्यात केंद्र आणि राज्य सरकार अयशस्वी - पृथ्वीराज चव्हाण यांची टीका.

****

देशाला स्वावलंबी बनवण्याकडे वाटचाल सुरु असून सामाजिक पायाभूत आराखड्यांसाठी ८ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे. त्या आज पत्रकार परिषदेत बोलत होत्या. देशातल्या आठ क्षेत्रांमध्ये मोठे बदल करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यामधे हवाई क्षेत्र, संरक्षण, उद्योग, खनिज, वीज वितरण आदी क्षेत्रांचा समावेश आहे. देशात रोजगार निर्मितीसाठी ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचं सांगून हवाई वाहतूक क्षेत्रात मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. विमान देखभाल आणि दुरुस्तीची कामं आता देशातच केली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सुधारणा, कामगिरी आणि रुपांतर या त्रिसुत्रीनुसार काम करण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री सितारामण यांनी यावेळी नमुद केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या नऊशे झाली आहे. आज दिवसभरात ५८ नवे रुग्ण आढळले असून यात ३३ पुरुष आणि २५ महिलांचा समावेश आहे. यामधे बायजीपुरा इथले दहा, सादात नगर आणि हुसेन कॉलनी प्रत्येकी चार, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय, राम नगर, संजय नगर मधली गल्ली क्रमांक सहा इथले प्रत्येकी तीन, मकसूद कॉलनी आणि एन आठ सिडकोमधल्या अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी इथले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. हनुमान चौक चिकलठाणा, जालान नगर, एमआयडीसी, किराडपुरा, बजाज नगर, जिन्सी - रामनासपुरा, जुन्या मोंढ्यातील भवानी नगर, गल्ली क्रमांक पाच, जहागीरदार कॉलनी, आदर्श कॉलनी, रोशन गेट, कैलास नगर, चाऊस कॉलनी, जाधववाडी, न्यू बायजीपुरा गल्ली क्रमांक तीन, सिडको एन सहा मधील संभाजी कॉलनी, कटकट गेट, लेबर कॉलनी, जटवाडा, राहुल नगर आणि जलाल कॉलनी इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. अन्य भागातही आज सात नवे रुग्ण आढल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. औरंगाबादमधे कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत २५ जणांना प्राण गमवावे लागले असल्याची माहितीही प्रशासनानं दिली आहे. 

****

कोरोना विषाणूमुळे मालदिवमधे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाच्या ‘ऑपरेशन समुद्रसेतू’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. नौदलाचं  ‘आय एन एस जलाश्व’ हे जहाज ५८८ भारतीयांना घेऊन आज सकाळी माले बंदरावरुन कोचीकडे निघालं असल्याची माहिती, नौदल पश्चिम विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात २१ बालकं आणि सहा गर्भवती महिलांचा समावेश आहे. माले बंदरात सर्व प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जमनालाल बजाज इनक्यूबेशन सेंटरची ‘अटल इन्क्यूबूशन सेंटर’साठी निवड केली असून या करता दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विद्यापीठाच्या जनसंपर्क कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. मराठवाड्यातील तरुणांमधे मोठी क्षमता आणि गुणवत्ता असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य गरजेचं असल्यानं या केंद्राच्या माध्यमातून त्यांच्यातील नवोन्मेषश आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करणं शक्य होईल, अशी प्रतिक्रीया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी या संदर्भात दिली आहे. कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण होणार असले तरी अशा प्रकारच्या ‘स्टार्टअप’ उद्योगांतून तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं कुलगुरु डॉ.येवले यांनी म्हटलं आहे.

****

यवतमाळ इथं वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कोरोना विषाणूच्या ४५ रुग्णांपैकी ३८ जण १४ दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. यापैकी ३ जणांना संस्थात्मक विलागीकरण कक्षात ठेवण्यात येणार असून उर्वरित ३५ जण त्यांच्या घरातच विलागिकरणात राहणार आहेत. आता रुग्णालयात सात रुग्ण उपचार घेत आहेत. अमरावती जिल्ह्यात ९८ जणांना कोरोना विषाणुची लागण झाली होती, यापैकी तब्बल ९१ जणांना बरे करण्यात आरोग्य विभागाला यश आलं असल्यानं पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाचं अभिनंदन केलं आहे.

****

केंद्र आणि राज्य सरकार स्थलांतरित कामगारांना परत पाठवण्याबाबत आपली जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरत असल्याचं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबद्दल केलेल्या घोषणांबद्दलही त्यांनी आज एका संगणकीकृत पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली आहे. कामगारांना या पद्धतीनं वागवून केंद्र आणि राज्य सरकारनं मोठी चूक केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातील स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवणं ही आपली मानवी जबाबदारी होती आणि त्यात आपण पूर्णपणे कमी पडल्याची टीका त्यांनी केली आहे. या कामगारांना घरी पोचवण्याची व्यवस्था करण्यासाठी पैसा खर्च व्हायला हवा होता, असं मतं त्यांनी नोंदवलं. देशाला जागतिक वित्तीय संस्थांकडून मदत प्राप्त होत असल्यामुळे हा निधी आरोग्य क्षेत्र बळकट करण्यावर खर्च व्हावा, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात कोरोना विषाणुची लागण झालेले तीन रुग्ण आढळल्यानं नजिकच्या बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातली सात किलोमीटर पर्यंतची गावं बंद करण्यात आली आहेत. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज या संदर्भातील आदेश दिले आहेत. या आदेशानुसार सोनेसांगवी, मांगवडगांव, माळेगांव, लाखा, भोपळा, हादगाव, सुर्डी आणि बोरगांव ही सर्व गावं अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

औरंगाबाद शहरातला कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनानं शहरातील सर्वच प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध घालावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भातील निवेदन आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिलं. प्रतिबंधित भागात असणारी स्वस्त धान्य दुकानं बंद करावीत असंही त्यांनी म्हटलं आहे. या दुकानांमुळे अन्य भागांमधे लागण होऊ शकणार असल्यानं ही कारवाई करावी तसंच प्रतिबंधित भागांतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करावा असं त्यांनी सुचवलं आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही सेवेवर पाठवू नये, असंही आमदार चव्हाण यांनी विभागीय आयुक्तांना केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर इथं टाळेबंदीमुळे अडकलेल्या मध्यप्रदेशच्या ४७ आणि छत्तीसगडच्या २२ मजूरांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसनं राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आलं आहे. वैजापूर इथं या मजूरांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना आज रवाना करण्यात आल्याचं तहसिलदार महेंद्र गिरगे यांनी म्हटलं आहे.  

****

औरंगाबाद रेल्वे स्थानकाहून उत्तर प्रदशेच्या लखनौसाठी विशेष श्रमिक रेल्वे आज रात्री आठ वाजता रवाना होणार आहे. या रेल्वेमधे औरंगाबाद, बीड आणि परभणी इथं टाळेबंदीत अडकलेले सुमारे एक हजार सहाशे मजूर प्रवास करणार असल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं आहे.

****

वाशिम जिल्ह्यातल्या कोरोना विषाणूच्या एका रुग्णाला आज बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उत्तर प्रदेश मधील ट्रक चालक असलेल्या या रुग्णाचा साथीदार गेल्या दोन मे रोजी कोरोना विषाणूच्या संसर्गानं मरण पावला होता. याआधी मेडशी इथला या विषाणूचा पहिला रुग्ण गेल्या चोवीस एप्रिल रोजी बरा झाला आहे. वाशीम जिल्ह्यात सध्या मुंबईहून गावी परत आलेली एक महिला कोरोना विषाणूची रुग्ण आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं आज दुपारी अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह जवळपास अर्धा तास पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जालना शहरात आजपासून सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत परवानाधारकांना घरपोच मद्यविक्री सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर फलक लावून त्यावर मागणी नोंदवण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

****

नांदेड शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील एका मद्यविक्री दुकान आज मोठी गर्दी झाल्यानंतर बंद करण्यात आलं. आजच सुरू करण्यात आलेल्या या दुकानावर ग्राहकांची गर्दी झाल्यानं, एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याची दखल घेऊन, हे दुकान बंद करण्याचा ऩिर्णय घेतला.

****

अमरावती इथं आज कोरोना विषाणूचे नवे पाच रुग्ण आढळले असल्यानं या रुग्णांची संख्या ९९ झाली आहे. यापैकी तेरा जणांचा मृत्यू झाला आहे तर चोवीस रुग्ण अमरावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. एका रुग्णाला नागपूरला हलविण्यात आले आहे तर ५६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

****

No comments: