Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 June
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जून २०२०
सायंकाळी ६.००
****
Ø
कोविडग्रस्त बरे होण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी आवश्यक
बाबींची वेळेत पूर्तता करा - पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांना सूचना
Ø
कोविडग्रस्तांवर उपचारासाठी राज्य सरकारची केंद्राकडे
औषधांच्या पुरेशा साठ्यासह पाचशे व्हँटिलेटरची मागणी
Ø
औरंगाबाद जिल्ह्यात आज ९७ नवे रुग्ण तर जालना जिल्ह्यात
दिवसभरात सहा रुग्णांची वाढ
आणि
Ø
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानापोटी वाढीव
मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
****
कोविडग्रस्त बरे होण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी आवश्यक
बाबींची वेळेत पूर्तता करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोरोना
विषाणू संसर्ग प्रतिबंधासंदर्भात देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीमार्फत
चर्चेदरम्यान, ते आज बोलत होते. महाराष्ट्रासह १५ राज्यांचे मुख्यमंत्री या चर्चेत
सहभागी झाले. सरकारने योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे कोविड प्रादुर्भावाचा परिणाम
कमी करण्यात यशस्वी झाल्याचं, पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. कोविड चाचणी केंद्रांची
संख्या वाढवणं तसंच अधिकाधिक नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी टेलीमेडिसीन सुविधेसाठीचा
पायाभूत आराखडा विकसित करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर परिस्थिती पूर्ववत
करण्यासाठी अशासकीय संघटना आणि खासगी क्षेत्रासह सर्व संघटनांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचं
आवाहन पंतप्रधानांनी केलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा शुक्रवारी
दूर दृश्य संवाद प्रणालीद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध पक्षांचे
राष्ट्रीय अध्यक्ष भाग घेणार असून पंतप्रधान यावेळी भारत-चीन सीमेच्या परिस्थितीविषयी
सविस्तर चर्चा करणार आहेत.
****
लद्दाखच्या गलवान खोऱ्यात काल हुतात्मा झालेल्या
सैनिकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. देशाच्या
सीमेचं रक्षण करताना दिलेल्या सर्वोच्च बलिदानासाठी देश सदैव त्यांचा ऋणी राहील, असं
गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. चीनसोबतच्या या झटापटीत जखमी झालेल्या सैनिकांच्या प्रकृतीत
लवकर सुधारणा व्हावी, असंही शहा यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, चिनी सैन्यानं भारतीय हद्दीत प्रवेश कसा
केला, आणि चिनी सैन्याच्या हल्ल्यात वीस भारतीय सैनिक कसे काय मारले गेले, याबाबत पंतप्रधानांनी
देशाला माहिती द्यावी, असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. चीनने
भारताचा किती भाग ताब्यात घेतला आहे, आणि आता केंद्र सरकारचं याबाबत काय धोरण आहे,
अशी विचारणाही गांधी यांनी केली आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण देश शत्रूशी
मुकाबला करण्यासाठी एकजूट होईल, तसंच काँग्रेस पक्ष या परिस्थितीत सरकार, भारतीय सैन्य,
सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं गांधी यांनी नमूद केलं आहे.
****
कोविडग्रस्तांवर उपचारासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे
औषधांच्या पुरेशा साठ्यासह पाचशे व्हँटिलेटरची मागणी केली आहे. आरोग्य मंत्री राजेश
टोपे यांनी पीटीआयला ही माहिती दिली. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद - आयसीएमआरच्या
सल्ल्याने राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांना दिलं जाणाऱ्या औषधाची राज्यात तातडीनं
आवश्यकता असल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, ठाणे इथं एक हजार २४ रुग्णखाटांच्या कोविड
सुश्रुषा केंद्राचं ई लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी राज्यात टास्कफोर्सची निर्मिती करण्यात आली
असल्याचं, त्यांनी सांगितलं
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज ९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
वाढ झाली आहे. आज सकाळी ९६ आणि दुपारी शहरातल्या गौतमी अपार्टमेंट मधल्या एका ७८ वर्षीय
पुरुष रुग्णाचा समावेश असल्याचं प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. आज आढळलेल्या
रुग्णांमध्ये ३९ स्त्री आणि ५८ पुरूष आहेत. त्यामुळे आता कोरोना विषाणू बाधितांची संख्या
तीन हजार २९ झाली आहे. यापैकी एक हजार ६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून
१६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता एक हजार २०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज आणखी सहा कोरोना विषाणू बाधित
रुग्ण सापडले आहेत. तसंच जालना तालूक्यातल्या जामवाडी इथल्या एका साठ वर्षाच्या व्यक्तीचा
कोरोना विषाणूमुळे आज मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या नऊ
झाली असून तर कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या तीनशे पंधरा झाली.
****
नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळला नाही. आज तेरा रूग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले, यापैकी कोणालाही या विषाणूची
लागण झालेली नाही. त्यामुळे आजचा दिवस नांदेड जिल्ह्यास दिलासा देणारा ठरला. जिल्ह्यात
आतापर्यंत २८६ कोरोनाविषाणू बाधीत रूग्ण सापडले, यापैकी १८० रूग्ण बरे झाले आहेत तर
सध्या ९३ रुग्ण उपचार घेत आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यात आज नवीन
सात रुग्ण, भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात पाच, तर सोलापूर जिल्ह्यातल्या
ग्रामीण भागात आज नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
धुळे जिल्ह्यात
एकतीस कोरोना विषाणू बाधित रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचं,
आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
*****
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे
करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या
मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली
आहे. मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे या नुकसानाबाबत आढावा बैठक घेतली,
त्यावेळी ते बोलत होते. कोकणातल्या नुकसानग्रस्त फळबागा वाचवण्यासाठी निश्चित धोरण
लवकरच आखण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नुकसानग्रस्तांना आणखी वाढीव निधी
तत्काळ वितरित करण्यात येईल, हा निधी योग्य त्या नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी
प्रशासन तसंच लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी यावेळी दिले.
****
भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा परिषद - आयसीएसईने
दहावी तसंच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित परीक्षेच्या गुणांकनाबाबत पर्यायी
आराखडा सादर करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. परिषदेनं याबाबत
न्यायालयात दाखल याचिकेवर उत्तर देताना, ज्या विद्यार्थ्यांना प्रलंबित परीक्षा द्यायची
नसेल, त्यांना पूर्व परीक्षेच्या आधारावर गुणांकन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र
या प्रस्तावामुळे मुले कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पत्करून परीक्षा देण्याचा पर्याय
निवडतील, अशी भीती पालकांच्या वकिलांनी व्यक्त केली. त्यामुळे परीक्षा सरसकट रद्द करण्याचा
निर्णय घ्यावा, अशी मागणी वकिलांनी केली आहे. त्यावर न्यायालयानं परिषदेला इतर पर्याय
देण्यास सांगितलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातल्या गणोरी
इथं शेतकरी क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं बांधावर खत मिळावं या मागणीसाठी आज आंदोलन
करण्यात आलं. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी फसव्या घोषणा करून दिशाभूल करत असल्याचा आरोप
मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे घेणं कठीण
झालं असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा, राज्यभर
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं यावेळी देण्यात आला.
****
परभणी जिल्ह्यात खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून
चढ्याभावाने होणारी विक्री थांबवावी, अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची
आर्थिक लूट थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीनं पाथरीच्या तहसीलदारांना
दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
****
हिंगोली पोलीस दलाच्या वाहतूक शाखेतर्फे टाळेबंदीच्या
काळात रुग्णांना इस्पितळात ने-आण करण्यासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात आली
होती. दोन मे ते पंधरा जून या काळात सहाशे ऐंशी रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. पोलिसांच्या सुविधेबद्दल हिंगोलीतील नागरिकांनी त्यांचे आभार
मानले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अरुणा भुमकर या महिलेने
टाळेबंदीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पिठाची गिरणी, तांदूळ निर्मिती, तिखट,
पापड, शेवया निर्मिती हा उद्योग सुरू केला, शिवाय गावातल्या दहा महिलांना देखिल विविध
उद्योगांमध्ये रोजगार मिळवून देण्याचं काम केलं. अरूणा भूमकर यांची जिद्द पाहून कृषी
विभागानं उन्नत शेती समृद्ध शेतकरी या योजनेतून कडधान्यापासून दाळ निर्मिती करण्याचं
यंत्र अनुदान तत्वावर उपलब्ध करून दिले.
****
गलवान खोऱ्यात चिनी सैन्याचा हल्ल्यात निषेध करण्यासाठी
आज धुळे जिल्ह्यात भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे चीनचा ध्वज जाळण्यात आला. काल लडाखमध्ये
भारत आणि चीनच्या सिमारेषेवर दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या
एका कर्नलसह २० जवान शहीद
झाले.
*****
No comments:
Post a Comment