Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
**
औरंगाबाद जिल्ह्यात पाच तर नांदेड इथं आज सहा कोविड बाधितांचा मृत्यू
**
कोविडग्रस्तांवर उपचारासाठी बीसीजी लसीच्या उपयुक्ततेची चाचणी मुंबईत सुरू
**
बाजार समिती नियमन मुक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यात बाजार समित्यांमध्ये आज संप
आणि
**
काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या नगरपालिकांना विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याचा
आमदार कैलास गोरंट्याल यांचा आरोप
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज पाच कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातल्या चिकलठाणा
इथल्या ७० वर्षीय, हर्षनगर इथल्या ४२ वर्षीय महिला रुग्णांचा आणि मुयर नगर हर्सुल इथल्या
४८ वर्षीय तसंच चिकलठाणा इथल्या चौधरी कॉलनीतल्या ६० वर्षीय, गंगापूर इथल्या ७० वर्षीय
पुरुष रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मृतांची संख्या आता ६२२ झाली आहे. दरम्यान,
आज औरंगाबाद जिल्ह्यात ११७ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना
विषाणू बाधितांची संख्या आता १९ हजार ८५१ झाली असून १४ हजार ९२७ रुग्ण बरे झाले. तर
सध्या चार हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात आज ६ कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला, तर नवे १५१ रुग्ण आढळले. ४४ रुग्णांची
प्रकृती सुधारल्यानं त्यांना आज सुटी देण्यात आली. सध्या जिल्ह्यात १ हजार ७७१ रुग्ण
उपचार घेत आहेत.
****
सोलापूर
जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने रॅपिड अँटिजेन चाचण्यांऐवजी
प्रयोगशाळेतील चाचण्यांवर भर दिला जाणार आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या
अँटीबॉडीज चाचण्या करण्यासाठी किटची मागणी नोंदवल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली. यात पहिल्या टप्प्यात २५ हजार आणि नंतर
दहा हजार किट पुरवण्याबाबत संबंधीत कंपनीला सूचित केल्याचंही त्यांनी सांगीतलं.
****
कोविडग्रस्तांवर
उपचारासाठी बीसीजी लसीच्या उपयुक्ततेची चाचणी मुंबईत सुरू करण्यात आली आहे. लहान बालकांचं
क्षय रोगापासून रक्षण करणारी बीसीजी लस श्वसन विकारांपासूनही रक्षण करत असल्याचं आढळून
आलं आहे. ही लस कोविडच्या रुग्णांसाठी, विशेषत: वृद्धांसाठी उपयुक्त ठरते का, याची
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था - आयसीएमआरने चाचणी सुरू केली आहे. मुंबईत केईएम
रुग्णालय आणि महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या बाबत अभ्यास करणार असून याला योग्य
ती परवानगी मिळाली असल्याचं महापालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
जैन
धर्मियांच्या पर्युषण पर्वा दरम्यान मुंबईत जैन मंदिरं उघडून प्रार्थना करण्यास सर्वोच्च
न्यायालयानं परवानगी दिली आहे. मुंबई व्यतिरिक्त इतर कुठेही मंदिरं उघडण्यास परवानगी
देण्यात आलेली नाही. दादर, भायखळा आणि चेंबूर इथल्या मंदिरात जैन भाविक पर्युषण पर्वात
प्रार्थना करू शकणार आहेत.
****
उद्यापासून
सुरू होत असलेला गणेशोत्सव, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साधेपणाने साजरा करण्याचं
आवाहन राज्य सरकारनं सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना केलं आहे. यंदा आगमन आणि विसर्जनाच्या
मिरवणुकींना मज्जाव करण्यात आला असून, मंडपांमधे गर्दी न होऊ देण्याच्या सूचना देखील
मंडळांना करण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी कृत्रीम तलावांमधे विसर्जन करण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे.
****
निवृत्त
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या आचरणाच्या चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं
फेटाळून लावली आहे. गोगोई से सेवानिवृत्त झालेले असल्यानं, या मागणीत आता काही तथ्य
राहिलं नसल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. गोगोई सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असताना
ही मागणी का केली नाही, असं न्यायालयानं याचिकाकर्त्याला विचारलं आहे. गेल्या १७ नोव्हेंबरला
सेवानिवृत्त झालेले रंजन गोगोई, आता राज्यसभेचे सदस्य आहेत.
****
यंदा
खरीपाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा देशभरात खरीपाच्या क्षेत्रात
गेल्या वर्षीच्या तुलनेत साडे आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धानाचं क्षेत्र १२ टक्के
तर तेलबियांच्या क्षेत्रात १४ टक्के वाढ झाली आहे. यंदा पाऊसही सरासरीच्या ६ टक्के
अधिक होण्याचा अंदाज आहे. यामुळे खरीपाचं उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
****
केंद्र
सरकारच्या बाजार समिती नियमन मुक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या २५ हून अधिक बाजार
समित्यांमध्ये आज बंद पाळण्यात आला. केंद्र सरकाच्या या निर्णयामुळे बाजार समित्यांचा
उत्पन्नाचा स्त्रोत बंद होणार असून, कर्मचाऱ्यांचं वेतन आदी समस्या निर्माण होणार आहेत.
त्यामुळे केंद्रानं या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी बाजार समिती संचालकांनी
केली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे काम बंद तसंच
लाक्षणिक उपोषण आंदोलन केलं. परभणी इथं या संपास मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती बाजार
समितीचे सचिव संजय तळणीकर यांनी दिली. नाशिक, यवतमाळ बाजार समित्यांमधले व्यवहारही
आज ठप्प असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
कोल्हापूर
जिल्ह्यात आज पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक
९५ मिलिमीटर पाऊस झाल्यानं राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून सहा
हजार घनफुट प्रती सेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.दरम्यान, पंचगंगा नदीची
पाणी पातळी चाळीस फुटावर स्थिर असुन जिल्ह्यातल्या सर्व नद्यांना पूर आले आहेत. पूर
परिस्थिती नियंत्रणाखाली असून पूरग्रस्त भागातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने गेल्या
आठवड्यातच सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्यातल्या भामरागडला पर्लकोटा नदीच्या पुराने वेढा दिल्यानं दोनशे घरं पाण्याखाली
गेली आहेत. गावात पुराचे पाणी शिरण्याची ही या आठवड्यातली ही दुसरी वेळ आहे. परिसरातील
अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गोसेखुर्द धरणातून सहा हजार ७७६ घनफूट प्रती सेकंद
या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
नाशिक
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातलं गंगापूर धरण ९० टक्के तर दारणा धरण
९९ टक्के भरलं आहे. सध्या दारणा धरणातून सुमारे साडे १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं
तर नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १२ हजार ३९३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात
आहे. या धरणातून होणारी आवक वाढल्यानं, जायकवाडी धरणातला पाणीसाठा ७२ पूर्णांक ४६ शतांश
टक्के झाला आहे. सिद्धेश्वर तसंच येलदरी धरण पूर्ण भरलं असून माजलगाव धरणात ७१ पूर्णांक
७० शतांश टक्के पाणी साठा झाला आहे. विष्णुपुरी ८० टक्के, तर निम्न दुधना प्रकल्पात
५८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
****
काँग्रेस
पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना नगरविकास खात्याकडून विकास कामांसाठी निधी
दिला जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.
ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस आमदारांच्या ताब्यात असलेल्या राज्यातल्या
अकरा नगरपालिकांसोबत हा प्रकार घडला असून याबाबत आपण पक्षश्रेष्ठींसह, मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं
गोरंट्याल यांनी सांगितलं.
****
उस्मानाबादचे
जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडून
पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी
डॉ.संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनुपम
शेगुलवार आदी कर्मचारी उपस्थित होते.
****
परभणी
जिल्ह्यात गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथकासह
बॉम्बशोधक,नाशक आणि श्वान पथकाकडून आज शहरात जनजागृती मोहीम राबवली. जिल्हा पोलिस अधीक्षक
कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्ष आणि बॉम्ब शोधक-नाशक
पथकाने गणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क केलं.
****
बुलडाणा
जिल्ह्यात गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना
३२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. ही रक्कम जिल्ह्यातल्या ९० मंडळातल्या
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने
दिली आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांपैकी ३३ हजार ८९८ शेतकऱ्यांनी २५ हजार
२४८ हेक्टरवरच्या कापूस पिकाचा विमा उतरवला होता.
****
विधान सभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडारा जिल्हा
सामान्य रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन परिस्थिती
जाणून घेतली. कोविड संदर्भात भंडारा जिल्ह्याचं
आतापर्यंचं काम समाधानकारक असले तरी कोरोनाची साथ आणि मृत्यू रोखण्यासाठी पुढील महिना
महत्वाचा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात
झालेल्या बैठकीत कोविड स्थिती जाणून घेतली. भंडारामध्ये आरटी-पीसीआर सुविधा नाहीत आणि
त्यासाठी एएसएपी करणे आवश्यक असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment