Tuesday, 25 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25 AUGUST 2020 TIME – 07.10 AM

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 August 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

****

** वार्षिक ४० लाख रुपयांची उलाढाल असलेल्या व्यवसायांना वस्तु आणि सेवा करातून सूट देण्याचा केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा निर्णय

** नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहणार

** ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांचा न्यायालय अवमानना प्रकरणात माफी मागण्यास नकार

** राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी खाजगी वाहनांना ई-पास बंधनकारक - राज्य सरकारकडून स्पष्टीकरण

** रायगड जिल्ह्यात महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी १६ हून अधिक रहिवाशी अडकल्याची भिती 

** राज्यात ११ हजार १५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण तर २१२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

** आणि

** मराठवाड्यात ३६ बाधित रुग्णांचा मृत्यू तर ९५७ नवे रुग्ण

****

वार्षिक ४० लाख रुपयांची उलाढाल असलेल्या व्यवसायांना वस्तु आणि सेवा करातून सूट देण्याचा निर्णय वित्त मंत्रालयानं काल जाहीर केला आहे. सुरूवातीला ही मर्यादा वीस लाख रुपये होती. तर दिड कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यवसायांना केवळ एक टक्के कर भरावा लागत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर सुरू झाल्यानंतर अनेक वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आले आहेत. आजच्या स्थितीत २८ टक्के कर केवळ चैनीच्या वस्तूंपुरता मर्यादित आहे. गेल्या दोन वर्षात करदात्यांच्या संख्येत १०० टक्के वाढ झाली आहे. वस्तू आणि सेवा कराच्या प्रारंभी करदात्यांची संख्या ६५ लाखांच्या घरात होती ती आता १ कोटी २४ लाखांपेक्षा जास्त आहे.

****

नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहणार आहेत. नवी दिल्लीत काल झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षात आवश्यक ते बदल करून पक्षाचं बळकटीकरण करण्याचे अधिकार त्यांना यावेळी देण्यात आले. बैठकीनंतर महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी वार्ताहरांनी ही माहिती दिली. पक्ष मजबूत करण्यासाठी सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय सर्व सहमतीनं झाला असल्याचं वेणूगोपाल यांनी सांगितलं. पक्षाचे अंतर्गत मुद्दे हे फक्त पक्षाच्या बैठकीतच उपस्थित करावेत त्याबाबत पक्षांच्या बैठकीत चर्चा व्हावी, प्रसार माध्यमांमध्ये त्याची चर्चा होऊ नये याबाबत सर्व नेत्यांनी काळची घ्यावी असा सल्ला कार्यकारिणीनं सर्व नेत्यांना दिला असल्याचं वेणूगोपाल म्हणाले.

दरम्यान, सात तास चाललेल्या या बैठकीत हंगामी अध्यक्ष पदावरून आपल्याला मुक्त करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीकडे केली. पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करावी, असं सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीला सांगितलं. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, शशी थरुर तसंच मुकूल वासनिक आणि अन्य नेत्यांनी पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्ष असावा, संघटनेच्या विविध पातळीवरील निवडणुका, सत्तेचं विकेंद्रीकरण, प्रदेश कार्यकारिणींचं सबलीकरण व्हावं, अशा मागण्या करणारं पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलं होतं. या पत्राचे पडसाद कालच्या बैठकीत उमटले.

****

ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी न्यायालय अवमानना प्रकरणात माफी मागण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत प्रशांत भूषण यांनी आपलं उत्तर दाखल केलं आहे. न्यायालयाची माफी मागितल्याने, आपल्या विवेकाचा अवमान होईल, असं त्यांनी या उत्तरात म्हटलं आहे. आपल्या दोन ट्विट मुळे प्रशांत भूषण हे न्यायालय अवमानना प्रकरणात दोषी ठरले आहेत.

****

सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालवधीत ज्यांच्या वाहन परवान्याची आणि अन्य वाहन विषयक कागदपत्रांची मुदत संपत असेल त्यांच्या या वाहन परवान्यांना आणि कागदपत्रांना आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे. यापुर्वीच्या निर्णयानुसार या कागदपत्रांना २० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र देशभरातला कोरोना विषाणू प्रादुर्भाव अद्यापपर्यंत पुर्णपणे आटोक्यात आलेला नसून शासकीय कार्यालयं पुर्ण क्षमतेनं सुरू झाली नसल्यानं या कागदपत्रांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार १ फेब्रुवारी २०२० पासून ३१ डिसेंबरपर्यंत ज्या वाहन परवान्यांची आणि अन्य वाहन कागदपत्रांची मुदत संपत असेल त्या सर्वांची मुदत ३१ डिसेंबर रोजीच संपणार आहे, असं गृहीत धरुन कार्यवाही केली जाईल.

****

जूनपासून ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू झालं असलं तरी इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात संपूर्ण टाळेबंदी उठवण्याची घाई करणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल ठाण्यात बोलत होते. आपण ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेतली असून शहरी भाग आणि ग्रामीण भागात महत्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. मात्र, एखादी गोष्ट सुरु करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असंही  मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी खाजगी वाहनांना ई-पास बंधनकारक राहणार आहे, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत जारी असलेली नियमावली पुढील सूचना जाहीर होईपर्यंत कायम असेल, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे. केंद्रसरकारनं राज्यांतर्गत वाहतुकीवरील निर्बंध हटवले आहेत. तरीही राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. त्यामुळे यापुढेही राज्यात खाजगी वाहनांमधून प्रवास करताना ई-पास बंधनकारक असेल.

****

कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध विद्या शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांच्या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. जगभरात जिथं शाळा, महाविद्यालयं  सुरू करण्यात आली, तिथे मोठ्या प्रमाणात करोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहेत याकडे आदित्य ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे. 

****

कोविड संसर्गानं झालेल्या मृत्यूपोटी बाधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी एकसमान धोरणाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण तसंच न्यायमूर्ती आर एस रेड्डी यांच्या पीठानं, ही याचिका फेटाळताना, या प्रकरणी प्रत्येक राज्य सरकारचं स्वतंत्र धोरण आहे, आणि राज्य सरकार आपल्या आर्थिक स्थितीनुसार ही मदत देत असल्याचं सांगितलं. देशभरात हजारो लोक या संसर्गामुळे मरण पावले, मात्र त्यांना मिळणारी आर्थिक मदत  एकसमान नसल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे.

****

औरंगाबाद, जालना, जळगाव, सोलापूर आणि अकोला या पाच जिल्ह्यात टेलिआयसीयू योजना राबवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल जालना इथं दिली. जालना इथं कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर टोपे पत्रकारांशी बोलत होते. भिवंडी इथं टेलिआयसीयूचा प्रयोग यशस्वीपणे राबवला असून, आता हा प्रयोग या पाच जिल्ह्यात केला जाणार आहे. ज्याठिकाणी तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात तिथे तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ही संकल्पना रावबली जाणार आहे. यानंतर सर्व जिल्ह्यात हा प्रयोग करायचा असून, त्यामुळे मृत्यूदर कमी होईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.

*****

कोविड संसर्गामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार मोफत स्मार्ट फोन वाटणार असल्याचं वृत्त निराधार आहे. अशी कोणतीही योजना नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमांवरून अशा प्रकारची माहिती प्रसारित केली जात आहे, अशा भ्रामक बातम्यांपासून सावध राहण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग असेल.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयच्या पथकानं सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याची काल सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली. दरम्यान, सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती किंवा तिच्या कुटुंबियांना अद्याप सीबीआयकडून कोणतंही समन्स मिळालेलं नाही, असं तिच्या वकिलांनी सांगितलं आहे. रियाला सीबीआयकडून बोलावणं येईल, त्यावेळी ती चौकशीसाठी हजर होईल, असंही तिच्या वकिलांनी म्हटलं आहे.

****

अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे गेला, हे एक प्रकारे योग्यचं झाल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं कोविड स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. नाशिक जिल्ह्यात मिशन झिरो अंर्तगत कोविड रुग्णांचा शोध घेतला जात असल्यानं रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र जिल्ह्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देशात अधिक आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पश्चिम वाहिन्या नद्यांचं पाणी नाशिक जिल्ह्यात वळवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तीन पक्षांचं सरकार असून निधीच्या मागणीवरून नाराज असलेल्यांशी चर्चा करु असं सांगत, सरकार मजबूत असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.

****

रायगड जिल्ह्यात महाडमधील काजळीपुरा भागात अचानक कोसळलेल्या पाच मजली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी १६ हून अधिक जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

काल सायंकाळी ही दुर्घटना घडली. या इमारतीत जवळपास ५० कुटुंबं राहत होती. दुर्घटनास्थळी रात्रीच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक दाखल झालं असून त्यांनी बचाव कार्य सुरू केलं.

दरम्यान पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळास भेट दिली असून इमारतीचे बिल्डर आणि आर्किटेक तसेच ज्यांनी इमारतीस परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सांगितलं.

****

राज्यात काल ११ हजार १५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर २१२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे राज्यातली एकूण बाधितांची संख्या  ६ लाख ९३ हजार ३९८ एवढी झाली आहे. यापैकी ५ लाख २ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण १ लाख ६८ हजार १२६ रुग्ण उपचार घेत आहेत.

****

मराठवाड्यात काल ३६ रुग्णांचा मृत्यू झाला तर ९५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यात काल सात बाधितांचा मृत्यू झाला तर १२८ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद, लातूर आणि जालना जिल्ह्यात काल प्रत्येकी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. उस्मानाबादमध्ये १२८, लातूरमध्ये ११५ तर जालन्यात १० नवीन बाधित रुग्ण आढळून आले. नांदेड जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू झाला  तर ११८ नवीन रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात काल चार कोविड बाधितांचा मृत्यू झाला ३४४ नवे रुग्ण आढळले.

परभणी जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यात ७८ नवे रुग्ण आढळून आले. हिंगोली जिल्ह्यातही ३६ नवे रुग्ण आढळले आहेत.  

****

मुंबईत काल ७४३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर, २० जणांचा या आजारानं मृत्यु झाला. पुण्यात काल एक हजार १०७ नवे रुग्ण आढळले. तर ४० जणांचा मृत्यु झाला. सांगली जिल्ह्यात २५१ नवीन रुग्ण आढळले तर २५ जणांचा मृत्यू झाला. रायगड २१२, सिंधुदुर्ग २५, सातारा ४९६,  नाशिक ४२९, भंडारा ३९, अमरावती १९५, पालघर २७९, धुळे २२३, वाशिम ३७, यवतमाळ ९४, गडचिरोली २२, बुलडाणा ५५,    

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात करण्यात आलेल्या समुह तपासणी मोहिम - सेरो सर्वेक्षणात पावणे बारा टक्क्याहून अधिक व्यक्तिंमध्ये या विषाणू विरोधी अँटीबॉडी-द्रव्ये आढळली आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काल जाहीर केले. जागतिक आरोग्य संघटनेसह, शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महविद्यालय- घाटी आणि महापालिकेच्या आरोग्य विभागानं हे  सर्वेक्षण केलं आहे. यात शहराच्या सर्व ११५ प्रभागातून लोकसंख्येच्या प्रमाणात तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. कोविडविरोधी अँटीबॉडीज  आढळलेल्या ८१ टक्के लोकांचा बाधितांशी प्रत्यक्ष संपर्क आला नसल्याचं आढळून आलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहर आणि परिसरात काल मोठा हादरा बसणारा आवाज झाला. हा आवाज नेमका कशाचा होता याचा शोध सुरू असल्याची माहिती गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. याबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वैज्ञानिक तसंच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूकंपशास्त्र विभागास माहिती देण्यात आली आहे. जनतेनं भिती न बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

***

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्याकरीता जिल्ह्यात बाजार भरणाऱ्या १३ गावांत तत्काळ कोविड चाचणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल आढावा बैठकीत ही माहिती दिली. कोरोना योद्धा आणि त्याच्या परिवारास तत्काळ मदत मिळण्याकरता 'प्रतिसाद कक्षाची' स्थापना करण्यात आली असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी कृषी पदवीधर संघटनेनं एका निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे. गेल्या सात दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसानं पाथरी तालुक्यातल्या कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि इतर खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोरोना महामारामुळे आर्थिक मंदी आली असून त्यात पुन्हा भर पडल्यानं शेतकरी वर्गाकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

****

लातूर ग्रामीण मतदारसंघात आजपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामविकास या विषयावर तीन टप्प्यांमध्ये सरपंचांच्या प्रशिक्षणास प्रारंभ होत आहे. गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, ग्रामीण जनतेचं राहणीमान उंचवावं हा या प्रशिक्षणामागचा उद्देश आहे. यात लातूर तालुक्यातले २७, औसा तालुक्यातले आठ तर रेणापूर तालुक्यातले १५ सरपंच सहभागी होणार आहेत.

****

शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतराष्ट्रीय जिम्नॅस्टिकपटू आदित्य तळेगावकर यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते २४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनियानं आजारी असल्यानं त्यांच्यावर औरंगाबाद इथं खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २०१६ला कोरिया इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेत ते सहभागी झाले होते. आदित्यच्या निधनाबद्दल क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली असून, एक उदयोन्मुख खेळाडू गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

****

 

 

 

 

संचालक मंडळाची मुदत संपलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिक्षक जे. बी. भालेराव यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भालेराव यांना पदभार स्वीकारुन निवडणूक घेण्यासाठी आदेशित करण्यात आलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात एका आरोपीला वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. गेल्यावर्षी बाललैंगिक अत्याचार अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात युक्तिवाद आणि आरोपीविरुद्धचे पुरावे तपासून त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. वीस वर्षे सक्तीमजुरीबरोबरच त्याला दहा हजार रुपये दंडाची शिक्षाही  सुनावली आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या तलाठी संजीवनी शिवानंद स्वामी आणि त्यांचे खाजगी लेखनीक सुभाष नागनाथ मोठे यांना काल ८ हजार रुपयांची लाच घेतांना

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ अटक केली. वाटणीपत्रावर फेर मंजूर करून घेण्यासाठी स्वामी आणि मोठे यांनी ही लाच मागितली होती.

****

No comments: