Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
*औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणुचे १४६ नवे
रुग्ण, चार रुग्णांचा मृत्यू
*राज्यांतर्गत, आंतरराज्य प्रवासावर निर्बंध
नको - केंद्र सरकार
*पंजाबमधील सीमेवर कारवाईत पाच पाकिस्तानी
घुसखोर ठार
आणि
*परभणी जिल्हा कारागृहातल्या २३ बंदींना कोरोना
विषाणुची लागण
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना
विषाणुचे १४६ रुग्ण आढळले. यात ग्रामीण भागातले एकोणऐंशी आणि महापालिका हद्दीतले ६७
रुग्ण आहेत. जिल्ह्यातली या रुग्णांची संख्या आता २० हजार १९० झाली आहे. यापैकी १५
हजार १५२ रुग्ण बरे झाले असून सध्या चार हजार ४१२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती
जिल्हा प्रशासनानं दिली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना
विषाणूवर उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला. गारखेडा इथल्या ४५ वर्षीय,
माहेतपूर इथल्या ४० वर्षीय, यशवंत नगर पैठण इथल्या ५६ वर्षीय पुरुष रुग्णांचा आणि गंगापूर
तालुक्यातल्या जिकठाण इथल्या २९ वर्षीय महिला रुग्णाचा मृतांत समावेश आहे. या विषाणू
संसर्गानं जिल्ह्यात आतापर्यंत ६२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय रुग्णालय- घाटीतल्या निवासी डॉक्टरांनी दोन महिन्यांपासून प्रलंबित विद्यावेतनासाठी
आज संप केला. आंदोलकांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुरू केलेला संप विद्या वेतन मिळाल्यानंतर
दुपारी एक वाजेच्या सुमारास मागं घेतल्याची माहिती `मार्ड` संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब
तिडके यांनी दिली आहे. या काळात आंदोलकांनी कोरोना विषाणू व्यतिरिक्त रुग्णांवर उपचार
बंद ठेवलं होते.
****
राज्यांतर्गत
तसंच आंतरराज्य प्रवास आणि मालवाहतुकीवर निर्बंध घालू नयेत, असं केंद्र सरकारनं राज्य
सरकारांना सूचित केलं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी एका संदेशाद्वारे राज्य
तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना याची माहिती दिली आहे. विविध राज्यं
तसंच जिल्ह्यांद्वारे या संदर्भातले निर्बंध घातले जात असल्याचं निदर्शनास आलं असल्याचं
त्यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदी हटवण्याच्या प्रक्रीयेतील
सर्व दिशा निर्देशांचं पालन केलं जावं, असंही केंद्रीय मुख्य सचिवांनी या संदेशामधे
नमुद केलं आहे.
****
नवी दिल्लीत गर्दीच्या ठिकाणी
दहशतवादी हल्ले घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या इसीस संघटनेच्या संशयित दहशतवाद्याला
पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपुर इथला हा रहिवासी असून मोहम्मद मुस्तकीम
खान असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून अत्याधुनिक स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. धौला
कुआ आणि करोल बाग मार्गावर काल रात्री त्याला अटक करताना गोळीबार करावा लागल्याचं पोलिसांनी
म्हटलं आहे.
****
सीमा सुरक्षा दलानं पंजाबमध्ये भारत पाकिस्तान
सीमेनजिक कारवाई करताना पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केलं. तरन तारन जिल्ह्यात एकशे
तीन क्रमाकांच्या तुकडीनं आज पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. पाकिस्तान
सोबत असलेल्या सुमारे तीन हजार तिनशे किलोमीटरच्या सीमेवर गेल्या दशकभरापासून अधिक
कालावधित प्रथमच सर्वाधिक घुसखोर मारले गेले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सीमा सुरक्षा दलानं दाल भागात मध्यरात्रीच्या सुमारास घुसखोरांच्या हालचाली जाणवल्यानंतर
या परिसरावर लक्ष केंद्रित करून कारवाई सुरू केली होती. सुरक्षा दलाच्या तुकडीनं घुसखोरांना
थांबवण्याचा प्रयत्न केला होता. घुसखोरांनी या तुकडीवर गोळीबार सुरू केल्यानंतर सैनिकांनी
स्वसंरक्षणार्थ चोख प्रत्युत्तर देत त्यांना ठार केलं. घुसखोरांजवळची नऊ किलो अंमली
पदार्थ असलेली नऊ पाकीटं तसंच एके सत्तेचाळीस बंदूक, चार पिस्तुलं आदी शस्त्रास्त्र
तसंच ६१० रुपयांचं पाकिस्तानी चलन जप्त करण्यात आलं असल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या
प्रवक्त्यानं म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा
दलांनी एका कारवाईमधे एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. सुरक्षा दलांनी आज सकाळी क्रीरी
भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी
दहशतवाद्यानं सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केल्यानंतर उडालेल्या चकमकीत हा दहशतवादी
मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
कोरोना विषाणु संसर्गाच्या
पार्श्र्वभूमीवर योग्य काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी कुटुंबीयांसमवेत `वर्षा` निवासस्थानी गणरायाचं स्वागत
केलं. त्यावेळी ते म्हणाले...
उत्सव साजरा करतांना सामाजिक
भान ठेवा, कुठेही गर्दी करु नका, ऐकमेकांपासून आंतर ठेवून रहा.सार्वजनिक ठिकाणी तोंडावरती
मास्क, सतत हात धुत राहणे,या जा काही उपाय योजना आहेत. त्यांच भान कधीही हरपू देवू
नका. आणि मला खात्री आहे की आपण सगळे जण सुजाण आहात, जागृती ही आपल्यात आलेली आहे.
यासर्वांचं पालन करुन आपण हा उत्सव साजरा कराल ही मला खात्री आहे नव्हे आत्मविश्वास
आहे.
****
दरम्यान, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी इथं
आपल्या निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. जालना इथं माजी राज्यमंत्री
अर्जुन खोतकर यांनी सपत्नीक पुजा करून गणरायाचं
स्वागत केलं. नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव
पाटील चिखलीकर यांच्या घरीही गणरायाचं आगमन झालं. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी लातूर
इथं आपल्या निवासस्थानी गणरायाची विधीवत
पुजा करुन स्थापना केली.
****
बीड जिल्ह्यात आज टाळेबंदी उठवण्यात
आल्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. जिल्ह्यात गणरायाचं स्वागत मिरवणुकांनी,
वाजत गाजत झालं नसलं तरी नागरिकांमधे उत्साह दिसून येत
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणीमधे गर्दी टाळत गणरायाचं स्वागत करण्यात आलं. जालना जिल्ह्यात साधेपणानं गणरायाचं
स्वागत केलं जात आहे. राजूर इथल्या श्री राजुरेश्वर गणपतीचा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे. मुंबईत अंधेरीतल्या राजा गणेश
उत्सव समितीतर्फे १४ दिवस रक्तदान शिबीर आयोजित करण्यात
येणार आहे. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस
सुरु असताना गणरायाचं घरोघऱी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात
आलं. जिल्ह्यात कुठंही मिरवणुका
काढण्यात आल्या नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सव
अत्यंत शांततेत सुरू झाला. जिल्ह्यात १०८
सार्वजनिक गणेश मडळं असून अनेक मंडळांनी मूर्तीऐवजी
प्रतिमापूजन केलं आहे. कोणतेही कार्यक्रम न घेण्याचं मंडळांनी ठरवलं आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लहान मुर्तींच्या स्थापनेला प्राधान्य दिलं जात आहे.
****
परभणी जिल्हा कारागृहात महानपालिकेच्या आरोग्य पथकानं आज कोरोना विषाणू संसर्ग तपासणासाठी घेतलेल्या
जलद चाचणीमधे २३ बंदींना याचा प्रादुर्भाव
झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. काल
कारागृहातील चाचणीत ६१ रुग्ण आढळले होते.
परभणी आरोग्य विभागानं कारागृहातल्या साडे
तीनशे बंदींची तपासणी केली आहे.
****
धुळे जिल्ह्यात
कोरोना विषाणुचे १६२ नवे रुग्ण आढळले
आहेत. जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या आता ६
हजार ५१७ झाली आहे. काल तीन रुग्णांचा या संसर्गावर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातली एकूण मृतांची संख्या २०० झाली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित ४ हजार ३६५ रुग्णांवर सध्या
उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २३ हजार ३६५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात
आतापर्यंत एकूण ७५५ रुग्ण या विषाणू संसर्गामुळे मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती जिल्हा
सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे.त्यामुळे गंगापूर
धरण ९३ टक्के भरले आहे.धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता लक्षात घेता,
नदीकाठी
राहणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
राज्यातल्या सर्व परिवहन
महामंडळाच्या बसस्थानकावरील वाहनतळ आस्थापना धारकांचा परवाना शुल्क माफ करण्याची मागणी
आमदार अंबादास दानवे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे आज संपर्क साधून केली आहे. टाळेबंदी काळातलं परवाना
शुल्क माफ करण्यात यावं आणि पुर्ववत प्रवासी वाहतुक सुरु झाल्यानंतर दुचाकी वाहनतळ
अस्थापना धारकांकडुन परवाना शुल्क २५ टक्के आकारण्यात यावं, अशी विनंतीही त्यांनी यावेळी
केली. याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिलं
असल्याचं आमदार दानवे यांनी कळवलं आहे.
****
अमरावती शहरातल्या शेगाव
नाका परिसरामधे नियोजित `कोविड उपचार
केंद्राला` विरोध करणाऱ्या ३७ कार्यकर्त्यांवर नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शेगाव नाका परिसरात दोन
मंगल कार्यालयांत हे उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे,
त्याविरुद्ध कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं.
****
No comments:
Post a Comment