Thursday, 20 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.08.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

स्वच्छता सर्वेक्षण २०२० पुरस्कार आज जाहीर झाले, या वर्षी महाराष्ट्रातल्या चार शहरांनी हे पुरस्कार पटकावले. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात महाराष्ट्रातल्या कराड, सासवड आणि लोणावळा या शहरांनी अनुक्रमे पहिला दुसरा आणि तिसरा स्वच्छ शहर पुरस्कार पटकावला आहे. तर एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात नवी मुंबई हे शहर तिसऱ्या क्रमांकाचं स्वच्छ शहर ठरलं, या गटात इंदूर शहरानं सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक पटाकवला, तर सुरत हे दुसऱ्या क्रमांकाचं स्वच्छ शहर ठरलं. नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या पुरस्कारांची घोषणा केली. विजेत्या राज्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या महानगरांमध्ये अहमदाबाद शहरानं पहिला स्वच्छ शहर पुरस्कार पटकावला.

****

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गांधी यांना एका ट्वीट संदेशातून आदरांजली वाहिली. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राजीव गांधी यांचं योगदान सदैव स्मरणात राहिल, असं नायडू यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनीही राजीव गांधी यांना ट्वीट संदेशातून अभिवादन केलं आहे. काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज सकाळी दिल्लीत वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

****

न्यायालय अवमानना प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी आपल्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य पीठानं करण्याबाबत केलेली विनंती, न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायालयानं या प्रकरणी १४ ऑगस्टला दिलेल्या निर्णयात भूषण हे दोषी असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणी शिक्षेसंदर्भात आजची सुनावणी होत आहे.

****

देशात कोविड19 च्या संक्रमणातून बरे होण्याचा दर ७४ टक्के झाला आहे. आतापर्यंत जवळपास २१ लाख लोक या संक्रमणातून बरे झाले आहेत. मृत्यू दरातही घट झाली असून तो एक पूर्णांक ९० शतांश टक्यांवर आला आहे. दरम्यान, काल गेल्या २४ तासात देशात ५९ हजाराहून अधिक लोक या आजारातून बरे झाले तर कोरोनाचे नवे ६९ सत्तर हजार रूग्ण आढळले. यासोबतच देशात आता या संक्रमणानं प्रभावित लोकांची एकूण संख्या २८ लाख ३६ हजार ९२६ झाली आहे. तर आतापर्यंत ५३ हजार ८६६ जणांचा मृत्यू झाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची मुदत ३१ जुलै रोजी संपली होती, मात्र आता ही योजना ३१ ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. कोविड १९च्या रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेताना आर्थिक बोजा सहन करावा लागू नये आणि सर्व नागरिकांना आरोग्य विषयक हमी आणि आर्थिक दिलासा मिळावा, म्हणून शासनाने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ९१ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळले. यात ग्रामीण भागातल्या ५६ आणि महानगरपालिका हद्दीतल्या ३५ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या १९ हजार ४९८ झाली आहे. त्यापैकी चौदा हजार ६८९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.  तर ६०८ जणांचा या विषाणूच्या संसंर्गानं मृत्यू झाला आहे. सध्या चार हजार २०१ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

जळगाव जिल्ह्यात काल ६०५ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या एकोणीस हजार ६८७ झाली आहे. कल १० जणांचा मृत्यू झाला आता एकूण मृतांची संख्या ६८८ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल ३५१ रुग्ण बरे झाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

****

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातला पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल मध्यरात्री पासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

मराठवाड्यात परभणी शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून दमदार पाऊस सुरु आहे. काल रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. संततधार पावसानं सखल भागात पाणी साचलं असून वातावरणात गारवा जाणवत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळ पासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस होत आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासात किनवट तालुक्यात सर्वाधिक ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली

ईसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्य़ाच्या माहूर तालुक्यातल्या पैनगंगा नदीस पूर आला आहे. धानोरा पुलावरूनही पाणी वाहत आहे. यामूळे राज्य महामार्ग बंद झाला असून, विदर्भाचा संपर्क तुटला आहे.

****

अकोला जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात झालेल्या संततधार पावसाचा पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यातल्या अकोला, बाळापूर, मूर्तीजापूर या तीन तालुक्यात संततधार पाऊस आणि नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे दहा हजार 199 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. पावसामुळं जिल्ह्यातल्या विविध भागातल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...