Saturday, 22 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.08.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 August 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      टाळेबंदीच्या काळात नोकरी गमावलेल्यांना बेरोजगार भत्ता देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

·      दहा दिवसांच्या गणेशोत्वाला आजपासून देशभरात प्रारंभ.

·      राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; क्रिकेटपटू रोहित शर्मासह पाच जणांना खेलरत्न;

·      खो-खो पटू सारिका काळे, पैलवान राहुल आवारेसह २७ जणांना अर्जुन पुरस्कार.

·      बाजार समिती नियमन मुक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या बाजार समित्यांचा बंद.

·      मराठवाड्यात काल २३ कोविडग्रस्तांचा मृत्यू, तर नवे एक हजार १४३ रुग्ण.

आणि

·      काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याचा आमदार कैलास गोरंट्याल यांचा आरोप.

****

कोविड प्रादुर्भावामुळे लागलेल्या टाळेबंदीच्या काळात नोकरी गमावलेल्यांना बेरोजगार भत्ता देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ - ईएसआयसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत ईएसआयसीचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना ९० दिवसांचा अर्धा पगार दिला जाणार आहे. २४ मार्च ते ३१ डिसेंबर या दरम्यान नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू असेल. किमान दोन वर्षांपासून ईएसआयसीचे सदस्य असलेले तसंच दरमहा २१ हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असणारे कर्मचारी यासाठी पात्र असतील.

****

कोविडग्रस्तांवर उपचारासाठी बॅसिल कॅलमेट गुरीन-बीसीजी लसीच्या उपयुक्ततेची चाचणी मुंबईत सुरू करण्यात आली आहे. लहान बालकांचं क्षय रोगापासून रक्षण करणारी बीसीजी लस श्वसन विकारांपासूनही रक्षण करत असल्याचं आढळून आलं आहे. ही लस कोविडच्या रुग्णांसाठी, विशेषत: वृद्धांसाठी उपयुक्त ठरते का, याची भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था - आयसीएमआरने चाचणी सुरू केली आहे. मुंबईत केईएम रुग्णालय आणि महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या बाबत अभ्यास करणार असून याला योग्य ती परवानगी मिळाली असल्याचं महापालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूवरची लस या वर्षाच्या अखेरपर्यंत तयार होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी वर्तवला आहे.

****

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून देशभरात प्रारंभ होत आहे. आज गणरायाचं घरोघरी आगमनं होईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना केलं आहे. यंदा आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकींना मनाई करण्यात आली असून, मंडपांमधे गर्दी न होऊ देण्याच्या सूचना मंडळांना करण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावांमधे विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, कोरोना विषाणूमुळे जिथे सगळं जग हादरून गेलं आहे तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू, असं मुख्यमंत्री म्हणाले. संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.

****

जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वादरम्यान मुंबईत केवळ तीन जैन मंदिरं उघडून प्रार्थना करण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. मुंबई व्यतिरिक्त इतर कुठेही मंदिरं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. दादर, भायखळा आणि चेंबूर इथल्या मंदिरात जैन भाविक पर्युषण पर्वात प्रार्थना करू शकणार आहेत.

दरम्यान, राज्यात गणेशोत्सवाच्या काळात मंदीरं उघडण्याची परवानगी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून घ्यावी लागेल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

****

निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या आचरणाच्या चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. गोगोई सेवानिवृत्त झालेले असल्यानं, या मागणीत आता काही तथ्य राहिलं नसल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. गोगोई सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असताना ही मागणी का केली नाही, असं न्यायालयानं याचिकाकर्त्याला विचारलं. गेल्या १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त झालेले रंजन गोगोई, आता राज्यसभेचे सदस्य आहेत.

****

केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं काल राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगाट, पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता मरियप्पन थंगावेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि हॉकीपटू रानी रामपाल या पाच जणांना ‘खेलरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २७ जणांची ‘अर्जुन पुरस्कारा’साठी निवड झाली, यामध्ये उस्मानाबादची खो-खो पटू सारिका काळे, बीडचा पैलवान राहूल आवारे, घोडेस्वार अजय सावंत, रोइंगपटू दत्तू भोकनाळ, धावपटू दुती चंद, बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी, क्रिकेटपटू इशांत शर्मा, दीप्ती शर्मा, टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर आणि दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव यांचा यात समावेश आहे. टेनिस प्रशिक्षक नरेशकुमार तसंच भारोत्तोलक विजय मुनीश्वर यांच्यासह आठ जणांना ‘द्रोणाचार्य जीवन गौरव’ तर हॉकी प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स सेबस्टियन, नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणासह पाच जणांना ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे आणि तृप्ती मुरगुंडे यांच्यासह १५ जणांना ‘ध्यानचंद पुरस्कार’ तर आठ जणांना २०१९चा ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ घोषित झाला आहे. चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद स्मृतीचिन्ह घोषित झालं आहे.

येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनी हा पुरस्कार वितरण सोहळा यंदा कोविड १९ प्रादुर्भावामुळे ऑनलाईन आयोजित केला जाणार आहे.

***

देशभरात यंदा खरीपाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी खरीपाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत साडे आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धानाचं क्षेत्र १२ टक्के तर तेलबियांच्या क्षेत्रात १४ टक्के वाढ झाली आहे. यंदा पाऊसही सरासरीच्या सहा टक्के अधिक होण्याचा अंदाज आहे. यामुळे खरीपाचं उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

****

राज्यातल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल, असं आश्वासन पणन मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. कापूस पणन महासंघाच्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात यंदा कापसाची विक्रमी खरेदी झाली असून, कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना राहू नये याची काळजी राज्य शासन आणि पणन महासंघानं घेतली असल्याचं ते म्हणाले. दी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया - सीसीआयसोबत बैठक घेऊन पणन महासंघाच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात मार्ग काढला जाईल, असंही पाटील यांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारच्या बाजार समिती नियमन मुक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या तीनशेहून अधिक बाजार समित्यांमध्ये काल बंद पाळण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजार समित्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत बंद होणार असून, कर्मचाऱ्यांचं वेतन आदी समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे केंद्रानं या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी बाजार समिती संचालकांनी केली आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं काम बंद तसंच लाक्षणिक उपोषण आंदोलन केलं. परभणी इथं या संपास मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर यांनी दिली. नाशिक, यवतमाळ बाजार समित्यांमधले व्यवहारही काल ठप्प होते.

****

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातलं गंगापूर धरण ९० टक्के तर दारणा धरण ९९ टक्के भरलं आहे. सध्या दारणा धरणातून सुमारे साडे १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून १२ हजार ३९३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे. या धरणातून होणारी आवक वाढल्यानं, जायकवाडी धरणातला पाणीसाठा सुमारे ७५ टक्यांवर पोहोचला असून सिद्धेश्वर तसंच येलदरी धरण पूर्ण भरलं असून माजलगाव धरणात ७२ टक्के पाणी साठा झाला आहे. विष्णुपुरी ८० टक्के, तर निम्न दुधना प्रकल्पात ५८ टक्के पाणीसाठा झाला आहे.

****

राज्यात काल १४ हजार १६१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सहा लाख ५७ हजार ४५० झाली आहे. काल ३३९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २१ हजार ६९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ११ हजार ७४९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत चार लाख ७० हजार ८७३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्ग मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६४ हजार ५६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

मराठवाड्यात काल २३ रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला, तर नवे एक हजार १४३ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं २० हजाराचा टप्पा पार केला. काल आणखी ३१० रुग्ण आढळले, तर पाच जणांचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवे १२६ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवे १५१ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १६१ रुग्णांची भर पडली. जालना जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या ७३ रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात २३३, तर हिंगोली जिल्ह्यात आणखी १९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.

परभणी जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर आणखी ७० रुग्ण आढळले. दरम्यान, परभणी शहरात काल ३५१ व्यापाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली, यात सहा जण बाधित आढळले. परभणी जिल्हा कारागृहातले ६१ कैदीही कोरोना विषाणू बाधित आढळले आहेत.

****

मुंबईत काल आणखी एक हजार ४०६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात तीन हजार ३२४ नवे रुग्ण आणि ६५ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ७४६ रुग्ण आढळले, तर १० जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार २४ रुग्ण आढळले तर २८ जणांचा मृत्यू झाला. रायगड ४४८, पालघर २९५, सातारा ३६१, सांगली २८०, सिंधुदुर्ग ७९, तर बुलडाणा जिल्ह्यात काल आणखी ३४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.  

****

प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांचे छोटे बंधू असलम खान यांचं काल मुंबईत कोविड संसर्गानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. असलम खान आणि त्यांचे मोठे बंधू एहसान खान या दोघांना गेल्या आठवड्यात कोविड संसर्गानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, ९७ वर्षीय दिलीपकुमार हे गेल्या मार्च महिन्यापासून पूर्णत: विलगीकरणात असल्याचं, त्यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी सांगितलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याची व्यवस्था लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपलब्ध करण्यात आली आहे. औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, त्यांचे पुत्र परिक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल प्लाझ्मा दान केलं, यावेळी विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन डोईबोळे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत उपस्थित होते.

****

काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना नगरविकास खात्याकडून विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस आमदारांच्या ताब्यात असलेल्या राज्यातल्या अकरा नगरपालिकांसोबत हा प्रकार घडला असून, याबाबत आपण पक्षश्रेष्ठींसह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं गोरंट्याल यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या येलदरी धरणाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत उजवा कालवा काढण्यात यावा, अशी मागणी जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. उजवा कालवा झाल्यास या परिसरातल्या सर्व कोरडवाहू शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि फक्त पावसावर अवलंबून न राहता कालव्यातून पिकासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत मिळेल, असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

****

औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अडचणी तातडीने दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासन सहकार्य करेल, असं आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. विद्यापीठाच्या अडचणींसंदर्भात काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जालना इथं कौशल्य विकास अभियानांतर्गत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असून, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे तातडीनं पाठवावा, असं सामंत यांनी सांगितलं. राज्य शासन आणि विद्यापीठं यांच्यात योग्य समन्वय राहावा यासाठी राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांनी नोडल अधिकारी नेमावा त्यामुळे प्रलंबित कामांना गती मिळण्यास मदत होईल, अशी सूचनाही सामंत यांनी यावेळी केली.

****

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात आज गणेशमूर्तींची आणि पूजा तसंच मखर सजावट साहित्याची विक्री करणारी दुकानं चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी आहे. इतर दुकानं यादरम्यान बंदच राहतील, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. 

****

परभणी जिल्ह्यात गणेशोत्सव आणि मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काल शहरात जनजागृती मोहीम राबवली. दहशतवाद विरोधी पथकासह बॉम्बशोधक, नाशक आणि श्वान पथकही यात सहभागी होतं.

गणेश चतुर्थी निमित्त शासकीय सुटी असल्यानं औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग आज बंद राहणार आहे. उद्या रविवारी हा विभाग सुरु राहणार असल्याचं घाटी प्रशासनानं कळवलं आहे.

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याकरता सोयाबीनची उत्पादकता वाढवणं गरजेचं असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या तीन दिवसीय ऑनलाईन सोयाबीन कार्यशाळेचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते.

****

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड इथं अन्न आणि औषध विभागाच्या पथकानं एका किराणा दुकानातून आठ हजार लिटर रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. हा साठा संशयास्पद वाटल्यामुळे पथकानं तो तपासणीसाठी पाठवला आहे.

****

जागतिक ऑनलाईन बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये काल भारतानं तीन लागोपाठ विजय मिळवत आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. भारतानं झिम्बावे, व्हिएतनाम आणि उझेबिकस्तानचा सहज पराभव केला. या स्पर्धेत भारत पहिल्या, चीन दुसऱ्या, तर जर्मनी तिसऱ्या स्थानावर आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...