Sunday, 22 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.11.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 November 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे ४५ हजार २०९ नवे रुग्ण आढळले आहेत. या काळात या संसर्गामुळे ५०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात या संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या ९० लाख ९५ हजार ८०७ झाली असून, ४ लाख ४० हजार ९६२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

****

मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्गाच्या एक हजार ९२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांत मुंबईतल्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली असून काल दिवसभरात १ हजार ५३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या बेचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस झाली आहे. यापैकी ४० हजार चारशे अठ्ठावन्न रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार एकशे एकतीस रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात सहाशे सत्तावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

‘राष्ट्रीय छात्र सेना’ आज आपला बहात्तरावा वर्धापन दिन साजरा करत आहे. या कार्यक्रमाचं औचित्य साधून जीवनाचं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर नायकांना काल नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनी स्मारकाला पुष्पांजली अर्पण केली.

****

तीन पदवीधर आणि एका शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. येत्या एक डिसेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. सामान्य जनतेची गेल्या आठ महिन्यांतली वीज देयकं पन्नास टक्के माफ करावी, या मागणीसाठी रिपब्लीकन पक्षातर्फे उद्यापासून तीन दिवस राज्यभर आंदोलन केलं जाणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

****

मुंबईतल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लातूर विभागाअंतर्गत काम करणारे राज्य परिवहन महामंडळाचे वाहक, चालकांना बेस्ट वाहतूक सेवेसाठी मुंबईला पाठवू नये अशी विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. लातूर इथल्या सुमारे चारशे एसटी कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतूक सेवेसाठी मुंबई इथं पाठवण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळानं घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही मागणी केली आहे.

****

वीज देयक वसुलीला बंदी घालून संपूर्ण माफी द्यावी, अन्यथा ऊर्जामंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात येईल, असं जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी म्हटलं आहे. टाळेबंदीच्या काळातली सर्वसामान्यांची वीज देयकं माफ करावी, या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या वतीनंही काल अहमदनगर इथं घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

****

नाशिक जिल्ह्यातल्या पिंगळवाडे या गावातले सैनिक कुलदीप जाधव यांना जम्मू काश्मीरमध्ये राजौरी इथं सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. राज्य शासनाच्या वतीनं जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या हुतात्म्याच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त करतांना म्हटलं आहे.

****

वाशिम जिल्ह्यात उद्यापासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार असून त्यासाठी शिक्षकांच्या कोरोना विषाणू संसर्ग तपासण्या सुरु आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पालकांचं हमीपत्र, तोंडावर मास्क लावणं आणि सोबत सॅनीटायझर आणणं बंधनकारक करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर इथल्या लोकनेते साखर कारखान्यात मिथेन वायूची गळती होऊन झालेल्या अपघातात दोन जण मृत्यूमुखी पडले तर सहा जण गंभीर जखमी झाले. काल रात्री साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला.

****

रायगड जिल्ह्याच्या संवर्धन कामांसाठी अकरा कोटी रुपयांचा निधी रायगड विकास प्राधिकरणानं पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केला आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिली आहे. किल्ल्याच्या संवर्धन कामांची त्यांनी पाहाणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीनं विनोदी कलाकार भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही मुबईत अटक केली. त्या दोघांवरही अंमली पदार्थांचं सेवन तसंच अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...