Monday, 14 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

·       मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विधान परिषदेत विरोधकांची घोषणाबाजी

·       बनावट पासपोर्ट बनवणाऱ्या बांग्लादेशी टोळीला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक

·       चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारच्यानिर्णयाविरोधात विविध संघटनांची निदर्शनं

आणि

·       औरंगाबाद इथं एका कोविड बाधिताचा मृत्यू

****

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेचं कामकाज मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून वादळी ठरलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. आरक्षणाला स्थगितीमुळे नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या दोन हजार १८५ उमेदवारांचं भविष्य धोक्यात आलं असल्याचं दरेकर म्हणाले. या मागणीसाठी मराठा युवा वर्ग आझाद मैदानावर आंदोलन करत आहे, याकडे दरेकर यांनी लक्ष वेधलं. दोन दिवसांच्या अधिवेशनात आरक्षण, शेतकरी समस्या, कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कशी होणार, असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला.

सभापती रामराजे निंबाळकर यांनी, या सर्व मुद्दयांवर उद्याच्या दिवसात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलता येईल, असं स्पष्ट केलं. या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली.

या गदारोळातच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला. शेती हा विषय राज्य सूचीत आहे. एखाद्या राज्यानं मागणी केली तरच केंद्र सरकारला त्यावरून शेती विषयक कायदे करता येतात. मात्र, केंद्र सरकारनं चर्चेविना कृषी विधेयकं संमत केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारनेही याबाबत स्वतंत्र कायदा आणावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

त्यानंतर विविध अध्यादेश आणि कागदपत्रं सभागृहासमोर मांडण्यात आले. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सन २०२०-२१ च्या पुरवणी मागण्या सदनासमोर मांडल्या. या दरम्यान, विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं सभापतींनी पाच मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर दिवगंत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला, सर्व दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. दरम्यान, प्रसाद लाड, सतीश चव्हाण, गोपीकिशन बाजोरिया आणि सुधीर तांबे यांची विधानपरिषदेत तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

दहशतवादविरोधी पथकानं आज मुंबईत बनावट पासपोर्ट अर्थात पारपत्र बनवणाऱ्या बांग्लादेशी टोळीला अटक केली. आठ जणांच्या या टोळीकडून मोठ्या प्रमाणावर पारपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, वीजदेयकं, भाडेकरारपत्र, शाळा सोडल्याचे दाखले, जन्मप्रमाणपत्र, बँकेची खातेपुस्तकं आदी बनावट कागदपत्रं हस्तगत करण्यात आली आहेत. बांग्लादेशी चलन, बांग्लादेशी मोबाईल फोन सिम कार्ड, तसंच विविध बँकांची एटीएमकार्ड ही या टोळीकडून जप्त करण्यात आल्याचील माहिती पोलिसांनी दिली. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी केलं आहे. 

   ****

सुधारित कृषी कायदे शेती आणि शेतकरी कल्याणासाठी समर्पित असल्याचं, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरात पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला मुबलक भाव देण्यासाठी या कायद्याची निर्मिती झाली असल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं. मागील काळात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचीही भूमिका या कायद्याच्या समर्थनात होती, याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधलं. या कायद्यात हमी भावाचा स्पष्ट उल्लेख असूनही त्याबाबत गैरसमज पसरवण्यात येत असल्याचं बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, सुधारित कृषी कायद्यांविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं.

दिल्लीत शेतकरी आंदोलनात आज अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं, त्याला पाठींबा दर्शवण्यासाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समितीतर्फे आज अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं.

****

शेती सुधारणा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. ज्या सुधारणा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झाल्या, त्या देशपातळीवर झाल्या तर विरोध का, असा प्रश्न माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी विचारला आहे, ते  आज धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी आंदोलनाच्या आडून देशात अराजकाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप भामरे यांनी केला.

****

शिक्षण विभागाने चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात परभणी जिल्हा शिक्षण संस्था महामंडळ, तसंच मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या शासन निर्णयाची होळी केली. शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यापुढे शाळांमध्ये शिपाई किंवा तत्सम पदं भरता येणार नाहीत. या शासन निर्णयाचा आंदोलकांनी तीव्र निषेध केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ या कार्यालयात गैरहजर असल्यानं संतप्त आंदोलकांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीस निवेदन चिकटवून निषेध व्यक्त केला.

औरंगाबाद इथल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली. तसंच

या आदेशाची होळीही करण्यात आली.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज एका ७४ वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १७४ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. घाटीत सात नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाल्यानं एकूण रुग्ण संख्या ४४ हजार ३८२ झाली आहे. जिल्ह्यातील ४२ हजार ६५५ कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून ५६५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात सात नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार ७५५ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बारा हजार १३५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या २८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात आज नवे तीन रुग्ण आढळले आहेत. तर पाच रुग्ण कोविड संसर्गातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आता कोविड रुग्णांची संख्या तीन हजार ४४०  झाली असून, यापैकी ३ हजार ३४० रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत.

****

ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण अबाधित राहावं, या समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या आणि अन्य मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातल्या अंबड तहसील कार्यालयावर आज ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी संघर्ष समितीच्यावतीनं काढण्यात आलेल्या या मोर्चात ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.

//***********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...