Friday, 11 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

 ** राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू

** मिक्सोपॅथीच्या विरोधात आयएमएची आज राज्यभरात बंद पाळून निदर्शनं

** थॅलेसेमिया तसंच सीकलसेलसारखे आजार समूळ नष्ट करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता - केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी

आणि

** जालना जिल्ह्यात दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू; औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात पाच नवे रुग्ण

****

राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं आज जाहीर केला. त्यासाठीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याचं, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितलं. १५ जानेवारीला होणाऱ्या या निवडणुकीसाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३१ डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून चार जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान १५ जानेवारीला होणार असून, मतमोजणी १८ जानेवारीला केली जाणार आहे. मराठवाड्यातल्या चार हजार १३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, औरंगाबाद जिल्ह्यात ६१८, बीड १२९, नांदेड- एक हजार १५, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर-४०८, तर हिंगोली- जिल्ह्यातल्या ४९५ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.

दरम्यान, राज्यात छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे.  त्याअंतर्गत मतदार नोंदणी, तसंच दुरुस्तीसाठी उद्या आणि परवा १२ आणि १३ तारखेला विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

****

मिक्सोपॅथीच्या विरोधात भारतीय वैद्यक संघटना - आयएमएनं आज राज्यभरात बंद पाळून आपला निषेध नोंदवला. आयुष मंत्रालयाकडून आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नुकतीच देण्यात आली आहे. मात्र या शस्त्रक्रिया फक्त तज्ज्ञ शल्यचिकित्सक करु शकतात. या परवानगी मुळे रुग्णांच्या जीवावर बेतू शकते, असं मत आयएमएनं व्यक्त केलं आहे.

औरंगाबाद इथं बहुतांश वैद्यकीय व्यावसायिकांनी आज बंद पाळला. शहरातल्या मोठ्या खासगी रुग्णालयांमधले बाह्य रुग्ण विभागही आज बंद होते. कोविड रुग्णांवरचे उपचार तसंच अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचं, आयएमएच्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष डॉ संतोष रंजलकर यांनी सांगितलं.

नांदेड इथं आयएमएच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, डॉक्टरांच्या एका शिष्ट मंडळानं जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं.

उस्मानाबाद जिल्ह्यातले डॉक्टर संपात सहभागी झाले, मात्र आपत्कालीन सेवा सुरू होती, असं आय एम एच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख यांनी सांगितलं.

राज्यात वाशिम, धुळे, तसंच मुंबईतही या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला, मुंबईत महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी आज काळ्या फिती लावून काम केलं.

ठिकठिकाणच्या आयुर्वेदिक तसंच होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी मात्र आयुष मंत्रालयाच्या या निर्णयाचं स्वागत करत, आज गुलाबी फिती लावून काम केलं.

****

थॅलेसेमिया तसंच सीकलसेल यासारखे आजार समूळ नष्ट करण्यासाठी संशोधन करण्‍याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. थॅलेसेमिया तसंच सीकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत ऑनलाईन एज्युकेशन प्रोग्राम सीरीज या चर्चासत्राचं उद्घाटन गडकरी यांच्‍या हस्‍ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. व या आजारांवर कायमस्वरूपी इलाज म्हणून लस असावी, असं गडकरी म्हणाले.

सिकलसेलच्या रुग्णांना सातत्याने रक्तांची आवश्यकता असते. त्यांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सिकलसेलची स्वतंत्र रक्तपेढी सुरू करता येईल का, याचा विचार करावा, रक्तदात्यांची संख्या वाढवावी, आवश्यक असल्यास स्वयंसेवी संस्थेची मदत घ्यावी, असंही गडकरी यांनी नमूद केलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक अस्तिकुमार पाण्डेय यांनी केलं आहे. 

   ****

औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीच्या एक हजार सहाशे कोटी रुपयांच्या नव्या पाणी पुरवठा योजनेत महापालिकेचा वाटा ६३३ कोटी निर्धारित केला आहे. औरंगाबाद महापालिकेची आर्थिक परिस्थिती ही बिकट असून ही रक्कम राज्य शासनानेच भरण्याची मागणी आमदार अतुल सावे यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. ही पाणी पुरवठा योजना औरंगाबाद शहराच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असून निधी अभावी ही योजना रखडू नये असंही सावे यांनी म्हटलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला मंजुरी दिली होती, मात्र तिचा शुभारंभ एका वर्षानंतर होत असल्याची टीका सावे यांनी केली.

****

जालना जिल्ह्यात आज दोन कोवीड बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या एकूण मृतांची संख्या आता ३३२ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २४ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार ७१२ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेेल्या १० रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार ९९८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज पाच नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण दाखल झाले आहेत. तर सात जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ४४ हजार १८५ झाली असून ४२ हजार २७० रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत. या विषाणू संसर्गानं जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १६६ जणांचा मृत्यू झाला असून ७४६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी इथली खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली आहे. सोमवती यात्रेला होणारा  पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. १२ ते १४ डिसेंबरपर्यंत भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही. या दरम्यान, जेजुरी गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. मंगळवारनंतरच भाविक गडावर जाऊ शकतील, अशी माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात अंजनडोह इथं बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या जयश्री शिंदे यांच्या पतीला वनविभागात नोकरी देण्याचं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. भरणे यांनी आज या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं, त्यावेळी हे आश्वासन दिलं. शिंदे कुटुंबियांना वन विभागातर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचे किंवा ठार मारण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा घटना होऊ नयेत, यासाठी वन विभागाने दक्षता घ्यावी. छोट्या-छोट्या वस्तीवर वीज वितरण कंपनीने त्वरित वीजजोडणी द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. स्वातंत्र्यसैनिकांची जन्मगावं स्मार्ट गाव म्हणून घोषित करावीत, स्वातंत्र्य सैनिकांचे घर संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करावं, खऱ्या तसंच पात्र स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकाच वेळी अनुदान रक्कम देऊन त्यांचा सन्मान करावा, आदी मागण्या या पत्रकातून करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार तथा केंद्र सरकारनं या मागण्यांची गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस उप - निरीक्षक राजकुमार चांदणे याला सहा हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज अटक केली.

//*************//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 29 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...