Tuesday, 15 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 December 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत सन २०१९ - २० च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरु झाली. एकीकडे सरकार निधी नाही असं सांगतं, तर दुसरीकडे आमदार, शिक्षण संस्था यांना भरघोस निधी देतं, असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात साहित्य उपलब्ध करुन दिलं नाही, आरोग्य विभागात नोकर भरती झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्याविरुद्ध सरकारी पक्षानं सादर केलेल्या हक्कभंग प्रस्तावासंदर्भात नेमलेल्या विशेषाधिकार समितीला आपला अहवाल सादर करणयासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय विधानसभेनं घेतला आहे. हा हक्कभंग विधानसभेशी संबंधित नाही, त्यामुळे तो रद्द करण्याची मागणी भाजप नेते मुनगंटीवार यांनी केली. यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान हा संपूर्ण राज्याचा अपमान असल्याचं सांगितलं. राज्याबद्दल अपशब्द काढणाऱ्यांविरोधात कठोर निर्णय घेतले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्राधिकरणावर सदस्य नियुक्तीच्या प्रस्तावावरही विरोधी पक्षानं आक्षेप घेतला. या प्राधिकरणावर निवडणुकीशिवाय कोणाचीही नियुक्ती होऊ शकत नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. यासंदर्भात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर केलेली आरक्षण सोडत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत आता निवडणुकीनंतर होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार थांबावा, तसंच खोटी जात प्रमाणपत्र दाखवून निवडणुका लढवल्या जात असल्यानं हा निर्णय घेतल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातल्या काही जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण यापूर्वीच जाहीर झालं असून, या निर्णयामुळे ते आता रद्द होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.  

****

राज्यांना वस्तू आणि सेवा कर - जीएसटी महसुलात झालेली तूट भरुन काढण्यासाठी, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं राज्यांना सहा हजार कोटी रुपयांचा सातवा साप्ताहिक हप्ता जाहीर केला आहे. याअंतर्गत २३ राज्यांना पाच हजार ५१६ कोटी रुपये, तर दिल्ली, जम्मू आणि काश्मीर तसंच पुद्दुचेरी या तीन केंद्रशासित प्रदेशांना, ४८३ कोटी रुपये देण्यात येत आहेत. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम, या राज्यांकडे जीएसटी महसूलात तूट नाही. महाराष्ट्राला एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या शून्य पूर्णांक ५० टक्क्यानुसार १५ हजार ३९४ कोटी, आणि विशेष खिडकी कर्ज योजनेनुसार पाच हजार ४७२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

****

देशात काल दिवसभरात २२ हजार ६५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३५४ जणांचा मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९९ लाख सहा हजार १६५ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ४३ हजार ७०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ३४ हजार ४७७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९४ लाख २२ हजार ६३६ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन लाख ३९ हजार ८२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात काल नऊ लाख ९३ हजार ६६५ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १५ कोटी ५५ लाख ६० हजार ६५५ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं. 

****

मुंबईत आझाद मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलास पाठिंबा म्हणून परभणीत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आज एकदिवसीय धरणे आंदोलनास सुरवात केली. सरकारनं या सर्व समन्वयक आणि मराठा बांधवांना आंदोलन दडपण्यासाठी नोटिसा दिल्याचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला.

****

केंद्र शासनानं ठरवलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये राज्याचा क्रमांक वर यावा यासाठी प्रत्येक विभागानं प्रयत्न करावेत, असं विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये केंद्र शासनानं केलेला कृती कार्यक्रम आणि राज्य शासनाच्या कृती कार्यक्रमासंदर्भात काल गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

****

दक्षिण मध्य रेल्वेने काही विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ दिली आहे. यामध्ये नांदेड पनवेल नांदेड, औरंगाबाद हैदराबाद औरंगाबाद, अमरावती तिरुपती अमरावती, हैदराबाद जयपूर हैदराबाद, पूर्णा पाटणा पूर्णा या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असून, अनारक्षित प्रवाशांना या गाड्यांतून प्रवास करता येणार नाही.

***///***

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 24 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...